मी सुद्धा दोन इंडियाचा !!

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन वीर दास याने “I come from Two India’s” या आपल्या न्यूयॉर्क येथील परफॉर्मंस मुळे एका नवीन वादाला तोंड फोडले. त्याने बोललेल्या काही गोष्टी खऱ्या असल्या तरी त्याने परदेशात जाऊन असे बोलावे हे काही मला पटले नाही. असो.
 
 
 
दोन इंडियाज् हे वास्तव आहे; इंडिया विरुद्ध भारत हा झगडा नवा नाही. तसेही प्रत्येक समाजात परस्परविरोधी चित्रे दिसतात. आज प्रत्येक जण एक प्रकारे दोन सर्वस्वी भिन्न जगात जगत आला आहे. परंतु मी बोलतोय ते वैयक्तिक बाबतीत. आपला भूतकाळ आणि आजचा वर्तमान यात जो कमालीचा फरक पडला आहे तो अधोरेखित करण्यासाठीचा हा एक प्रयत्न. एका दशकात म्हणे एक पिढी बदलते परंतु सध्या झपाट्याने कायापालट होणाऱ्या जगाकडे बघितलं तर असं वाटते की दर पाच वर्षांनी नवीन पिढी होत असेल. माझा जन्म साठीच्या दशकातील, त्यामुळे माझे आयुष्य प्रत्येक दशकात पूर्णपणे बदलून जात राहिले. हा लेख म्हणजे त्या बदलाचा मागोवा. कदाचित त्याच्यात तुम्हाला तुमच्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसेल.   

 

 
आमचा भूतकाळ 
 

शालेय शिक्षण 

 • पाचव्या इयत्तेपासून शाळेत आम्हाला पास / नापास हेच कळत होतं. मार्कांची टक्केवारी आणि आमचा संबंध कधीच नव्हता.
 • शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची कारण “” असं हिणवलं जायचं.
 • पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिसं ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता.
 • कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.
 • दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा.
 • वर्ष संपल्यावर चौकात जाऊन पुस्तके विकणे आणि त्यातली थोडी रक्कम बोरं, पेरू तसेच गोळेवाल्याकडून गोळे खाण्यासाठी ढापण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.
 • आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते. 
 • वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती कारण आमच्यामध्ये *टॅलेन्ट* तेवढंच होतं.
 • गृहपाठ न करणे, केस न कापणे, वर्गाला उशीर होणे किंवा खोडकरपणा करणे यामुळे आम्हाला शाळेत शिक्षा झाली अथवा खोड्या काढण्याबद्दल शिक्षकांनी आम्हाला फटकावले तरी देखील आमच्या पालकांनी याबद्दल कधीही तक्रार केली नाही.
 • सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना, कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा ‘ईगो‘ कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला ‘ईगो’ काय असतो हेच माहीत नव्हतं.
 • एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून, आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही.
 • बस्सं!… काही धूसर आठवणी उरल्यात इतकंच…!!

 

कौटुंबिक जीवन 

 • मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, ‘चला, कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून.
 • विना चपला, बुटांचे कोणत्याही चेंडूवर वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर फूटबॉल, क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.
 • आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे. सहा महिन्यातून डोसा खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो. 
 • आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला *आय लव यू* म्हणणं माहीतच नव्हतं.
 • आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय तर काही? काय माहीत? ‘शाळेतील ते डबल सीट वर फिरवलेले ते मित्र, कुठे हरवलेत ते?
 • आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की, आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो.
 • कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही. पोळी भाजी शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं. या तीनही बाबतीत आम्ही मूर्खच राहिलो.
 • आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला जवळपास आलेल्या म्हातारपणी जगायला मदत करतील. जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही.
 • आम्ही चांगले का वाईट माहित नाही, पण आमचाही एक ‘जमाना’ होता.
 

सणासुदीचे दिवस 

 • आज मला आठवते लहानपणीची दिवाळी. पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.
 • इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा दिवाळीत धम्माल असायची. किल्ले बनवायचे, रांगोळीसाठी ठिपके पाड़ून द्यायचे, थोडेच पण आमच्या नजरेतून मनसोक्त फटाके फोडायचे. सापाची गोळी, टेलिफोनचा फटाका, चमन चिडी जी कुठून कुठे उडणार हे गुपित असायचे. रॉकेटसाठी बाटली शोधायची पण खरी मजा रस्त्यावर लावलेला बाण आडवा तिडवा कोणाच्या ढेंग्यातून गेला की कोण आनंद. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग बोंबाबोंब व्हायच्या आत तिथून धूम ठोकायची.
 • लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.
 • सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायची आणि पेपराला सगळ्या बाजूने आग लावल्यानंतर उडालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद अवर्णनीय असा असे.
 • दिवाळीच्या दिवसात आम्ही थोडे श्रीमंत देखील व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि मग अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड्याने घेऊन फिरायला मिळायचे.
 • आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हॉटस ऍपचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे. 
 
 
 
दोन विश्वातील आयुष्य 
 • मी बॉंबेत वाढलो, मुंबईत नाही. उन्हाळा असो, पावसाळा असो व थंडी, आमच्या जेवणाची वेळ रात्री 8:00 आणि झोपण्याची वेळ 10:30 ही कधीच बदलली नाही.
 • रेस्टॉरंटमध्ये बाहेर खाणे हा एखादा मोठा सोहळा असे, खरं सांगायचं तर अत्यंत दुर्मिळ गोष्ट, कारण ते केवळ वाढदिवस किंवा एखादा विशेष प्रसंग साजरा करण्याच्या वेळीच फक्त होत असे.
 • आमच्या काळी फास्ट फूड असे काही नव्हते आणि बाजूच्या वाण्याकडून कधीतरी मिळणारी कोल्ड ड्रिंकची बाटली अथवा आईस्क्रीम ही खरी मेजवानी असायची. वार्षिक परीक्षा चांगल्या पद्धतीने पास झाल्यास कपड्यांचा नवीन सेट किंवा बाटा शूज मिळण्याची दाट शक्यता. 
 • शाळेतून घरी येताच हात पाय धुवून कपडे बदलणे हे अनिवार्य होते. शाळेत कोणालाही सोडायला अथवा पिकअप करायला गाडी येत नसे. एक तर स्कूल बस किंवा सार्वजनिक बस किंवा चालत घरी जाणे. आणि हो, गृहपाठ केल्याशिवाय रात्रीचे जेवण मिळणार नाही असा दंडक होता.
 • सगळ्यांच्या घरी फोन नव्हताच आणि नंतर सुद्धा बोलायचे असेल तर पब्लिक पीसीओ बूथ शिवाय पर्याय नव्हता.
 • आमच्याकडे Apple TV, Amazon Prime किंवा Netflix नव्हते; होते फक्त दूरदर्शन. जंगल बुक आठवड्यातून एकदा रविवारी आणि छाया गीत गुरुवारी, ज्यासाठी आम्ही आठवडाभर वाट पाहायचो.
 • चोर पोलिस, लप्पा छुपी, फुटबॉल, क्रिकेट, लगोरी, डब्बा आईस पाईस, गोट्या आणि इतर कोणताही खेळ खेळायची आमची तयारी असायची. उन्हाळ्यात घरी कॅरम, पत्ते (झब्बू, बदाम सात, पाच-तीन-दोन इत्यादी), बुद्धिबळ, लुडो, साप शिडी यांचा फड जमायचा.
 • इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरशिवाय आयुष्य चांगले होते. फॉलोअर्स हे आमच्या मागे उभे असलेले मित्र होते.
 • आम्ही मॅग्नेटिक टेप किंवा रेडिओद्वारे संगीत ऐकले. वॉकमॅन ही लक्झरी फक्त श्रीमंतांसाठी होती.
 • आई जे जेवण बनवायची ते आम्ही कधीही कुरकुर न करता जेवायचो आणि शाळेच्या डब्यात घेऊन जायचो. बिसलेरी अस्तित्वातच नव्हते; आम्ही शाळेच्या पाण्याच्या नळातून पाणी प्यायचो. आम्ही आमच्या मित्रांना खाली रस्त्यावरून आरडाओरड करून बोलावायचो ज्याचा कोणालाही त्रास होत नसे. आम्हाला कशाचीही भीती वाटत नसे. आम्ही अंधार होईपर्यंत खेळायचो कारण सूर्यास्त हा आमचा अलार्म होता. जर कोणाशी भांडण झाले असेल, तर ते तेवढ्यापुरतेच असायचे. लगेचच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्याही आधी भांडण संपून परत मैत्री झालेली असे.
 • आम्ही आमचे तोंड आमच्या वडिलधाऱ्यांसमोर कधीही उघडले नाही कारण आमच्या सर्व आजोबा, आजी, काकू, काका, मामा, मामी, मावशी, मावसोबा आणि आमच्या पालकांचे जिवलग मित्र हे सर्व आमच्या पालकांप्रमाणेच मानले जायचे.
 • आम्ही पोलीस, अग्निशमन कर्मचारी, रुग्णवाहिका कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर आणि परिचारिका यांचा कायमच आदर केला.
 • आणि हो, आम्ही कधीच उलट उत्तर दिले नाही..!!!
 • चैन म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नव्हते इतकी आमची राहणी साधी होती.

 

जाने कहाँ गये वो दिन!! 
 
 
 
आजचे जग 
 
आजच्या घडीचा विरोधाभास असा आहे की आपल्याकडे उंच इमारती आहेत पण संकुचित वृत्ती आहे. मोठमोठे हायवे आहेत, परंतु दृष्टिकोन अरुंद होत चालले आहेत. कुवत नसून लोकांना दाखवायला आपण जास्त खर्च करतो. आपण जास्त खरेदी करतो, पण त्यात आनंद नसतो. आपल्याकडे घरे मोठी झाली पण कुटुंबे मात्र छोटीछोटी होऊ लागली. सोयी खूप आहेत, पण वेळच नाहीये. आपल्या पदव्या वाढल्या पण कॉमन सेन्स कमी झाला. ज्ञान वाढले पण निर्णय क्षमता कमी झाली. तज्ञ मंडळी वाढली तरी समस्या कमी झाल्या नाहीत. भरपूर औषधे आहेत पण आपण निरोगीपणा हरवून बसलो आहोत. 
 
आज मद्यपान आणि धुम्रपान खूप वाढले, खूप बेपर्वाईने खर्च करतो, खूप वेगाने गाडी चालवतो, खूप रागावतो, खूप उशिरा उठतो, खूप थकतो, खूप कमी वाचतो, खूप टीव्ही पाहतो परंतु हास्य मात्र पार विसरून गेलो. प्रार्थना करण्याची लाज वाटते किंवा त्याच्यासाठी वेळच नाही. आपण आपली संपत्ती वाढवली आहे, परंतु नीतिमत्ता मात्र धुळीला मिळाली आहे. आपण खूप बोलतो पण फारच क्वचित प्रेम करतो आणि जास्त वेळा द्वेष करतो.
 
आपण जगतो आहोत पण त्यात नीरसता आलीय. वयोमान वाढले पण आयुष्य बेचव झाले. मानव चंद्रापर्यंत जाऊन आला परंतु नवीन शेजाऱ्याला भेटण्यासाठी रस्ता ओलांडताना त्रास होतो. आपण बाह्य अवकाश जिंकले पण अंतरात्मा नाही. आपण मोठ्या गोष्टी केल्या आहेत, परंतु त्या चांगल्या आहेत का याचा विचार नाही केला.
 
आपण हवा स्वच्छ करायच्या ऐवजी प्रदूषित केली आहे. आपण जास्त लिहितो, पण शिकतो किती? अधिक योजना करतो, परंतु कमी पूर्ण करतो. घाई करायला शिकलो, पण थांबायला नाही. अधिक माहिती ठेवण्यासाठी, सुपर फास्ट संगणक तयार करतो, परंतु संवाद मात्र नाहीसा होत चालला आहे.
 
आजकालचा जमाना जरी फास्ट फूडचा असला तरी पचनशक्ती मंद अशी परिस्थिती. माणसे मोठी झाली पण चारित्र्य छोटे, प्रचंड नफा पण उथळ नातेसंबंध, दोन कमाईचे पण जास्त घटस्फोट, झगमगती असलेली तरी तुटणारी घरे. हे दिवस आहेत डिस्पोजेबल डायपरचे, फेकून दिलेल्या नैतिकतेचे, वन नाईट स्टँडचे, जास्त वजनाच्या शरीराचे आणि अशा गोळ्यांचे जे आनंदापासून, शांततेपर्यंत, मारण्यापर्यंत सर्व काही करतील.
 
 
 
 
मग साहजिकच मनात प्रश्न येतो की उद्या काय असेल? समाजातील विषमता तर वाढीला लागलेली दिसते त्यामुळे सामाजिक अशांतता माजू नये ही प्रामाणिक इच्छा आणि आशावाद. 
 
 
 
 
आज भारतात एकीकडे स्वत:तच मग्न असणारा एक मोठा तरुण वर्ग आहे. मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या, गाड्या, शहरांमध्ये ३ बेडरूम फ्लॅट आणि हातात आय-फोन या स्वप्नांमध्ये हा वर्ग गुंग आहे. टीव्हीसमोर बसून ॲन्कर्सचा आरडाओरडा ऐकणारा आणि गडगडत्या किंवा चढत्या सेन्सेक्सच्या आकड्यांवर आपली स्वप्ने विणणारा हा वर्ग आहे. जोपर्यंत विषमतेची मुळं त्यांना स्पर्श करीत नाहीत, तोपर्यंत आपल्यापुरत्या विचारांतच हा अडकला आहे. स्पर्धेतून निर्माण झालेल्या स्वत:च्याच असंख्य समस्यांशी झगडा देता देता समाजातील समस्यांचा विचार  करण्याची त्याची इच्छाही उरलेली नाही आणि ऊर्मीही!
 
तर दुसरीकडे हाताला काम नसल्याने व्यसनाधीन झालेले, खर्ऱ्याच्या टपऱ्यांसमोर दिवस-दिवस घालवणारे तरुण किंवा हतबल, हताश तरुणी आहेत. शिकण्यासाठी समान संधी उपलब्ध नसल्याने कासावीस होणारा एक वर्ग आहे. जातीय विषमतेमुळे सतत डावलल्या जाणारा, राजकीय पटलावर सोंगट्यांसारखा नाचवला जाणारा, आपले संपूर्ण भविष्यच झाकोळलेले दिसत असल्याने खचलेला असा हा एक वर्ग आहे. आर्थिक विषमतेनं त्यांची स्वप्ने पार चुरडली गेली आहेत तर जातीय भेदातून, लिंगभेदातून, पारंपरिक कुटुंबसंस्थेतून/ कुटुंबसंस्थेमुळे त्यांच्यावर येणाऱ्या ताण-तणावांमुळे त्यांचा कणा पार मोडून गेला आहे. स्वत:च्या समस्यांशी झगडा देता देता समाजातील समस्यांसाठी लढण्याची उमेदच त्यात उरलेली नाही.
 
एक वर्ग केवळ स्वत:साठी जगतो आहे, समाज त्याच्यासाठी दुय्यम आहे. दुसरा एक वर्ग समाजाची ताकद ओळखतो, पण त्या समाजासाठी काही करण्याची ताकद त्याच्यात नाही.
 
अशी दोन परस्परविरोधी चित्रे प्रत्यक्ष अनुभवत असताना ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज्’ म्हणणाऱ्या वीर दासवर टीकेचे लोट उठतात तेव्हा नेमके त्याने म्हटले त्याचा विरोध असतो की हे तो अमेरिकेत म्हणाला आणि आपल्या देशाची प्रतिमा डागाळली गेली यासाठी तो विरोध असतो हे समजणे कठीण जाते. वीर दासला दिसलेले दोन इंडियाज् हे वास्तव आहे. इंडिया विरुद्ध भारत हा झगडा नवा नाही. कित्येक वर्षांपासून तो सुरू आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण, आहे-रे विरुद्ध नाही-रे, संधी असणारे विरुद्ध संधी नसणारे, उच्चवर्गीय/वर्णीय विरुद्ध इतर असा सगळा हा झगडा आहे. आजचा तरुण वर्ग अधिक मोकळ्या विचारांचा, तुलनेने अधिक समृद्ध आणि पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा अधिक आर्थिक स्थैर्य असणारा असूनही वरील संघर्ष कुठेही कमी होताना का दिसत नाही याचे उत्तर आपल्याला शोधावे लागणार आहे.
 
 
@ यशवंत मराठे 

Leave a commentContact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

 • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS