मिलेनियल्स 

सुमारे सात वर्षांपूर्वी डॉ. अभय बंग यांचे युवकांसमोर झालेले भाषण नुकतेच वाचनात आले. त्यातील काही प्रमुख मुद्दे आणि भाषण वाचून काही विचार मनात आले त्याचा हा गोषवारा.
 
 
 
1990 च्या आसपास जन्म झालेल्या पिढीला मिलेनियल्स असे म्हटले जाते. त्याच वेळी ग्लोबलायझेशन आलं आणि भारतात उदारीकरण झालं. आज त्यांना माधुकरी मागावी लागत नाही. नोकरी नाही मिळाली तर व्यवसाय करीन, असा त्यांना आत्मविश्वास आहे. खिशात मोबाईल आहे आणि हातात लॅपटॉप आहे. ज्यायोगे जगात कुठेही जाण्याचा  आत्मविश्वास आहे. बारा हजार किलोमीटर दूर अमेरिकेपर्यंत या पिढीचा दरारा पसरला आहे. थॉमस फ्रीडमनने लिहिलं आहे, ‘आज अमेरिकेतील आई- वडिलांना आपल्या मुलांना सांगावं लागतं... अरे, मुलांनो अभ्यास करा, नाही तर भारतातली मुलं तुमचे जॉब्ज्‌ घेऊन जातील.’ पुढची चाळीस वर्षं या पिढीची आहेत.
 
परंतु ही पिढी जगतेय कशी?
 
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पहिल्याच पानावर त्रिवेंद्रमची एक ठळक बातमी आली होती. सुजित कुट्टन नावाचा एक तरुण मुलगा व त्याची आई या दोघांचा हसरा फोटो आणि बातमीची हेडलाईन- ‘केप्ट इन डार्क अबाउट हिज फादर्स डेथ, ही रेसेस टू विन.’ त्रिवेंद्रममध्ये प्रांतपातळीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या. त्याचे वडील हार्ट ॲटॅकने हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले होते. परंतु शर्यती दरम्यान मन विचलित होऊ नये म्हणून त्याला त्यांच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली नाही. तो रेसमध्ये धावला आणि त्याने रेस जिंकली. विजयी सुजित कुट्टनचा हसरा चेहरा पाहून असा प्रश्न पडतो - सुजित कुट्टनचे वडील आयसीयूमध्ये जेव्हा एकटे मरत असतील, तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? सुजितने कुठे असायला हवं होतं? तो कशासाठी धावत होता? ते पदक जिंकून त्याने काय मिळवलं?
 
आज ही संपूर्ण पिढी सुजित कुट्टन आहे. सगळ्यांचं काहीतरी मरतंय आणि तरी सर्वजण रेस मध्ये मात्र धावत आहेत. कशासाठी?
 
सर्व ठिकाणी तुलना:
 
मूल जन्माला येऊन दोन-तीन वर्षांचं होत नाही तर चांगल्या केजीमध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरू होते. तिथे निवडप्रक्रिया आहे. लहान मूल पुरेसं हुषार आहे की नाही याची खात्री करायला मुलाची परीक्षा होते. चांगल्या रीतीने त्याने परीक्षा द्यावी, म्हणून या चिमुकल्या पोराला ट्युशन लावली जाते. इथून स्पर्धा सुरू होते. चांगली शाळा, चांगले मार्क, चांगली नोकरी.. मुलाला कितीही चांगले मार्क मिळाले तरी आई इतरांचे मार्क विचारते. स्वतःच्या मुलाला मिळालेल्या मार्कांचा आईला आनंदाचा मागमूस सुद्धा नसतो. ‘या स्पर्धेत तू कितवा?’ एवढाच तिला प्रश्न.
 
आज ही स्पर्धा सगळ्यांच्या मागे कायमची लागली आहे. जी मित्रालादेखील शत्रू म्हणून बघते, तिला स्पर्धा असे म्हणतात. जी ‘मलाच सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे’ असं म्हणते, तिला स्पर्धा असे म्हणतात. आपलं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन स्पर्धामय झालंय. पुढे चांगली नोकरी पाहिजे, चांगला पगार व प्रमोशन मिळालं पाहिजे. यश मिळालं पाहिजे. समाजामध्ये चांगलं स्थान मिळालं पाहिजे. चांगला पगार मिळाला की चांगलं दोन मजली घर मिळालं पाहिजे. यश मिळालं की एक बायकोदेखील हवी. तेदेखील एक पझेशन. हे करता आलं की, एखादी फॉरेन टूर करावी वाटते. कॉम्पिटिशन किंवा कन्झमशन हेच जर सगळं जीवन असेल, तर आपल्या जीवनाला काय अर्थ उरला? असं झालं, तर जीवन एक बंदिवान म्हणून सजा ठरेल. आणि जर अख्खं जीवन सजा झाले, तर मृत्यू हीच त्यातून सुटका व आत्महत्या हीच त्यातून पळवाट. जर आत्महत्या करायची नसेल तर माणसाला उत्तर शोधलंच पाहिजे की, मी जगतो कशासाठी?
 
जीवनाचं प्रयोजन:
 
 
व्हिक्टर फ्रँकेल नावाचा एक मानसरोगतज्ज्ञ होता. तो जर्मन ज्यू होता त्यामुळे तो जर्मनीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कैदी होता. तिथे भयंकर छळ चालायचा. सुटण्याची आशा नाही. त्या छळाला त्रासून दर दोन-चार दिवसांनी एखादा कैदी आत्महत्या करायचा. व्हिक्टर फ्रँकेल मानसरोगतज्ज्ञ होता. त्याच्या लक्षात यायला लागलं की, आपल्याही मनात आत्महत्येचे विचार हळूहळू यायला लागलेत. तो शोधायला लागला की, मी हा आत्महत्येचा विचार कसा थांबवू? इतर कैदीही आत्महत्येचे विचार करताहेत, त्यांचे विचार कसे थांबवू? व्हिक्टर फ्रँकेलला असं आढळलं की- जगण्यासाठी एक अपूर्ण स्वप्न, करायचं जीवनकार्य शोधलं-फुलवलं की जगण्याला प्रयोजन प्राप्त होऊन आत्महत्येचा विचार दूर होतो. त्याचं ‘मॅन्स सर्च फॉर मीनिंग’ हे सुंदर पुस्तक आहे. त्यात तो एक कळीचं वाक्य लिहितो- ‘दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट द हाउ ऑफ लिव्हिंग' (Those who know the WHY of living, have no problem about the HOW of living). मी का जगतो याचं उत्तर ज्यांना सापडलं, त्यांना कसं जगावं हा प्रश्न सतावत नाही. तो प्रश्न सोपा होऊन जातो.
 
जगायचं कसं, हे आयोजनाचे प्रश्न आहेत; पण महत्त्वाचा आहे जीवनाच्या प्रयोजनाचा प्रश्न. प्रयोजन सापडलं की आयोजन दुय्यम होऊन जातं. आज सगळे आयोजनाच्या प्रश्नात मग्न आहेत. त्यामुळे कशासाठी जगतो आहोत, सुजित कुट्टन का रेस धावत आहे, याचं उतर शोधायला आपल्याला फुरसत नाही. मित्रांनो, जन्माला येणे अथवा जिवंत असणे यात पराक्रम  काहीही नाही. तरुण असल्यामुळे मरणाला अजून बराच वेळ आहे. खरा पराक्रम आपण जगतो कशासाठी हे शोधण्यामध्ये.
 
जीवनाचा सौदा:
 
जगात पैसे किती आहेत? आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे पैसे जगात आहेत. एकट्या अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न 17 ट्रिलियन डॉलर आहे. जगात पैसे अमाप आहेत आणि तुमच्याकडे आयुष्य एकच आहे आणि त्यामुळेच ते अमूल्य आहे. आयुष्याला पैशापेक्षाही मौल्यवान असा हेतू पाहिजे. आपल्या मरणापूर्वी तो हेतू शोधणं, हे प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे; ही त्याची जबाबदारी आहे. केवळ अर्थप्राप्तीसाठी जगू नका, अर्थपूर्ण जगा!
 
आसपासचं जग:
 
आता भारतात मोठा विलक्षण काळ सुरू आहे. रोज नव्या-नव्या टेक्नॉलॉजी येत आहेत. हा काळ ग्लोबलायझेशनचा. भौगोलिक सीमांच्या विलयाचा; पुण्याची माणसं पेनसिल्व्हानियामध्ये गेली आणि पंजाब व बिहारची माणसं पुण्यात आली. हा काळ गतिमान समयाचा, तांत्रिक विस्मयाचा, भौगोलिक विलयाचा आणि आर्थिक उदयाचा. भारताचा आर्थिक विकास होतो आहे. तीन ट्रिलियन डॉलरच्याजवळ भारताची इकॉनॉमी पोचली आहे. साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. एक आदर्श राज्य निर्माण करू पाहणारी वाटचाल आज पार रसातळाला पोहोचली आहे. उद्योगपती असो की राजकीय नेता; सगळ्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत.
 
 
खलिल जिब्रान असं म्हणायचा की- संपूर्ण झाडाच्या संमतीशिवाय एक पानदेखील गळून पडू शकत नाही. अख्खं झाड मूकपणे बघत राहतं, संमती देतं; तेव्हा ते पान गळत असतं. समाजामध्ये जे-जे घडतं- भ्रष्टाचार असो की बालमृत्यू- आपली सर्वांची संमती असते म्हणूनच तो  अन्याय घडतो. म्हणून त्या अन्यायाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आपण या अन्यायात भागीदार आहोत. या प्रचंड मोठ्या कंपनीचे आपण शेअर होल्डर आहोत. आपल्याला हे सुरू ठेवायचं आहे, की भागीदारीतून बाहेर पडायचं आहे? जर सामील व्हायचं नसेल, तर आज हे जग जसं आहे तसं राहायला नको. हे जग बदलण्याची अपेक्षा आजच्या तरुणांकडून आहे.
 
‘जग कोण बदलणार?’ असं विचारलं की, आपण अपेक्षेने शेजाऱ्याकडे पाहतो. हे काम दुसऱ्याने करावं; शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा.
 
परिवर्तन कोण करणार?
 
बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. पण आपल्याला असं वाटतं की- मी लहान आहे, नगण्य आहे, अडथळे आहेत; मी काय करणार? पर्यावरणाच्या क्षेत्रात एक सुंदर वाक्य आहे- ‘टिंबक्टूमध्ये एका फुलपाखराने पंख फडफडवले तरी त्यामुळे शेवटी पॅसिफिक समुद्रात वादळ निर्माण होऊ शकतं.’ या जगात अनंत गोष्टीच एकमेकांशी निगडित आहेत. छोट्याशा कृतीचा परिणाम काय होईल याची कल्पना कोणी करू शकत नाही. सामान्य माणूस आता छोटा उरला नाही, असामान्य झाला आहे. फक्त बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी.
 
मानवजातीच्या इतिहासात एका आयुष्यात सगळ्यात जास्त पैसे कमावलेला माणूस म्हणजे बिल गेट्‌स. हा जगातला नंबर एकचा श्रीमंत माणूस होता. त्याने काय करावं? त्याने आपल्या संपत्तीतली पन्नास अब्ज डॉलर्सची संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करून टाकली. त्याने  मायक्रोसॉफ्टमधून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ सामाजिक कामात वाहून घेतलं. आता तो जगातला नंबर एकचा श्रीमंत उरला नाही.
 
पण याहूनही मोठा चमत्कार पुढचा. जो जागतिक श्रीमंतांच्या यादीत नंबर दोन होता, वॉरन बफे- तो आता नंबर एक झाला. तुम्हाला माहीत आहे, सर्वांत जास्त श्रीमंत होण्यासाठी किती गळेकापू स्पर्धा असते. श्रीमंत क्रमांक एक झाल्यावर वॉरन बफेने काय करावं? तो म्हणाला, मला पैसे कमावता येतात; पण मला ते समाजसेवेसाठी वापरता येत नाहीत. त्याने आपली संपत्ती बिल गेट्‌सला सामाजिक कार्यासाठी दान दिली.
 
 
हे काय घडतं आहे? आता भारतातही ते घडायला लागलं आहे. आपण वाचलं असेल की, अझीम प्रेमजींनी भारतातील शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी आठ अब्ज डॉलर्स दान द्यायचं जाहीर केलंय. हे तिघे आपल्याला काय सांगताहेत? ‘आम्ही अमाप पैसा कमावला, पण शेवटी या पैशात समाधान नाही.’ म्हणून पैसा दान देऊन ते समाजसेवेकडे वळले आहेत.
 
जग कसं बदलावं?
 
हे जग कसं बदलावं? अनेक पर्याय आहेत. सेवेची कृती, वैज्ञानिक संशोधनाची कृती, निषेधाची कृती, संघटनेची कृती, जागृतीची कृती. अजून एक पर्याय तुमच्या-माझ्या हातात आहे. तो म्हणजे, सांस्कृतिक बदलाचा. तुम्ही आणि मी रोज कसे जगतो, ते म्हणजे संस्कृती. मी रोज कसा जगतो, हे माझ्या हातातच आहे. त्यातूनच संस्कृती आकार घेते, घडते.
 
करिअर आणि कंझम्प्शन यात सर्व व्यग्र आहेत पण आपल्या कन्झंप्शनमधून पृथ्वीचं काय होतंय याचा विचार करा. परंतु आपल्या अमर्याद इच्छा संपतच नाहीत. आपल्या इच्छांना अंतच नाही. मनाचा हा स्वभावच आहे, ते कधीच तृप्त होत नाही. या पृथ्वीतलावरती प्रत्येकाच्या गरजेपुरतं आहे, पण लोभापुरतं नाही. म्हणून परिवर्तनाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागते. ‘बी द चेंज युवरसेल्फ.’
 
हे समाजातले दुःख, प्रश्न सोडवायचे कसे? ‘रंग दे बसंती’ सिनेमा आहे. त्यात खुशालचेंडू तरुण आयुष्यात मजा-मस्ती करत असतात. एक प्रचंड भ्रष्टाचार बघतात आणि त्यांचं माथं सणकतं. ते त्यास भ्रष्ट नेत्यांना गोळ्या घालतात. प्रश्न सुटला का?
 
तुमचा संकल्प:
 
पुढची चाळीस वर्षं तुमची आहेत. आयुष्य ही तुम्हाला एकदाच मिळणारी संधी आहे. संकल्प करा की, आजचं हे जग मला मान्य नाही. जशा जगात मी जन्माला आलो, तशा जगात मी मरणार नाही. हे जग मी बदलून जाईन. माझं आयुष्य खूप अमूल्य आहे. पैशांसाठी मी माझं आयुष्य विकणार नाही, मी भोगला जाणार नाही. मी जेव्हा विकायला तयार होतो, तेव्हा मी भोगला जातो. मी माझ्या जीवनाला एक हेतू, एक प्रयोजन प्रदान करेन. जिथे प्रश्न आहे तिथे मी जाईन. जिथे गरज नाही तिथे गर्दी करून मी स्वतःच एक प्रश्न बनणार नाही. इतरांच्या जगण्याच्या समस्या कशा सोडवायच्या, यातून ‘जगायचं कशासाठी’ ही माझी समस्या सुटते. दुसऱ्याच्या जगायच्या धडपडीत माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. मी माझ्या जीवनाला प्रयोजन, अर्थ प्रदान करीन.
 
आजच्या मिलेनियल पिढीने हा विचार करावा.
 
 
@ यशवंत मराठे

Leave a comment



Sadhana Sathaye

3 years ago

I agree. You have well explained your view.
In my capacity I try and counsel the young generation( my students). I literally explain them that marks n numbers have nothing to do with intelligence, success or quality life. Acquire knowledge as information is at your fingertips. They are responding positively as I can see it. Parents need to be counselled as well. I know for sure that there is a place for everyone in this world, you need to find it. The fierce competition is also due to population surge. We can’t ignore that. We need to counsel masses about this issue as well

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS