गौरव दिवस

हिंदुत्व रक्षणाकरिता प्राणाहुती देणारे भगवान बिरसा
 
वनवासी बहुल क्षेत्रांमध्ये धर्मांतरण एक मोठी सांस्कृतिक व सामाजिक समस्या बनून समोर आली आहे. अशा वेळी केवळ २५ वर्ष आयुष्यमान लाभलेले, मिशनरी आणि इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारे, भगवान बिरसा मुंडा यांची तीव्रतेने आठवण येते. ज्यांनी फक्त अकरा वर्षाच्या अल्पकाळात ख्रिस्ती धर्मगुरूंचे वनवासींना षडयंत्र रचून, ख्रिश्चन बनविण्याचे मनसुबे उधळून लावले होते. केवळ चर्चद्वारे वनवासी बंधूंच्या मनात भरविल्या जाणाऱ्या अंधविश्वासालाच रोखले नाही, तर वनवासींच्या मनात स्वाभिमानी स्वतंत्र जीवनाचा मंत्रही जागवला.
 
भगवान बिरसा मुंडा यांनी ख्रिस्ती झालेल्या वनवासी बंधूंना, सनातन धर्मात परत आणण्यासाठी बिरसायत नावाचे आंदोलन चालवले आणि याच नावाने एक पंथ चालवला, त्याला बिरसाइत म्हणतात. गुरुवार हा दिवस बिरसाइत धर्म मानणाऱ्यांमध्ये महत्त्वाचा असतो. बिरसा मुंडा यांनी एक हुंकार भरला होता, हैंदे राम्बडा रे केच्चे-केच्चे पुण्ड्रा राम्बडा रे केच्चे-केच्चे म्हणजे जो आमचा धर्म बदलायला बघतो आहे, त्याला दुसरा जन्म द्यायचा आहे (अर्थात मारायचे आहे). ज्यामुळे इंग्रज त्यांच्या निधनानंतरही, जंगल पर्वतांमध्ये राहणाऱ्या वनवासींना बंदूक आणि तोफांनी सुद्धा दाबू शकले नाहीत.
 
सन १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांनी बारा शिष्यांची नेमणूक, बिरसायत पंथाचा प्रचार करण्यासाठी केली होती. या पंथाला मानणारे काही हजारातच होते. त्यांची संख्याही आता हळूहळू कमी होते आहे. बिरसायत पंथाच्या नियमांचे पालन करणे फार कठीण आहे. बाजारचे काही खात नाहीत, तसेच दुसऱ्याच्या घरातीलही खात नाहीत. गुरुवारी फुलं, पानं, काडी तोडत नाहीत, एवढेच काय शेतीमध्ये नांगर पण चालवत नाहीत, उजळ रंगाचे (पांढरे) सुती कापड वापरतात. पूजेसाठी फुलं, प्रसाद, दक्षिणा, अगरबत्ती यांच्या वापरास सक्त मनाई आहे. बिरसायतचे अनुयायी फक्त निसर्गाची पूजा करतात, भक्तीगीत जातात. त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या कमी आहे. हा पंथ मानणारे जानवं घालतात, शाकाहारी खानपान, नशापान व्यर्ज, साधारण वस्त्र यामुळे त्यांचे खर्चही कमी असतात. नशापान नाही त्यामुळे भांडणं कमीच, त्यामुळे बिरसायत पंथ मानणाऱ्या वनवासींचा जीवन स्तर इतर जनजाती वनवासींपेक्षा थोडा उंचावलेला आहे. 
 
भगवान बिरसा मुंडांनी आपल्या पंथाद्वारे निसर्गाची (प्रकृतीची) रक्षा करायला प्राधान्य दिले. बिरसायतचा मुळ उद्देशच होता की, निसर्गाकडून फक्त गरज आहे तेवढेच घ्यावे आणि अधिक निसर्गाला परत द्यावे. याच उदात्त उद्देशामुळे रांची, सिमडेगा, झारखंड येथील जनता आज भगवान बिरसा मुंडा यांचे स्मरण करते.
 
बिरसा मुंडा यांचा जन्म उलीहातू या गावांमध्ये १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातील आत्ताच्या खुंटी जिल्ह्यामध्ये झाला होता. तोपर्यंत १८५७ च्या क्रांतीमुळे इंग्रज सतर्क झाले होते. इंग्रजांच्या काळ्या कायद्यामुळे भारतीय शेतकरी त्रस्त होते. जमिनी संबंधातील कायद्यांमुळे शेतकरी आणि वनवासींची जमीन हडपली जात होती. ब्रिटिश कायद्यानुसार वनवासींची कृषी व्यवस्था मोडीत काढून परिवर्तनाला प्रारंभ झाला. बिगर वनवासी शेतकऱ्यांना वनवासी क्षेत्रात बसवण्यासाठी आणि शेतीसाठी आमंत्रित केले गेले. अशा प्रकारे वनवासींच्या जमिनीवर एक प्रकारे अतिक्रमणात झाले. छोटा नागपूर (म्हणजेच झारखंड राज्याचा अधिकतम भाग आणि पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड यांचा थोडा भाग) मध्ये १८७४ पर्यंत या भागातील मुंडा आणि इतर वनवासींच्या अधिकारांना पूर्णपणे समाप्त करण्यात आले होते.
 
बिरसा हे मुंडा जनजातीमधील होते. वनवासीचे अधिकार संपुष्टात आल्यामुळे, ते नव्याने आलेल्या जमीनदारांच्या ठेवलेल्या शेतकऱ्यांकडे, मजूर म्हणून काम करू लागले. त्यातच वनवासींच्या पंथ परिवर्तनामुळे बिरसा मुंडा यांनाही शिक्षणासाठी आपला पंथ बदलावा लागला. जर्मन मिशन स्कूलमध्ये शिकताना ते बिरसा डेव्हिड होते नंतर ते बिरसा दाऊद पण झाले. स्वातंत्र्यसंग्रामामुळे प्रभावित झालेल्या त्यांच्या आईने त्यांना जर्मन स्कूल मधून बाहेर काढले आणि बिरसा मुंडा यांचा परिवार पुन्हा आपल्या पारंपारिक पंथात परतला. या सर्व प्रकरणावरून धर्म आणि दबाव तंत्र यांचा वापर, ही भांडवलशाही संस्कृतीची मंडळी कशी करत होती, हे सिद्ध होते. केनियाचे नेते जोमो केन्येटा यांची एक उक्ती सुप्रसिद्ध आहे, "जेव्हा ब्रिटिश आफ्रिकेत आले तेव्हा त्यांच्या हातात बायबल होती व आमच्याकडे जमीन, त्यांनी आम्हाला सांगितले चला प्रार्थना करूया, आम्ही जेव्हा डोळे उघडले तेव्हा आमच्याकडे बायबल होती आणि त्यांच्याकडे आमची जमीन"
 
"उलगुलान", ज्याचा अर्थ होतो प्रस्थापितांविरुद्धचे बंड, उठाव, हल्लाबोल तर हिंदीमध्ये त्याला भारी कोलाहल आणि उथलपुथल असे म्हणतात, त्याला मुंडांनी जन्म दिला आणि बिरसा मुंडा यांना भगवान बनवले.
 
भगवान बिरसा मुंडांनी सन १८६९ साली लागू झालेल्या वन संरक्षण कायदा, या जुलमी कायद्याच्या विरोधात (ज्यामुळे वनवासींची उपजीविका बंद झाली होती), १८९५ मध्ये सर्व आदिवासींना एकत्र घेऊन लढाईचे आवाहन केले. ब्रिटिश सरकार विरोधात उलगुलान आंदोलनाची हाक दिली आणि बिरसा मुंडा वनवासींचे महानायक नव्हे तर भगवान झाले.
 
बिरसा मुंडा यांनी १८८५ मध्ये ख्रिस्ती धर्माचा त्याग केला. स्वतःला ईश्वराचा अवतार घोषित करून, आपला जन्म आदिवासींची गमावलेली सत्ता आणि सन्मान परत मिळवून देण्यासाठी झालेला आहे, असे घोषित केले. त्यांनी लोकांना विक्टोरिया राणीचे राज्य संपून मुंडाराज सुरू झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी महसूल (कर) देऊ नये असा आदेश दिला. याकरिता त्यांना २४ ऑगस्ट १८९५  रोजी अटक करुन दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. २८ जानेवारी १८९५ रोजी तुरुंगातून सुटका होताच त्यांनी पुन्हा आपल्या जुन्या सामाजिक कार्यात झोकून दिले. यावेळी त्यांच्या कार्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे धर्मांतरण रोखणे हा होता.
 
त्यामुळे ख्रिस्ती मिशनरी क्रोधीत झाले आणि बिरसा मुंडा हे भूमिगत झाले. परंतु क्रांतीची मशाल त्यांनी भूमिगत राहूनही धगधगत ठेवली. २८ जून १८९८ रोजी सामाजिक बरोबरी करण्यासाठी, रांची मधील चुटिया येथील राम मंदिरात शपथ घेत, आदिवासींना दारू न पिण्याचे आवाहन करत, बिरसायत पंथाची घोषणा तसेच इंग्रजांविरोधात उलगुलान सुरू केले.
 
उलगुलानची घोषणा होताच  "अबुआ दिसुन" म्हणजेच स्वराज्य कायम झाल्याचे घोषित करण्यात आले. १८९९ च्या डिसेंबर मध्ये ख्रिसमसच्या वेळी ७००० वनवासींनी ख्रिस्ती धर्माचा त्याग केला, कर देणे बंद केले. मुंडा, उंराव आणि खारीया जनजातीचे लोक त्यांना बघण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मैलोनमैल यात्रा करत येत असत. ते आता वनवासींचे संत, गुरु आणि भगवान बनून गेले होते. आजही तेथील लोकगीतांमध्ये बिरसा यांचा प्रभाव साफ दिसतो. वनवासी संस्कृती पुनर्जीवित करण्याचे श्रेय म्हणूनच बिरसा मुंडा यांना जाते.
 
अबुआ दिसुनच्या घोषणेनंतर ५ जानेवारी १९०० रोजी, बिरसा मुंडांच्या साथीदारांनी दोन पोलीस शिपायांची हत्या केली. लगेच दोन दिवसांनी पुन्हा खुंटी पोलीस ठाण्यावर हल्ला करत आणखी एका पोलीस शिपायाची हत्या केली. ज्यामुळे बिरसा मुंडा यांच्यावर ब्रिटिशांनी पाचशे रुपयांचे बक्षीस ठेवले व १५० सैनिकांची एक तुकडी खुंटी येथे पाठवली. डुंबारी पर्वतांमध्ये लपलेल्या क्रांतिकारकांवर इंग्रजांनी बेधुंद गोळीबार केला. जसा जालियनवाला हत्याकांडात केला होता. इंग्रजांनी मृत्युदेह दरीत फेकून दिले व अनेकांना जिवंत जाळून टाकले. जालियनवाला हत्याकांडापेक्षाही क्रूर प्रकार येथे घडला होता. पण बिरसा मुंडा पळून जाण्यात यशस्वी झाले. सिंहभुमच्या पर्वतांमध्ये लपले होते. ते कधीच पकडले गेले नसते, पण पाचशे रुपयांचा झालेला मोह आपल्या नेत्यापेक्षा मोठा ठरला, जवळच्याच साथीदाराने खबरीचे काम केले आणि चक्रधरपुर पोलिसांनी ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसा मुंडा यांना पकडले.
 
प्रसिद्ध लेखिका महाश्वेता देवी बिरसा मुंडा यांच्या अटकेचे वर्णन करताना म्हणतात, बिरसाच्या हातात बेड्या, दोन्ही बाजूला दोन शिपाई, डोक्यावर पगडी आणि फक्त धोतर घातले होते, अंगात दुसरे काही नव्हते. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. स्त्रिया आक्रोश करीत होत्या, आकाशाकडे बघून हातवारे करीत होत्या. पुरुष म्हणत होते की, "ज्याने तुला पकडवले त्यांना माघ महिना पण पुरा होताना दिसणार नाही‌". पण बिरसाने त्यांना समजावले, "अरे पाचशे रुपये भरपूर असतात, आपण स्वप्नात पण दहा रुपयाच्या वर कधी बघत नाही. का नाही होणार त्यांना मोह?"
 
अटकेच्या चारच महिन्यात ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला. सकाळी रक्ताची उलटी होऊन त्यांचा मृत्यु झाला. विष घालून त्यांना मारण्यात आले, असा अनेकांचा समज आहे.
 
बिरसा मुंडा भारतीय संस्कृतीचे रक्षक होते, धर्मांतरण करणाऱ्या मिशनऱ्यांचा त्यांनी कायम विरोध केला. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या हिंदूंना इंग्रजांच्या षडयंत्राची जाणीव करून देण्यासाठी, त्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रचार करायला सुरुवात केली होती. झारखंड, ओरिसा, बिहार आणि पश्चिम बंगालचे वनवासी बिरसा मुंडा यांना ईश्वर म्हणून पुजतात. फक्त पंचवीस वर्षे आयुष्यमान लाभलेल्या बिरसांनी, इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी वनवासी बांधवांना स्वदेशी आणि भारतीय संस्कृतीप्रती जागृत केले.
 
 
 
 
भारत सरकारने १५ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्णय घेतला आणि आता भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीर वनवासी लढवय्यांच्या स्मृतींना समर्पित राहील आणि पुढच्या पिढीला देशाप्रती त्यांच्या हौतात्म्याची आठवण करून देत राहील.
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com 
 
 
 
संदर्भ:
 
Search of Values from the Lives of Great Man (page 144-145)
 
भगवान बिरसा मुंडा और उनका आंदोलन: कुमार सुरेश सिंह 
अरण्येर अधिकार: महाश्वेता देवी

Leave a comment



दिलीप सुळे

1 year ago

फार सुंदर माहिती..वाचनात कधीच न आलेली.माझ्यासाठी तरी.

Jayant Sathe

1 year ago

A wonderfully researched piece. I had never even heard of this true freedom fighter.
I am sure there are several such stories around the country and I hope you are successful in bringing them out to average readers like me.
Thank you for doing this.
Jayant

स्नेहा धारप

1 year ago

खूपच वेगळी व नवीन माहिती कळली. समाजासाठी कमी आयुष्यात केवढं मोठं योगदान दिलं आहे यांनी.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS