पाण्याचे कारखाने

जमिनीखालची धरणे
 
2 जुलै 2019 च्या रात्री तिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये कसा हाहाकार उडाला हे तुम्हाला आठवत असेलच. 
 
 
 
 
 
धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दर्शनीय घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी  ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. मग लगेच तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. अरे, जर हे माहित आहे तर मग आजपर्यंत उपाययोजना का नाही केली गेली? का धरणे फुटण्याची वाट बघता आहेत ही मंडळी? ज्यायोगे नवीन धरण बांधण्याच्या कामात सर्वांचे हात ओलेचिंब होऊन भिजतील. निर्लज्जपणाचा कळस आहे. तात्पुरत्या काही घोषणा देखील ताबडतोब देण्यात आल्या. पुढे काय? त्याचा पाठपुरावा कोण करणार?
 
प्रसारमाध्यमांनी अमावस्या, खग्रास सूर्यग्रहण इत्यादी गूढ धाग्यांनी या घटनेवर एक पडदा गुंडाळला. जलसंधारण मंत्र्यांनी त्यांच्या परीने त्याचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न केला (खेकडे वगैरे), परंतु लोकांना तो त्यांच्या ठायी असलेल्या काळ्या विनोद बुद्धीचा आविष्कार वाटला.
 
असो, एकंदरीत काय, मागील पानावरुन पुढे चालू..
 
काही लोकांनी लगेच अशी धरणे बांधणे कसे अयोग्य आहे हे प्रतिपादन हिरीरीने केले. परंतु हे म्हणणे अजिबातच योग्य नाही. धरणे हे आज आपली वैयक्तिक पाण्याची गरज भागवत आहे; उद्योगांसाठी आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज अन्यथा कशी पुरी होणार? आणि महत्वाचे म्हणजे वीज निर्मिती हा आज धरणांचा सगळ्यात मोठा फायदा आहे.
 
आज दुर्दैवाने झालंय काय की अशी छोटी छोटी धरणे म्हणजे – जमिनीची उपलब्धता, त्यांचा बांधकामाचा खर्च, त्यामध्ये राहणारे तांत्रिक दोष, बांधकाम पूर्ण झाल्यावर निकाली निघणारी सदोष धरणं, बांधकामासाठीचा कालावधी, त्यांची मर्यादित उपयुक्तता, त्यामधील पाणी वापरात आणण्यासाठी राबवावी लागणारी खर्चिक यंत्रणा आणि मोठ्या प्रमाणावर खर्च होणारी वीज, धरणाच्या निगराणीसाठीचा खर्च, त्यासाठी पोसावी लागणारी यंत्रणा आणि होणारा प्रचंड निष्फळ खर्च, आणि एव्हढे सर्व करूनही पदरात पडणारं तिवरे धरणासारखं एखादं अपयश, मग त्यामुळे उध्वस्त झालेले विस्थापित, त्यांचे तथाकथित पुनर्वसन आणि त्यासाठी होणारा खर्च आणि त्यामुळे मनामध्ये भीती बसवणारी त्याच्यापुढेच रांगेत असणारी इतर गळकी आणि उपेक्षित धरणांची यादी. म्हणून मग भीक नको पण कुत्रा आवर अशी वस्तुस्थिती.
 
प्रथमतः हे लक्षात घ्यायला हवे की अफाट वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाची पाण्याची गरज अमानुष वाढली आहे आणि त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता कोणत्या मार्गाने व्हायला हवी याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच त्यासाठी पर्यायी विचारांचा शोध घ्यायला हवा. 
 
 
महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असंख्य धरणे बांधली गेली; तसेच त्याच्या कित्येक पटीने जास्त बंधारे बांधले गेले आणि त्यावर प्रचंड पैसा खर्च केला गेला. काही धरणे मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही अर्धवटच राहिली, आणि काही पूर्ण होऊनही त्यांच्या संलग्न व्यवस्था (कालवे इ.) अपूर्ण किंवा सदोष राहिल्याने त्या धरणांची कार्यक्षमता कायमच प्रश्नांकित राहिली. ह्या धरणांनी राज्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असला तरी ती धरणे बांधण्याचा दुसरा मुख्य सिंचनाचा उद्देश आजच्या घडीला तरी बहुतांशी असफल झालेला दिसत आहे. ह्या धरणांमुळे सिंचनाखाली आलेल्या एकूण क्षेत्राची आकडेवारी देण्यास सरकार चक्क चालढकल किंवा टंगळमंगळ करताना दिसते. आणि जो कोणी विरोधी पक्ष असेल त्याला ही सरकारला कोंडीत पकडणे एवढेच उद्दिष्ट असल्यामुळे तात्पुरता गोंधळ घालण्याव्यतिरिक्त ते काहीही करत नाहीत. प्रश्न कोणालाच सोडवायचा नाहीये. लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार अशी आपली केविलवाणी स्थिती. 
 
शेती सिंचनासाठी आजच्या घडीला राज्यातला धरणाच्या क्षेत्राबाहेरील शेतकरी हा पूर्णपणे पावसावर आणि कुपनलिकांवर (बोअरवेल) अवलंबून आहे हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. शेतीसाठी अधिकाधिक खोल जाणाऱ्या कुपनलिकांमधून अमर्याद पाण्याचा उपसा होत आहे, हे आजचे चित्र आहे. त्याचाच परिणाम म्हणून एकूणच जमिनीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. खरं सांगायचं तर “चिंताजनक पातळी” असे म्हणणे म्हणजे स्वतःला फसवत राहण्यासारखेच आहे. पृथ्वीच्या पोटातले पाणी संपले आहे ही वस्तुस्थिती आहे.
 
 
आपण जेव्हा ह्या हजार हजार फूट खोल जाऊन जमिनीच्या पोटातील पाणी अमर्याद उपसणाऱ्या कुपनलिकांना जबाबदार ठरवतो तेव्हा दुसरीकडे नकळतपणे आपण धरणांच्या अपयशावर शिक्कामोर्तब करत असतो. आपण जर आज आपल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या दोन्ही गरजा जर बहुतांशी जमिनीच्या पोटातील पाण्याने भागवत असू तर मग जमिनीवर धरणे बांधण्याचा खर्चिक मार्ग सर्रासपणे आपण का अवलंबतो आहोत याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. पाणी वापरायचं जमिनीच्या पोटातलं आणि ते अनाठायी खर्च करून साठवायचं मात्र जमिनीवर हा आतबट्ट्याचा व्यवहार तर नाही ना, याचा विचार होणे आवश्यक आहे. “जिथलं पाणी वापरायचं तिथंच साठवायचं” ह्या पर्यायाचा विचार सामान्य माणसांसह सर्वांनीच गांभीर्याने करण्याची आता वेळ आली आहे. भूगर्भातील हे पाण्याचे साठे म्हणजे “जमिनीखालची धरणेच” आहेत, जी आपण वर्षानुवर्षे अमानुषपणे केवळ उपसतच आलो आहोत. ही “जमिनीखालची धरणे” निसर्गदत्त आहेत. आजतागायत एकही पैसा खर्च न होता त्यांनी आपल्याला सेवा दिली आहे आणि मानवाने उतमात करून देखील आजतायागत त्यांनी सर्वोत्तम दर्जाची कार्यक्षमता दाखवली आहे. शिवाय ह्या “जमिनीखालच्या धरणांनी” सर्वसामान्य लोकांसाठी नेहमीच एक सहजसाध्य, सर्वसमावेशक, सक्षम आणि स्वावलंबी मार्ग दाखवला आहे.
 
आता ही जमिनीखालची धरणांचे पुनःभरण करण्यासाठी प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनीच ही धरणे पुन्हा प्रयत्नपूर्वक भरण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ह्या जमिनीखालच्या धरणांनी आपल्याला हजारो वर्षे जगवलं आहे. परंतु काळाप्रमाणे बदलत गेलेल्या आपल्या निसर्गविरोधी जीवनशैलीने ती धरणं पुन्हा भरण्याची साधनं कमी कमी होत गेली आहेत आणि त्यांना ओरबडण्याचे प्रमाण मात्र प्रचंड वाढलं आहे. आपल्या ह्या स्वार्थी, अविचारी आणि अदूरदर्शी प्रवृत्तीचे परिणाम म्हणून आजच्या घडीला जमिनीवरची आणि जमिनीखालची अशी दोन्ही प्रकारची धरणं कोरडी पडल्याचे आपल्याला आढळतं. ती ह्या क्षणापासून प्रयत्नपूर्वक भरायला सुरवात केली पाहिजे. अन्यथा पाण्याशिवाय आपल्या भवितव्याचे चित्र आपल्या सगळ्यांनाच स्पष्ट आहे.
 
जमिनीच्या वर असलेल्या धरणांचा विषय आपल्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. परंतु वारसाहक्काने आपल्याला मिळालेली ही निसर्गदत्त जमिनीखालची धरणे पुन्हा एकदा पाण्याने समृद्ध करणे हे केवळ आणि केवळ आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याच हातात आहे. तेसुद्धा कुणाचीही मदत न घेता आणि अगदीच अल्पशा खर्चात. छोट्या छोट्या गोष्टींमधून अविश्वसनीय अशा भव्य दिव्य गोष्टी निर्माण करणे हीच तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची ताकद आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने जर एक छोटीशी, सहजसाध्य आणि अल्पखर्चीक अशी गोष्ट सजगपणे आणि जाणीवपूर्वक केली तर आपण सर्वजण ही रिकामी झालेली जमिनीखालची धरणं पूर्वीसारखीच पाण्याने समृध्द करू शकतो आणि आपले पाण्याचे दुर्भिक्ष कायमसाठी संपवू शकतो. 
 
पाण्याचे कारखाने
 
 
 
ही जमिनीखालची धरणं जर आपल्याला पुन्हा पाण्याने समृद्ध करायची असतील तर त्यासाठी “जमिनीचे पुनर्भरण” हाच एक कुणालाही सहजपणे करता येईल असा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग उपलब्ध आहे. शेती करण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीमध्ये नैसर्गिकपणे जिरण्याचे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बंद पडलेली शेती, जंगलतोड, होणारी विकासकामे इत्यादी गोष्टींमुळे पावसाळ्यात आकाशातून जमिनीवर पडलेल्या पाण्याचा वाहून जाण्याचा वेग खूपच वाढला आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाण्याचे हे जीवनस्वरूप आकाशातील पाणी जमिनीवर पडून ते समुद्राला मिळेपर्यंतच्या कालावधीपूरतेच मर्यादित असते. हा कालावधी हेच “पावसाच्या पाण्याचे आयुष्य” असते. सध्याच्या काळात ह्या कालावधीमध्ये पाण्याला अडवून ते जमिनीमध्ये जिरवणाऱ्या घटकांची (शेती, झाडं, जंगलं, पाळे, मूळे इत्यादी) संख्या कमी झाल्यामुळे जे पाणी थांबत थांबत (जिरत जिरत) वहायचे ते जलदगतीने वाहू लागले आहे. साहजिकच वाहत जाऊन समुद्राला मिळण्यापर्यंतचा त्याचा कालावधी कमी झाला आहे. पर्यायाने पाण्याचे आयुष्य कमी झाले आहे. “ज्याला आपण जीवन म्हणतो त्या जीवनाचेच जीवनमान कमी झाले आहे.” पाण्याचे आयुष्य जर आपल्याला वाढवायचे असेल तर पाण्याचा समुद्रापर्यंतचा हा प्रवास लांबवला पाहिजे. पावलापावलावर जमीन पुनर्भरणाची साधने उभी राहिली, तर ते अशक्य नाही.
 
गेले काही वर्षे बरेच जण टेरेस किंवा छपरावर पडणारे पाणी जमिनीत परत सोडावे असा मार्ग सुचवतात. जिथे पाऊस कमी पडतो तेथील जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता खूप असते पण मिळणारे पाणी अत्यल्प असते. जिथे पाऊस खूप पडतो तेथील जमीन पाणी शोषून घेऊच शकत नाही कारण ती पाण्याने आधीच चिंब झालेली आहे. परंतु पाऊस थांबताच बाष्पीभवनाने ती जमीन कोरडी पडते. 
 
खरं तर छपराच्या पाण्यापेक्षा जर मोकळ्या जमिनीत पाणी साठवले तर कितीतरी जास्त फायदा आहे. परंतु दुर्दैवाने रासायनिक खते वापरून आपणच आपल्या क्षेत्राची धूळधाण केली आहे. जमिनीची पाणी शोषण्याची क्षमताच नष्ट होऊ लागली आहे आणि भूगर्भातील पाण्यासाठी हा सगळ्यात मोठा धोका आहे. 
 
त्यामुळे सरसकट सर्वांना एकसमान उपाय किंवा उत्तर असणार नाही; असूच शकत नाही. आपल्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊन काय करता येईल याचा विचार जर झाला तरच अमंलात आणलेला उपाय योग्य ठरेल
 
फार कमी बाबतीत परतफेडीची संधी निसर्ग आपल्याला देत असतो त्यामुळे निसर्गाचे अंशतः तरी उतराई होण्याची ही संधी आपण साधायला हवी. भूगर्भातील पाण्याचे कारखाने परत कसे भरतील हा विचार सर्वांनी अंगी बाणवायला हवा. 
 
Wake up before it’s too late.. 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 
 
 
प्रेरणा: सुनील प्रसादे यांचा लेख 
 

Leave a commentPrafulla Agnihotri

4 months ago

सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख. खरोखरीच या विषयावर खूप विचारमंथन आणि कार्यवाही अपेक्षित आहे. आत्ताच ठोस पावलं नाही उचलली तर भविष्यात खूप कठीण काळाला सामोरं जावं लागेल. या विषयाचं महत्व बघता याला खूप जास्त प्रसिद्धीची गरज आहे. तेंव्हा हाच लेख अजुन विस्तृत स्वरूपात वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हावा, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या गहन विषयाची माहिती होईल.

विषय खूपच चांगला मांडला गेला आहे. जर काय उपाययोजना करू शकतो याचादेखील लेखाच्या शेवटी आढावा घेतला गेला असता तर लेखाला पूर्णता आली असती असं वाटतं.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS