नाण्याची दुसरी बाजू

पानिपत 
 
काल मी पानिपत युद्धावर पोस्ट केलेली पोस्ट वाचून बऱ्याच जणांनी असे वाटले की भावनिक होऊन मराठ्यांचा पराभव झाकण्याचा प्रयत्न करतो आहे. मला तसे म्हणायचे होते का? अजिबात नाही. काही लाख मराठे मारले गेले आणि पेशव्यांचा दारुण पराभव झाला ही गोष्ट अमान्य करताच येणार नाही. तसे नसते तर मी त्याला भळभळती जखम असे म्हटलेच नसते.
 
 
माझा मुख्य उद्देश परंतु त्या पराभवातून सुद्धा जी गोष्ट साध्य झाली त्याच्याकडे लक्ष वेधायचे होते. आपल्या देशावर वायव्य दिशेकडून धर्मांध आक्रमणे सतत चालूच होती. अहमद शाह अब्दाली सुद्धा अफगाणीच. परंतु जरी तो या युद्धात जिंकला असला तरी त्याच्या सैन्याची पण अपरिमित हानी झाली. तो इथून प्रचंड लूट घेऊन निघाला पण वाटेत सुरजमल जाट सारख्या लोकांनी त्यालाच लुटले त्यामुळे गझनी प्रमाणे उलटून परत येण्याचे धैर्य त्याच्यात शिल्लक राहिले नाही. सिकंदर पासून सुरु झालेली ही आक्रमणे त्यानंतर पूर्ण थांबली. आणि ते त्या युद्धाचे सगळ्यात मोठे फलित होते. असो.
 
 
इराणच्या नादीर शहाने उत्तरेत केलेल्या अत्याचारांना ठोस प्रतिउत्तर देणे हा मराठ्यांचा पानिपत कूच करण्याचा मुख्य उद्देश होता. देशाचे संरक्षण याच्यासारखा उदात्त हेतू ठेऊन ही मोहीम आखली गेली पण दुदैव की ते त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत.
 
 
आता त्या पराभवाचा विषय निघालाच आहे, तर त्याच्या काही प्रमुख कारणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
 
 • कोणालाही सपाट भूमीवर कसे युद्ध करावे याचे ज्ञान नव्हते आणि अनुभवही नव्हता.
 • शिवाजी महाराज अथवा पहिला बाजीराव यांचे युद्धकौशल्य अथवा हेरगिरी कशी करावी यांचा कोणीही नीट अभ्यास केला नव्हता.
 • नानासाहेब हे पेशवे पंतप्रधान असून देखील स्वतः युद्धावर गेलेच नाहीत. एवढ्या मोठ्या महायुद्धाच्या काळात ते पुण्यात बसून राहिले आणि त्यांच्या दिनचर्येत एक टक्का सुद्धा बदल झाला नाही. या गोष्टीचा सैन्याच्या मानसिकतेवर किती विपरीत परिणाम होईल याचा त्यांनी विचार केला नाही.

 

 • पेशव्यांमधील भाऊबंदकीमुळे या काळात मराठी साम्राज्याचे अपरिमित नुकसान झाले. पहिल्या बाजीरावांचे जेष्ठ पुत्र म्हणून बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हे पेशवे झाले खरे पण जेव्हा या मोहिमेचे नेतृत्व करायची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी कच खाल्ली. धाकटे बंधू रघुनाथराव यांना उत्तरेत लढाई करण्याचा अनुभव असून देखील या मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली नाही. युद्ध जिंकले तर भाऊ शिरजोर होईल ही भीती. मग आपला चुलत भाऊ सदाशिवराव (चिमाजी अप्पांचा पुत्र) हा अनुनभवी असून देखील त्याला ही कामगिरी देण्यात आली. परत मनात भीती की तो जिंकला तर डोईजड नको व्हायला म्हणून मग आपल्या एकोणीस वर्षाच्या कोवळ्या मुलाला (विश्वासराव) सुद्धा सेनापती म्हणून नेमण्यात आले.
 • असेही म्हटले जाते की पेशव्यांच्या पत्नीला अशी भीती वाटली की जर आपला पती उत्तरेत गेला तर येताना बापाप्रमाणे एखादी मस्तानी घेऊन यायचा तेव्हा त्याला न जाऊ देण्याची पराकाष्ठा करण्यात आली.
 • पेशवाईतील लोकांना आपण युद्धात हरू शकतो अशी स्वप्नात देखील शंका आली नाही त्यामुळे युद्धाबरोबर तीर्थयात्रा सुद्धा होईल म्हणून लोकं जाण्याचा हट्ट करून बसले. पेशव्यांनी नकार दिला तर ते लोक आमरण उपोषणाला बसले. त्यांच्या हत्येचे पातक आपल्या माथी नको म्हणून त्यांना बरोबर पाठवण्यात आले. त्यामुळे सैन्यबळ अंदाजे पन्नास ते साठ हजार आणि बरोबरचे बाजारबुणगे मात्र दोन लाख. या लोकांमध्ये अनेक बायका देखील होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच या युद्धाचे सगळे गणितच चुकत गेले.
 • युद्धात आक्रमण करण्याची तारीख ज्योतिष सल्ल्यानुसार पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आली आणि त्याचा परिणाम काय झाला? अब्दालीला तयारीसाठी तेवढा वेळ जास्त मिळाला आणि पानिपतातील तापमान प्रचंड बदलले.
 • अब्दालीने आपल्या युद्धकौशल्याचा छान वापर केला तसेच अलेक्झांडर प्रमाणेच त्याने पाठीमागून हल्ला करण्याचे तंत्र वापरून मराठी सैन्याचे दोन तुकडे तर केले, माघार घेण्याचा रस्ताच बंद करून टाकला, जास्तीची कुमुक यायला वावच ठेवला नाही आणि त्याचे पर्यवसान मराठी सैन्याच्या कत्तलीत झाले. जो गनिमी कावा शिवाजी महाराज सह्याद्रीच्या कडेकपारीत वापरत असत तसेच कौशल्य पहिल्या बाजीरावाने यशस्वीपणे सपाटीवर चालविले होते परंतु ते सदाशिवराव अथवा त्यांच्या अन्य साथीदारांना अजिबात जमले नाही.
 • एक कधीही न सुटलेले कोडे म्हणजे मुख्य युद्धभूमीवर सदाशिवराव हत्तीवर का बसले होते?  कदाचित सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेवावे हा उद्देश असेलही पण ते करताना शत्रूसाठी आपण अत्यंत सोपे लक्ष (easy target) होत आहोत हे कळलेच नाही. त्यांच्या मृत्यूमुळे सैन्यात पांगापांग झाली आणि त्यामुळे पुढे घडलेल्या कत्तलीला एक प्रकारे आमंत्रणच मिळाले.
 • सरदार विंचूरकर आणि त्यांच्या तोफखान्याने चुकीने पूर्व दिशेला कूच केले आणि त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आणि अब्दालीने त्यांच्या संपूर्ण तोफखान्याचा कब्जा मिळवला.
 • मराठी सैन्याच्या मदतीस कोणीही उभे राहिले नाही. काही लोकांच्या मते चौथाई वसुली करताना तेथील अनेक राज्यांवर जबरदस्ती झाली होती आणि मराठ्यांबद्दलचा असंतोष खदखदत होता. मराठे जिंकले तर अजून बलवान होतील म्हणून सर्व राजे तटस्थ राहिले किंवा काहींनी तर अब्दालीला मदत केली.
 • मराठी सैन्यातील अंधाधुंद बघून त्यांचा एक खंदा समर्थक, सुरजमल जाट, ज्याच्याकडे मोठे सैन्य होते आणि तेथील भूप्रदेशाची चांगली माहिती होती, याला मराठ्यांचा पराभव स्वच्छ दिसू लागला आणि त्याने ऐन युद्धाच्या तोंडावर मराठ्यांची साथ सोडून दिली. त्याने युद्ध जिंकून परतीच्या मार्गावर अब्दालीची लूट करण्यास प्राधान्य दिले आणि नंतर ते केले देखील.
 
या आणि अशा अनेक कारणांमुळे मराठ्यांचा पानिपतला दारुण पराभव झाला.
 
 
खरं तर अशा प्रचंड पीछेहाटीनंतर पेशवाई बुडालीच असती परंतु माधवराव पेशवे यांनी आपल्या कर्तृत्वाने ते तर होऊ दिले नाहीच पण मराठा साम्राज्याचे पुनरुत्थान करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. पानिपतच्या युद्धानंतर सहा महिन्यातच, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी पेशवाईची धुरा सांभाळली आणि पुढील दहा वर्षात मराठी साम्राज्य उत्तरेत परत फोफावले. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्ली सल्तनतला पण आपले मांडलिक बनवले आणि जवळपास संपूर्ण भारत देश त्यांच्या अंमलाखाली होता. दुर्दैवाने माधवराव पेशवे यांचे वयाच्या केवळ सत्तावीस वर्षी 1772 साली निधन झाले.
 
 
 
मराठी साम्राज्यावर हा फार मोठा आघात होता.
 
 
 
 
Assessing the impact of the loss of Madhavrao, the writer James Grant Duff eulogised:-
 
And the plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this excellent prince.”
 
 
यातून शेवटी बोध काय घ्यायचा?
 
 
 • मराठ्यांनी विचार करायला हवा होता की आपल्या खांद्याला खांदा लावून कोणीही का उभे राहिले नाहीत?
 • अंगात नुसता जोश असून पुरत नाही तर त्याला बुद्धिमत्ता, युद्धकौशल्य आणि हेरखाते याची जोड असणे हे युद्धात तितकेच किंवा काकणभर जास्तच महत्वाचे असते.
 • कितीही दारुण परिस्थिती निर्माण झाली तरी कर्तृत्वाच्या जोरावर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणे शक्य असते.
 
मराठी माणसाने आज सुद्धा हा विचार करण्याची आत्यंतिक गरज आहे. निदान काही लोकांच्या विचाराला तरी चालना मिळावी हाच माझ्या लेखनाचा उद्देश.
 
 
@ यशवंत मराठे
 
 
(Thanks to Jairaj Salgaonkar for his inputs) 

Leave a commentPushkaraj Chavan

11 months ago

फार छान. यात्रेचे प्रयोजन व यात्रेकरुंची संख्या यामुळे सैन्याच्या हालचाली चपळपणे जलदगतीने होऊ शकल्या नाहीत हे मुख्य कारण म्हणता येईल.

Yeshwant Marathe

11 months ago

कारणे बरीच आहेत. त्यातले एक कारण आहेच.

Hemant Marathe

11 months ago

Enjoyed reading both these articles on Panipat. Well researched and well narrated.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

 • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS