આપણો પારસીયા બાવા

आज जर आपल्याला कोणी विचारले की भारतातील सर्वात श्रीमंत संस्था कोणती? तर क्षणार्धात एकच उत्तर मिळेल – पारसी पंचायत. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा अंदाज त्यांना तरी पूर्णपणे असेल की नाही हे शंकास्पद आहे. पण पारसी समाजाची आपल्याला खरंच किती माहिती असते? पारसी अग्यारी, ऑगस्ट महिन्यातील पतेती हा सण या व्यतिरिक्त आपल्याला पारशी समाजाबद्दल फारसं काही माहीत नसतं. खरं तर अल्पसंख्य असूनही कुठलाही धार्मिक उन्माद न करता अतिशय शांततेत राहून आपली आणि देशाची प्रगती करणाऱ्या या समाजाचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच

पारसी हा शब्द उच्चारल्यावर पहिला काय विचार मनात येतो? मला तर नेहमी एक श्रीमंत, हॅपी गो लकी, आनंदी, तोंडाने थोडासा शिवराळ, डोक्यावर छोटी टोपी असलेला मनुष्य डोळ्यासमोर येतो. आपली मोटरसायकल किंवा गाडीची स्वतःच्या मुलाप्रमाणे (मारो डिकरो) काळजी घेणारा म्हातारा पारसी बावा मुंबईत दिसणे ही काही पूर्वी फार दुर्मिळ गोष्ट नव्हती. (पारश्याच्या सेकंड हॅन्ड गाडीला पूर्वी प्रीमियम मिळत असे; आता माहित नाही) 

 
वेडा पारशी 
 
माझ्या लहानपणी पारसी म्हणजे थोडा अत्रांग, डोक्याचा स्क्रू काहीसा ढिला असणार असे गृहीत धरले जायचे. परंतु त्यांना वेडा पारसी असे म्हटले तरी ते अजिबात अर्धवट नाहीत. मुंबईतील बहुतेक मोठे उद्योगपती, समाजसेवक (philanthropist) हे पारसीच आहेत. आज आपण जी मुंबई बघतो, खरं तर नुसती मुंबईच नाही तर भारतासाठी या समाजाचा सिंहाचा वाटा आहे. ‘आधुनिक भारताचे पितामह‘ दादाभाई नौरोजी, मादाम कामा, टाटा, गोदरेज, वाडिया, होमी भाभा, तसेच जीजीभॉय जमशेदजी, सॅम मानेकशॉ, बानाजी, नानी पालखीवाला, शापूरजी पालनजी, सोली सोराबजी, फली नरीमन.. अशी भारतीय पारसी लोकांची दैदिप्यमान परंपरा डोळ्यासमोरून तरळून जाते. असे असताना देखील त्यांना वेडा असे का संबोधले जाते तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यातील आपापसात होणारी लग्ने आणि कदाचित त्यामुळे कुठेतरी येणारा जेनेटिक दोष. 
 
दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे उशीरा होणारी लग्ने आणि याचा प्रमुख वाईट परिणाम म्हणजे त्यांची घटणारी लोकसंख्या. आज संपूर्ण जगात सुमारे एक लाख पारसी आहेत. त्यातील सुमारे 57000 भारतात (2011 च्या जनगणनेनुसार) आहेत. पुढील 1-2 वर्षात होणाऱ्या जनगणनेत ती संख्या फक्त 24000 असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे; म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या 0.0016%. तसे खरंच घडले तर पारसी समाजाला लोकसमूह म्हणूनही धरला जाणार नाही तर जमात (tribe) म्हणून मानले जाईल. 60 वर्षे एवढ्या वयाहून कमी असलेले पारसी पाच टक्क्यांपेक्षा देखील कमी आहेत; याचाच अर्थ दरवर्षी दर हजारामागे सात जन्म. 
 
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझ्या वडिलांचे एक पारसी मित्र होते. ते बाबांना नेहमी सांगायचे, अहो आमच्या समाजाने जास्तीत जास्त मुले पैदा नाही केली तर आम्ही नामशेष होऊ. मुलाच्या आईवडिलांना पैशाचा प्रॉब्लेम असेल तर त्या मुलांच्या उच्च शिक्षणापर्यंत सर्व खर्च आमची पंचायत करेल. त्यांचे भाकीत आज खरे ठरताना दिसत आहे. पुढील काही वर्षात हा समाज endangered species म्हणून गणला जाईल. त्यामुळेच मनात विचार आला की या धर्माचा इतिहास आणि संस्कृती यांचा वेध घ्यायला हवा. 
 
 
 
पारसी धर्माचा इतिहास 
 
वांशिकदृष्ट्या पारसी लोक हे इंडो युरोपियन वंशाचे असल्याने साधारणपणे उंच, गोरे, बळकट बांध्याचे, मोठे कपाळ, सरळ व मोठे नाक, मोठे डोळे (सामान्यतः काळे) असे ढोबळ वर्णन करता येईल. पारसी लोक पूर्वी इराण व आसपासचा मध्य पूर्वेचा प्रदेश येथील रहिवासी. पारसी हे नाव हे इराणमधील पर्स या प्रांतावरून आले. ग्रीक लोक या प्रांताला व कालांतराने त्या राज्याला – पर्शिआ म्हणू लागले आणि तेथील रहिवासी ‘पर्शिअन’. यांना भारतीय लोक पारसी म्हणत. कालिदासाच्या रघुवंशात देखील रघुदिग्विजयाच्या वर्णनात पश्चिमेकडील पारसिक देशाचा उल्लेख आहे. 
 
पारसी धर्म हा ख्रिश्चन आणि ज्यू धर्मापेक्षाही प्राचीन आहे. आजच्या पारसी लोकांच्या पूर्वजांचा प्राचीन इंडो आर्यन (वैदिक आर्य) लोकांशी अगदी जवळचा संबंध होता. त्यामुळे प्राचीन वैदिक आणि इराणी लोकांची भाषा, साहित्य आणि संस्कृती यात अतिशय साम्य आहे. अतिप्राचीन काळी हे इराणी लोक आणि वैदिक आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुवाच्या परिसरात एकत्र नांदत होते, असे लोकमान्य टिळकांनी आपल्या ‘आर्टिक होम इन वेदाज‘ या अद्वितीय संशोधनपर ग्रंथात अनेक पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्यानंतर काही काळाने व कदाचित हिमयुगामुळे या लोकांचे समुदाय दक्षिणेकडे सरकले. त्यातील काही टोळ्या कॅस्पियन समुद्राला वळसा घालून इराण, उत्तर इराक स्थिरावल्या. हेच आजच्या पारसी लोकांचे पूर्वज होय. यांच्या इतर टोळ्या आणखी पुढे जाऊन खैबर, बोलन या खिंडीतून हिमालयाच्या रांगा ओलांडून भारतीय उपखंडात आल्या; हेच वैदिक आर्य लोक होत. 
 
उत्तर ध्रुवाच्या परिसरात एकत्र राहत असताना या दोन्ही समाजांचा धर्म एकच असावा. हा अतिप्राचीन काळ – किमान 7000-8000 वर्षांपूर्वीचा आहे. हाच काळ वेदांचा रचनाकाल होय. याच काळात कधीतरी झरतुष्ट्र या आजच्या पारसी धर्माचा संस्थापक-प्रेषिताचा जन्म झाला. त्याला परमेश्वराने (याला पारसी लोक अहूर मज्दा म्हणतात) दर्शन देऊन नवीन धर्माची मुलतत्वे सांगितली व उपदेश केला. या धर्माची गाथेची मूळ भाषा व देवकालीन संस्कृत भाषा यात अतिशय साम्य आहे. मुसलमानी रानटी धर्मांध टोळ्यांच्या आक्रमणामुळे आणि अंतर्गत कलहाने खिळखिळ्या झालेल्या यझदेझार्द याच्या राजवटीचा इ.स. 633 मध्ये पाडाव झाला आणि सुरु झाले पारसी संस्कृतीचे निर्दालन. मुसलमानी धर्मांध जेत्यांनी पारसी समाजापुढे तीन पर्याय ठेवले. इस्लाम स्वीकारा, काफिरांचा जाचक जिझिया कर भरा व हे दोन्ही मंजूर नसेल तर मरायला तयार व्हा. हा एकप्रकारे पारसी समाजाच्या अस्तित्वाचाच प्रश्न तर होताच पण त्याचबरोबरीने उदात्त, उच्च जीवनप्रणाली व मूल्ये यांची तिलांजली द्यावी लागली असती. अखेर आपल्याच देशात हतबल झालेल्या पारसी समाजाने धर्मरक्षणासाठी देशांतर करायचे ठरवले. स्थलांतरित पारसी लोकांचा सगळ्यात मोठा समुदाय हा भारतात आला व पश्चिम किनाऱ्यावरील भरूच, सुरत, ठाणे, मुंबई या बंदरांमध्ये उतरला आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाला. 
 
पहिल्या काही टोळ्या उधवाडा येथील संजाण येथे दाखल झाल्या आणि त्यांनी तेथील राजाला आम्हाला आसरा द्या अशी विनंती केली. आता बोलायचे म्हणजे  अडचण. त्यामुळे राजाने एका पेल्यात काठोकाठ दूध भरले आणि सांगायचा प्रयत्न केला की आमच्याकडे जागाच नाही. त्यावेळी या पारसी लोकांनी त्यात साखर घातली आणि असे दर्शवले की आम्ही असे तुमच्यात विरघळून जाऊ. राजा खूष झाला आणि त्याने थारा द्यायचे मान्य केले पण काही अटी घातल्या. गुजराथी भाषा बोलणे, लग्न विधीत काही गुजराथी पद्धती, पोशाख वगैरे आणि ज्या त्यांनी कबूल केल्या. 
 
 
 
 
पारसी व वैदिक संस्कृती संबंध / सांस्कृतिक दुवे 
 
अ) भौगोलिक परिस्थिती: अवेस्तामध्ये ऐर्यन वएजो ही आर्यांची प्राचीन जन्मभूमी अथवा स्वर्गभूमी असल्याचा उल्लेख आहे. याचे वर्णन ध्रुव प्रदेशाशी जुळते. वेदांमधल्याही अनेक ऋचांमध्ये दीर्घ रात्रीचे व इतर भौगोलिक विस्मयजनक घटनांचे उल्लेख आहेत जे केवळ ध्रुव प्रदेशाशी निगडित आहेत. 
 
आ) पूज्य देवता, स्थाने व इतर नामे: अनेक वैदिक नावांचे उल्लेख अवेस्तामध्ये सापडतात. उदा. (कंसातील अपभ्रंशित / रूपांतरित नावे अवेस्तामधील) देव (दैव), असुर (अहुर), मित्र (मिथ्र), वरुण (वरेण), विवस्वान (विवहवंत), यम (यिम), सोम (होम, हओम), मास (माह), सप्तसिंधू (हप्तसिंधू), सरस्वती (हरहवैती), वसिष्ट (वहिष्ट) 
 
इ) धार्मिक विधी: पारसी धर्मात प्राचीन यज्ञ संस्कृतीचा अंतर्भाव होतो मात्र यज्ञातील पशुबळी प्रथा त्यातून वगळल्या आहेत. वैदिक परंपरेप्रमाणेच पारसी यज्ञात – (पारसी यस्न) एक मुख्य पुरोहित आणि इतर सहाय्यक पुरोहित असतात. विदैवोदात (ज्याला चुकीने वेन्दीदाद म्हटले जाते) या अवेस्ताच्या नवव्या फाकार्त मध्ये मृताच्या संपर्कात येऊन अशुद्ध झालेल्या व्यक्तीच्या शुद्धीकरणाचा विधी दिलेला आहे. त्यात वैदिक गायीच्या ऐवजी पवित्र बैलाच्या मुत्राने शुद्धीकरण करण्याची पद्धत आहे. 
 
ई) भाषा: वेदकालीन संस्कृत आणि अवेस्तातील गाथांची भाषा यांत व्याकरण, रचना आणि शब्दकोश यांचे आश्चर्यकारक साधर्म्य आहे. संस्कृत वर्णमालेत 15 स्वर आणि 33 व्यंजने आहेत तर अवेस्तांमध्ये देखील 14 स्वर आणि 35 व्यंजने आहेत. संस्कृतप्रमाणेच अवेस्तामध्ये नुसत्या वर्णाने शब्द होऊ शकत नाही. शब्दासाठी व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनवावे लागते. उदा. म् + अ = म. 
 
संस्कृतप्रमाणेच अवेस्तामध्ये देखील व्यंजनांची वर्गवारी त्याच्या उच्चारस्थानाप्रमाणे केलेली आहे. उदा. दन्त्य, ओष्ठ्य, तालव्य, कंठ्य इत्यादी. त्याचप्रमाणे अवेस्तामध्ये देखील संधी आहे आणि त्याला संधी असेच म्हणतात. बहुसंख्य धातू (क्रियापदाचे मूळ रूप) देखील सारखेच आहेत. या आणि अशाच इतर अनेक पुराव्यांवरून संस्कृत ही अवेस्ताची जननी अथवा भगिनी भाषा आहे हेच निर्विवादपणे सिद्ध होते
 
अशी अजून अनेक उदाहरणे आहेत पण विस्तारभयास्तव इथे देता येत नाहीत. असो. 
 
 
पण या अतिप्राचीन इतिहासाचे इतर अनेक पदर पुरेशा पुराव्याअभावी अंधारात तरी आहेत किंवा केवळ तर्काच्या पातळीवर आहेत. भविष्यातील संशोधनातून या तर्कांना समर्थक किंवा बाद करणारे पुरावे समोर येतील आणि या अज्ञात कालखंडावर प्रकाश पडून मानवजातीच्या प्राचीन इतिहासाची कहाणी स्पष्ट होईल अशी भविष्यासाठी फक्त आशाच करू शकतो. 
 
बाहेरून भारतात येऊन इथे दुधातल्या साखरेप्रमाणे विरघळून गेलेला हा प्रेमळ समाज (म्हणूनच लेखाचे नाव આપણો પારસીયા બાવા; आपणो पारसिया बावा असे आहे) नामशेष झाला तर ती फार दुःखद घटना असेल. परंतु बऱ्याच अंशी तो समाजही त्याला तितकाच जबाबदार असेल. ते धर्मप्रसारासाठी धर्मांध नसले तरी स्वतःच्या धर्मासंबंधी अति पुरोगामी विचार करणारा हा समाज आहे. कुठलाही बदल ते खपवून घेत नाहीत आणि मान्यही करत नाहीत.
 
 
पारसी मुलाने परधर्मीय विवाह केला तर त्याच्या बायकोला कधीही अग्यारीत प्रवेश मिळत नाही; अगदी तिच्या मुलाचा नवरोज असू दे नाहीतर नवऱ्याचा मृत्यू. पण तिची मुले मात्र जाऊ शकतात. पूर्वी जर एखाद्या पारसी मुलीने धर्माबाहेर विवाह केला तर तिने धर्मत्याग केला असे मानण्यात येत असे आणि तिला फायर टेंपल अथवा अग्यारीत प्रवेश बंदी होती. परंतु 2017 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ती आता जाऊ शकते परंतु तिच्या मुलांना मात्र बंदी आहे. म्हणूनच असे वाटते की त्यांचा झरतुष्ट्र त्यांना कालानुरूप बदल स्वीकारण्याची सुबुद्धी देवो ही प्रार्थना करावी. 
 
 
@ यशवंत मराठे 
 
 
प्रेरणा: मंदार उपाध्ये लोकप्रभा मधील लेख 
 
 
 

Leave a commentJyoti Tambe

1 year ago

खूप छान माहिती मिळाली … आमचे २/३ खास पार्सल मित्र आहेत.. खूप गोड असतात पारसी लोकं … बोलण्यात शिव्या सुद्धा मधाळ 👌👌😂
मुलांची लग्न हा मोठ्ठा प्राॅब्लेम आहे… मेंदूचे पण आजार खूप आढळतात.. मित्राचा मुलगाही वेडसर आहे …
Overall Parsis are very sweet n good friends 👍😊

Parag Vishwanath Dandekar

1 year ago

The article is very informative and well written. But felt that it should have been more elaborate and longer.
Parsi are a great source of industrialisation in India. If there were no Parsis in Mumbai, Mumbai would have been an underdeveloped city.
Mumbaikars owe a perpetual debt to that community.
All in all well written but too brief.

पुष्कराज चव्हाण

1 year ago

प्रत्येक लेखागणिक तुझी प्रतिभा उजळते आहे. या लेखात तर ते प्रकर्षाने जाणवते आहे.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Comments

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS