शापित अप्सरा

सौंदर्याची व्याख्या ही व्यक्ती सापेक्ष असते. कुठल्या पुरुषाला कुठली बाई आवडेल (मी पुरुष असल्याने फक्त तेवढ्याच बद्दल बोलतो) हे सांगणे महाकर्मकठीण काम. पण जेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीचा विचार करतो तेव्हा काही नावे प्रामुख्याने समोर येतात. मी काही सगळी नावे घेत बसणार नाही कारण या लेखाचा तो विषय नाही. सर्वसाधारणपणे मधुबाला ही सगळ्यात सौंदर्यवती नटी होती यावर फारसे दुमत होणार नाही. पण तिच्यानंतर कोण आवडते हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. कोणाला सात्विक, सोज्वळ रूप आवडते, तर कोणाला थोडे उन्मादक तर कोणाला सेक्सी. 
 
पण लेख माझा आहे त्यामुळे मला कोण आवडतं ते सांगणं महत्वाचे; नाही का? 
 
माझ्या नजरेतून "साधना शिवदासानी" हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक गोड गुलाबी स्वप्न होतं. मला असं वाटतं की मधुबालानंतर खऱ्या अर्थाने ‘जन्नत की परी’ हे विशेषण जिला बहाल करावं अशी एकमेव साधना. अतिशय शालीन, निरागस पण तरी देखील काहीसं खट्याळ व्यक्तिमत्व. पण उत्तान.. प्रमत्त.. उन्मादक असं तिच्या सौंदर्यात काहीच नव्हतं. मंदिरातून पूजा आटोपून, हातात प्रसादाचं ताट घेऊन अतिशय शालीनतेने समोर येणारी ललना, अशी काहीशी पवित्र, सोज्वळ भावना तिला पाहिल्यावर निर्माण व्हायची. 
 
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे चरित्र अभिनेते हरी शिवदासानी; बबिता ही त्यांची मुलगी. तर साधना पुतणी. राज कपूर आणि हरी शिवदासानी हे पुढे तर एकमेकांचे व्याही झाले. ‘श्री 420’ या चित्रपटातील एका गीताच्या चित्रणाच्या वेळी राज कपूर यांनी साधनाला समूह-दृश्यांत उभी केली. परंतु “चित्रपटात अभिनय करणे हे तुझे काम नव्हे. तू रीतसर लग्न वगैरे करून घरसंसार, मुले-बाळे सांभाळ. त्यातच तुझे भले आहे” असा अनाहूत आणि अपमानास्पद सल्ला, त्या कोवळ्या वयातील साधनाला दिला.
 
काळ त्यावेळी उपहासाने खदखदा हसला असेल बहुतेक. कारण दैवाच्या मनात या अप्सरेसाठी यशाचा गालीचा उलगडण्याचा बेत होता.
 
१९६० साली ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटातून नायिका म्हणून चंदेरी दुनियेत पदार्पण केले त्यावेळी ती अवघी एकोणीस वर्षांची होती. तिचा अवखळ, उत्स्फूर्त अभिनय आणि भुरळ पाडणारं स्मितहास्य याने तमाम सिने-रसिकांना, निदान मला तरी जिंकलं. जॉय मुखर्जी नामक ठोकळा नायक असून देखील तो चित्रपट भरपूर चालला. 
 
बिमल रॉय यांच्यासारख्या रत्नपारखी दिग्दर्शकाने साधनाला ‘परख’ या चित्रपटांत नायिकेच्या भूमिकेत संधी दिली. समोर होता मोतीलाल यांच्यासारखा अभिनयातला उत्तुंग हिमालय. म्हणजे दहावीच्या परीक्षेला मास्टर्सची प्रश्नपत्रिका समोर यावी, असा खडतर योग. पण त्या दिव्यातूनही साधना सोन्यासारखी लखलखून बाहेर आली. अतिशय साध्या-भोळ्या, ग्रामीण तरुणीची व्यक्तिरेखा साधनाने एवढ्या सहजतेने वठवली की सिने-रसिकांबरोबर समीक्षकांनाही तिची दखल घ्यायला भाग पाडले. 
 
 
नवकेतनच्या ‘हम दोनो’ चित्रपटाने तिच्या यशाचे दरवाजे सताड उघडले. यात तिच्यासमोर होता चित्रपटसृष्टीतील मदनावतार देव आनंद, दुहेरी भूमिकेत. मुळात देव आनंद चित्रपटांत असेल तर सहकलाकारावर कितीसा कॅमेरा येणार ? पण हे सारे अवघड अडथळे आपल्या बटांसारखे बाजूला सारून, साधनाने स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले. ‘अगर मै रुक गई अभी, तो जा न पाउँगी कभी; यही कहोगे तुम सदा के दिल अभी नही भरा” या ओळी म्हणताना संकोच, लज्जा, हुरहूर, बेचैनी आणि नायकाला चिडवण्याचा अवखळपणा या सर्वांचे अप्रतिम मिश्रण तिने डोळे व चेहरा यांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोचवले.
 
 
त्यानंतर आलेली 'असली-नकली' सिनेमातील देव बरोबरची भूमिकाही यशदायी ठरली. त्या चित्रपटातील तिचे 'तेरा मेरा प्यार अमर' हे गाणे कायमच श्रवणीय पेक्षा बघणीय म्हणून माझ्या डोक्यात पक्कं बसलेले आहे, त्यात तो साधना कट नाही, फिट्ट ड्रेस नाही, आहे ते फक्त एक सोज्वळ, सुंदर आणि मनावर ठसलेलं सालस सौंदर्य. 
 
 
यानंतर आला तो राज खोसला दिग्दर्शित ‘एक मुसाफिर एक हसीना’ हा रहस्यमय-रोमांटिक म्युझिकल चित्रपट. ओ.पी. नय्यर यांच्या बहारदार संगीताने नटलेल्या या चित्रपटात साधनाने पहाडी युवतीची भूमिका केली होती. पंजाबी ढंगाची धमाल चालीची ओ.पी. चा ठसा असलेली गाणी तिने ठसक्यात सादर केली. आणि नुसताच अभिनय नव्हे तर पदन्यासांत सुद्धा आपली तयारी किती आहे ते तिने सिद्ध केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. हे सर्व श्रेय संगीत आणि साधना यांचे. कोणत्याही चित्रपटाला नायक असला पाहिजे असा नियम असल्यामुळे जॉय मुखर्जी होता. राज खोसला साधनाच्या अष्टपैलू कामगिरीवर बेहद्द खूष झाले. ‘साधनाचा सहभाग असलेल्या चित्रपटाला भरभरून यश’ हे आता हिंदी चित्रपटसृष्टीत समीकरण झाले होते. आतापर्यंत देव आनंद, दिलीप कुमार यांच्या केशरचनेची तरुणाईला भुरळ पडली होती. पण आता साधनाच्या हेयर-स्टाईलने या सर्वांवर मात करीत स्वतःची केशरचना लोकप्रिय केली.
 
यशाची एकामागून एक शिखरे पादाक्रांत करताना, एच.एस. रावेल यांच्या ‘मेरे मेहबूब’ या साधनाची जादू असलेल्या नितांतसुंदर प्रेमकथेचे आगमन झाले. सोबत नायक होता राजेंद्र कुमार. नौशाद यांचे संगीत या चित्रपटाला लाभले होते; म्हणजे सोने पे सुहागा. यातील साधनाची ‘हुस्नाद’ ही नायिकेची भूमिका प्रचंड गाजली. अभिनयाबरोबरच तिने आपले नृत्यकौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केलं.
 
 
राज खोसला यांना साधनाच्या अभिनयाने एवढे भारून टाकले होते की ‘वह कौन थी ?’ या आपल्या रहस्यमय चित्रपटातील दुहेरी भूमिका फक्त साधनाला डोळ्यासमोर ठेवून विकसित केली. साधना नायिका असल्यावर समोर कोणताही ठोकळा असला तरी चित्रपट यशस्वी होतो, हे सिक्रेट राहिले नव्हते. या चित्रपटात तिच्यासमोर ‘मनोज कुमार’ होता. “जो हम ने दास्ताँ अपनी सुनाई, आप क्यूँ रोये?” “नयना बरसे रिमझिम रिमझिम” आणि "लग जा गले, के फिर ये हसीं रात हो न हो" या नितांतसुंदर गाण्यातून गूढता, वेदना तिने अचूक दाखवली. हाही चित्रपट यशाची कमान आणखी उंचावून गेला. 
 
साधनाला आपल्या चित्रपटांत घेण्यासाठी बड्या निर्मात्यांची चढाओढ सुरु झाली. त्यात बी.आर. चोप्रा यांचा ‘वक़्त’ हा जबरदस्त स्टारकास्ट असलेला चित्रपट आला. सुनील दत्त, राज कुमार यांच्यासारखी मेन डिश आणि शर्मिला टागोर, शशी कपूर हे तोंडी लावायला. पण ‘कौन आया के निगाहो मे चमक जाग उठी, दिल के सोयी हुई तारो मे चमक जाग उठी” या गाण्याच्या दृश्यांत साधनाने राज कुमारसहित चाहत्यांची पण दांडी गुल केली.
 
पुन्हा एकदा राज खोसला यांनी ‘मेरा साया’ या चित्रपटात दुहेरी भूमिकेसाठी साधनाचीच निवड केली. एक अतिशय शालीन, कुळाचार पाळणारी, खानदानी पत्नी तर दुसरी आयुष्य वाऱ्यावर उधळून गुंडाला साथ देणारी बेगुमान तरुणी. अगदी टोकाच्या भूमिका. पण साधनाने त्या अशा कुशलतेने सादर केल्या की एकच अभिनेत्री या दोन भूमिका करत आहे, यावर विश्वास बसणे कठीण झाले.
 
 
 
शम्मी कपूर बरोबर तिचा ‘राजकुमार’ हा चित्रपटही गाजला. तसंच संजय खान याच्याबरोबरचे ‘इंतकाम’ व ‘एक फूल दो माली’ हे चित्रपटही यशस्वी ठरले. 
 
यानंतर 'दुल्हा-दुल्हन' या चित्रपटासाठी दिग्दर्शक रवींद्र दवे यांनी नायक म्हणून राज कपूर यांची निवड केली. नायिका कोण ? या प्रश्नावर पद्मिनी, वैजयंतीमाला, सरोजादेवी, नंदा असे अनेक पर्याय चर्चेत आले. पण राज कपूर यांनी साधनासाठी ‘आग्रह’ धरला. ज्या साधनाला ‘तू घरसंसार आणि मुले-बाळे सांभाळ, अभिनय तुला जमणार नाही’ असा अपमानास्पद आगावू सल्ला ज्या माणसाने दिला होता, त्यालाच तिची गरज वाटावी, हा दैवाने त्याला शिकवलेला धडा होता आणि त्याला तिच्या पायाशी याचना करत जावे लागले.
 
त्यावेळी साधनाच्या शेजारी राज कपूर म्हणजे काश्मिरी सफरचंदाच्या बाजूला सुरणाचा गड्डा. ‘अराउंड द वर्ल्ड’ या चित्रपटात राज कपूर आणि राजश्री यांची अशीच विजोड जोडी प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारी होती. 
 
इंतकाम चित्रपटांत ‘कैसे रहूँ चुप की मैने पी ही क्या है, होश अभीतक है बाकी” हे ’हेलन-छाप’ बेहोष गीत तिने पडद्यावर सादर केलं खरं.. पण त्यात उन्मादापेक्षा जाणवलं ते कारुण्य आणि नायिकेची अगतिकता. हा खास साधना टच. याच अभिनयशैलीने तिने ‘जो हम ने दास्ताँ अपनी सुनाई, आप क्यूँ रोये ?’ हे मदन मोहन आणि लता यांनी अजरामर केलेलं गीत, पडद्यावर साकार करताना प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रूंची बरसात घडवून आणली. 
 
असा दृष्ट लागण्यासारखा कलाक्षेत्रातील व्यावसायिक प्रवास सुरु असताना अचानक दैवाने त्यात मिठाचा खडा टाकला.
 
साधनाला थायरॉईडच्या व्याधीने ग्रासले. गळ्याभोवती सूज, डोळे विस्फारणे आणि असे अनेक शारीरिक त्रास सुरु झाले. शरीर थकू  लागले. आवाजातली ती जादू अस्तंगत व्हायला लागली. अखेर साधनाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचे निश्चित केले. बहरून फुललेल्या गुलाबाच्या पाकळ्या हळूहळू गळून पडत होत्या. एकेकाळी साऱ्या बागेचे वैभव असलेला तो गुलाब आता काट्यांत तोंड लपवित होता. जो क्रूर खेळ नशिबाने मधुबालाशी खेळला त्याच खेळाला आता साधना सामोरी जात होती.
 
 
 
हा तिचा फोटो बघितला की काळ किती भीषण सूड उगवतो ते जाणवतं. थायरॉइडमुळे विस्फारलेले डोळे, आत गेलेले गाल, खप्पड दिसणारी हीच ती एकेकाळची "जन्नत की परी" असा प्रश्न पडावा अशी? माझे हृदय तेव्हा अक्षरशः तीळतीळ तुटलं. ढासळणारी तब्येत आणि मागे लागलेलं कायद्याचं झेंगट यासाठी तिने अनेकांची मदत मागितली परंतु शेवटपर्यंत कुणीही पुढे आलं नाही. कालांतराने तिचे भोग संपल्यावर ती कर्करोगाने गेली.
 
प्रसिद्धीची सवय झाल्यावर वयाने आलेली हतबलता किती त्रास देत असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. काय केले असेल ह्या एकेकाळच्या समाज्ञीने? प्रचंड रिकामा वेळ, सोडून गेलेलं सौंदर्य, तारूण्य, ओढवून घेतलेली विपन्नावस्था, एकाकीपण, आपल्या वयाचं, आपलं ऐकणारं माणूस आसपास नाही. विचार करून सुद्धा अंगावर काटा येतो. काय वाटत असेल आरशात बघताना? आपले स्वतःचे जुने फोटो तरी बघावेसे वाटत असतील का? आपल्या जुन्या यशाच्या बातम्या अजून मानसिक गर्तेत ढकलत असतील का? 
 
या चित्रपटसृष्टीतील दुय्यम तिय्यम दर्जाच्या भूमिका करणाऱ्या फालतू नट-नट्यांनी मुंबईत स्वतःचे बंगले बांधले; अलिशान घरे घेतली. साधनाला हे का शक्य झाले नाही? भाड्याच्या घरात राहायची तिच्यावर का वेळ यावी? कदाचित या प्रश्नाचे उत्तर फक्त तीच देऊ शकली असती.
 
अखेरीस २५ डिसेंबर २०१५ ला साधनाने अखेरचा श्वास घेतला. तिच्या अंत्ययात्रेची दीप्ती नवल सोडून फारशी कोणी दखल देखील घेतली नाही. एका लोभसवाण्या स्वप्नाचा हा असा केविलवाणा शेवट झाला..
 
माझ्या या अत्यंत आवडत्या नायिकेने 1960 चे दशक खऱ्या अर्थाने गाजवले आणि त्यावर कधीही न पुसली जाणारी स्वतःची छाप सोडली. 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com 

Leave a comment



Hemant Marathe

3 years ago

खूप छान लिहिले आहे. 👍👌

पुष्कराज चव्हाण

3 years ago

फार सुंदर आणि लिलया हाताळलेला विषय. हे सहसा कुणाला न जमणारं तुला मात्र छान जमतं. सर्व विषयांवर तू तितक्याच सहजगतीने लिहू शकतोस हे सिद्ध केलंयस. आजपर्यंत २५० लेख झाल्या बद्दल अभिनंदन. असाच उत्तरोत्तर बहरत जा.

Jyoti Tambe

3 years ago

मस्त लेख 👍👍
मला पण खूप आवडायची… अजूनही तिचा सिनेमा आवर्जून बघते झी क्लासिक या चॅनेल वर …
आरजू पण मस्त सिनेमा पण हिरो ठोकळा 🤪🤪
तिला नशीबाने गाणी सुद्धा चांगली मिळाली…
लेख वाचून जुन्या, छान आठवणी ताज्या झाल्या 👍😊

Deepak Dandekar

3 years ago

I completely agree with you, Sadhana was one of a kind. She was very impressive and different from all other herons.

Rajendra Phadke

3 years ago

झकास - नेहेमीप्रमाणेच !

Anita

3 years ago

Loved your write up Yeshwant! …My favorite actress too! Unfortunately Thyroid problems shortened her career! Her photo in older age is from a catwalk in a fashion show, just a year or two before she passed away! It is on YouTube! Sadhana ji was really an ideal human being! God gave her everything but she never let it go to her head! Married her favorite director and never had any affairs with co stars! Her husband passed on a bit early and she had no children. May be that stopped her from buying any home, who knows? But court cases and total ignorance from cinema world had given her a lot of pain. Cancer perhaps helped her to leave this cruel world! All her fans will remember her forever! So long Sadhanaji!

स्नेहा धारप

3 years ago

खूप छान लेख लिहीला आहे.

Janhavi Bhagwat

3 years ago

सर,साधनाच्या अस्मानी सौंदर्याचं व व्यक्तिमत्वाचं चपखल वर्णन केलं आहे. वेगळ्या विषयावर असलेला लेख आवडला.Thank you.

Anil K. Kubal

3 years ago

I really loved this article written by you Yashwant about Sadhana. You reminded me of my teenage days. I too was in love with Sadhana. She was an ideal person. I never missed any of her cinemas. I became nostalgic. Thank you very much for writing this amazing piece.

Milind Patil

3 years ago

अत्यंत हृदयद्रावक, खूप चागली मांडणी केली आहे
लेख मनापासून आवडला

Rajan Hate

2 years ago

फार छान लेख लिहिला आहेस.

*वयाने आलेली हतबलता.* हे वाक्य मनाला हादरवून गेले कारण अशा तशा प्रकारे प्रत्येकाला हा अनुभव येणार आहे

राजेन्द्र फडके

2 years ago

अप्रतिम लेख - मला तुझ्या आजवरच्या सर्व लेखांपैकी सगळ्यात ज्यास्त भावलेला! ह्या लेखासाठी खास ‘ साधना’ केल्याचे जाणवते

पुष्कराज चव्हाण

2 years ago

फार छान लिहिलंय. साधनाचे सारे चित्रपट डोळ्यासमोर उभे राहिले.

Varsha Manohar

2 years ago

Superbly written Yashwant … your words have a magic … they make the past the present for some time. Keep writing

Jayraj Salgaonkar

2 years ago

Stylised and well articulated indeed

गोपाळ पाळंदे

2 years ago

अतिशय सुंदर पण हृदय स्पर्शी लेख,
आमचच तरुण पण डोळ्यासमोर तंतोतंत उभे राहिले, धन्यवाद 🙏🙏🙏

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS