बंधुराज

वसंत साठ वर्षाचा झाला!! त्याची षष्ट्यब्दीपूर्ती हे पटतच नाही. आज काही कारणांनी आमची भेट होऊ शकत नाही याचे थोडे वाईट वाटते. असो; काय करणार? 

 

पूर्वी लहान भाऊ म्हणजे मोठ्या भावाचे एक हक्काचे गिऱ्हाईक. वसंत तसा माझ्यापेक्षा फक्त दोनच वर्षांनी लहान असला तरी लहानपणी त्याच्यावर खूप दादागिरी करायचो. तो मला नेहमीच दादा म्हणत असल्यामुळे असेल कदाचित पण तो सगळी दादागिरी सहन करायचा. लहानपणापासूनच वसंत अतिशय शांत आणि खरंच गुणी; त्याच्यामानाने मी अवगुणीच. तो सगळं डोळ्यातून बोलायचा; मग तो आनंद असो, राग असो किंवा दुःख. त्याचा वाढदिवस तिथीने तुकाराम बीजेचा त्यामुळे त्याचा शांत स्वभाव बघून आई तर त्याला लहानपणी तुकारामच म्हणायची. आज मागे वळून बघताना मला खात्री आहे की जरी तो वरकरणी रागावला नसेल पण त्याला मनातून नक्की राग येत आला असेल परंतु तो त्याने कधीही दर्शवला नाही हे मात्र तितकंच खरं. मला दुसरा मुलगा झाला तेव्हा मात्र तो हसतहसत अदितीला म्हणाला की आता अमेय जेव्हा प्रणववर दादागिरी करेल तेव्हा दादाला कळेल; त्यातून त्याच्या मनाचा खरा अंदाज आला. 

 

१९८७ साली तो शिकायला अमेरिकेला गेला पण जायच्या आधीपासून त्याला सर्वांनीच इतकं ब्रेन वॉश केले होते की शिक्षण संपवून तुला लगेच परत यायचे आहे. आमचा कौटुंबिक व्यवसाय जसा काही अन्यथा चालणारच नव्हता. त्याच्या बरोबर गेलेलं त्याचे जवळपास सगळेच मित्र तिथे स्थायिक झाले; पण तो मात्र आज्ञाधारक मुलासारखा दीड वर्षात परत आला. शिक्षण संपल्यानंतर ना कुठे फारसा फिरला किंवा ना अनुभव म्हणून कुठे नोकरी केली. कधीकधी वाटतं की त्याच्यावर आम्हा सगळ्यांकडून अन्याय तर झाला नाही ना? तो तिथेच राहिला असता तर आज त्याचे आयुष्य कसे असते? मला कल्पना आहे की या माझ्या अशा विचारांना काही अर्थ नाही पण मनात येते कधीतरी.

 

१९८९ पासून तो कौटुंबिक धंद्यात जो आला तो पुढील तीस वर्षे अथक परिश्रम करत होता. आता एकत्र धंदा म्हणजे मतभेद तर होणारच पण त्याचे कौतुक म्हणजे मोठा भाऊ म्हणून मी जे सांगेन ते त्याने कधीही धुडकावून लावले नाही. त्याने तिथेही माझी दादागिरी थोडीफार सहन केलीच. त्याची सहनशीलता वाखाणण्याजोगी आहे यात काही शंकाच नाही. नशिबाने अगदी पाहिल्यापाहून आमचे आपापसातील संबंध खूपच चांगले होते. आम्ही दोघांनीही आमच्या कौटुंबिक बाबींना आमच्या संबंधांमध्ये लुडबुड करू दिली नाही. मी तसा रागीट आणि पटकन आवाज वाढवणारा. आणि त्यातून देव माझ्या घश्यात सायलेन्सर बसवायला बहुदा विसरलाय त्यामुळे कधीकधी बोलणं वर्मी लागू शकतं आणि म्हणूनच संबंध चांगले राहण्याचा जास्त वाटा त्याचाच आहे. तो खऱ्या अर्थाने अजातशत्रू आहे कारण त्याच्यात बोट ठेवावं असा एकही दोष किंवा अवगुण मला तरी माहित नाही. हां, तो घोरतो असे मात्र आहे पण मी ही घोरतो त्यामुळे तो अवगुण कसा असेल? नाही का? 

 

 

धाकटा भाऊ असला तरी तो खऱ्या अर्थाने आमच्या सर्व कुटुंबाचा caretaker आहे. अमेय आणि प्रणवच्या लहानपणी वसंतने त्यांचे किती कौतुक आणि लाड केले याला खरंच तोड नाही. अमेय तर त्याचा खास लाडका आणि अमेयला सुद्धा काका म्हणजे जीव की प्राण. तसेच वसंत हा आईला आणि बहिणीला दर एक दिवसाआड फोन करून सगळ्या गोष्टी सांगत असतो. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की त्या दोघींची कायम तक्रार असते, की बघ, वसंत कसा नेहमी फोन करून आमची काळजी घेतो; तू तुझ्या लहान भावाकडून कधी शिकणार? मी आहे आता कानफाट्या; आता बदल होणे कठीण. 

 

 

नोव्हेंबर २०१४ मध्ये बायको, स्वातीचे निधन आणि त्यामुळे बसलेल्या कौटुंबिक आघातानंतर आज आपले दुःख पचवून ज्या पद्धतीने त्याने त्याच्या मुलांची काळजी घेतली ती तर अभूतपूर्व आहे. ओम आणि सिया नशीबवान आहेत असा बाप मिळायला; आणि हो आता प्रेरणाही नशीबवान आहे असा सासरा मिळायला. 

 

 

माझ्या ब्लॉगचा खरा प्रणेता पण वसंतच आहे. आज सुद्धा माझे लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील याची तळमळ माझ्यापेक्षा त्यालाच जास्त असते. त्याचे आभार मानलेले त्याला आवडणार नाही पण तरी देखील, त्याला मनःपूर्वक धन्यवाद.

 

२०१८ च्या मे महिन्यात वसंत मला म्हणाला की आधी ठरल्याप्रमाणे तो दोन्ही मुलांना घेऊन कुठेतरी ट्रीपला जाणार होता पण त्या दोघांचं कॉलेज, इंटर्नशिप मुळे दोघांनाही जमत नाहीये तर मी एकटाच कुठेतरी जातो. मी म्हटलं, खरंच जा; एक दोन जागा पण सुचवल्या. अचानक दुसऱ्या दिवशी तो मला म्हणाला, दादा तूच का येत नाहीस माझ्याबरोबर? अशी ठरली आमची मालदिवची ट्रिप. आम्ही दोघेच अशी पहिलीच ट्रिप त्यामुळे थोडी धाकधूक होती की कंटाळा तर येणार नाही ना? पण ही ट्रिप निदान माझ्या आयुष्यातील तरी एक अविस्मरणीय सफर ठरली. आम्ही वैयक्तिक जीवनातील किती अनेक गोष्टी एकमेकांबरोबर तिथे शेअर केल्या की नंतर असं जाणवलं की अरे, आपल्याला आपल्या भावाची एक वेगळी ओळख या ट्रीपने दिली. आमचे संबंध भाऊ या नात्याबरोबरच मैत्रीच्या नव्या धाग्यात बांधले गेले. खूप मजा आली आणि असा निर्णय घेऊन टाकला की वर्षातून एकदा आम्ही दोघांनीच कुठेतरी जायचंच. आणि तसा योग पाठोपाठ आलाच. माझ्या मुलाने अमेरिकेत घर घेतलं तेव्हा त्याचे घर set-up करायला अदिती जाऊन आली होती. मला डिसेंबर महिन्यात अमेरिकेत एका लग्नाला जायचंच होतं म्हणून मी तिच्याबरोबर गेलो नाही. मी एकटाच म्हणून वसंतला विचारलं तर तो एका पायावर तयार. अशी आमची २०१८ मधील दुसरी ट्रिप झाली. त्यानंतर माझे ऑपरेशन आणि मग गेले दोन-तीन वर्षे चालू असलेला कोरोनाचा उन्माद यामुळे जमलेले नाही पण आता लवकरच काहीतरी जमवू. 

 

त्याला वाचनाची भयंकर आवड. तीच आवड त्याला आपल्यापेक्षा अर्ध्या वयाचे मेंबर असलेला बुक क्लब मध्ये सहभागी व्हायला उद्युक्त करते आणि तिथेही सगळ्यांचा लाडका दादा, काका होऊन जातो. वाचनाबरोबरच त्याला मुलांना शिकवायची खूप आवड आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलांची background काय याचा तो कधीही विचार करत नाही. IIM कलकत्ता आणि काही प्रतिथयश संस्थांमध्ये Guest Lecturer म्हणून गेला तरी त्याला त्याचा गर्व नाही; उलट आजूबाजूच्या गावातील मुलींना शिकवायलाही त्याला तितकेच भावते. मानलं बाबा त्याला! हॅट्स ऑफ!

 

पुढचा जन्म असतो का नाही मला कल्पना नाही पण असेल तर वसंत माझा परत भाऊ झालेला आवडेल. हां, आता त्याने माझी दादागिरी माझ्यावर उलटवण्यासाठी मोठा भाऊ व्हायचं ठरवलं तर काय करायचे याचा विचार अजून केलेला नाही. आज त्याची साठी असली तरी मी जेष्ठ असल्याने जीवेत शरदः शतम् असा आशीर्वाद देऊ शकतो पण आशीर्वाद देणारा मी आणि घेणारा वसंत दोघेही शंभर काही बघणार नाही त्यामुळे आपल्याकडे अशी उगाचच एक पद्धत जरी असली तरी मी असं काहीही म्हणणार नाही. परंतु त्याच्या पुढील आयुष्यासाठी खालील काही गोष्टी त्याला करता याव्यात. 

 

  • स्वतःच्या शारीरिक आणि तितकंच महत्वाचं म्हणजे मानसिक आरोग्याची छान काळजी घ्यावी. 
  • सतत काम, पैसा असा विचार त्याने आजवर कधी केलाच नाही, पण त्यात अजून छान भर घालावी. गरीब गरजू आणि होतकरू तरुणांसाठी आपल्या ज्ञानाचा होईल तितका त्याने उपयोग करावा.
  • मुलात मूल होऊन जाण्याचा त्याचा पहिल्यापासून स्वभाव आहेच कारण स्वतःच्या दोन मुलांशिवाय अनेक पुतणे आणि भाचवंडे यांचा तो खास मित्र आहे. गेल्या वर्षी मी आजोबा झालो पण अमेयला मुलगा झाला याची वसंतलाच excitement जास्त. तो अरिनची काळजी घ्यायला अमेरिकेला जायला एका पायावर तयार. 
  • आपण आयुष्यातील खूपशी वर्षे "मला काय पाहिजे" याच विचारात, खूप सहजपणे घालवतो आणि त्यात काही चुकीचे आहे असंही नाही. पण आपल्याच नकळत त्यातून "मी"पणा साठू शकतो. त्याचे जरासेही सावट त्याच्या आयुष्यात येऊ नये. 
  • वाढत्या वयानुसार मेंदू तल्लख ठेवण्याच्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालूच आहेत. डॉक्टरेटचा अभ्यास संपला तरी भरपूर वाचन तसेच चालू राहावे.
आता साठी झाली तरी त्याचे विचार कधीच पोक्त आणि बुरसटलेले नसल्यामुळे आपले वय वय सहजपणे स्वीकारुन जास्तीत जास्त उत्साही, आनंदी स्वभावाने तो मुलात मूल होऊन राहतो हीच त्याची खरी खासियत आणि कमाल आहे.  
 

मी एक इच्छा मात्र मनापासून करतो की संध्याकाळी पुस्तक आणि उत्तम स्कॉच यांची सुरेल मैफल जमावी आणि त्याच बरोबरीने मनसोक्त भटकंती, संगीताचा मनमुराद आस्वाद आणि उर्वरित आयुष्यात धमाल मजा. बस्स, अजून काय पाहिजे? 

 

यशवंत

yeshwant.marathe@gmail.com 

 

Leave a commentShubhada jahagirdar

5 years ago

Yashwant very well expressed. God bless.

Yogini Brahmankar

5 years ago

Yashwant Khup brothers bonding expressed so naturally and lovingly ..

Sujata Nerurkar

5 years ago

Straight from heart.. very precious relation.

दिलीप

5 years ago

फार सुंदर लेख, वसंतला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा, पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचे, आणि आनंदी जाओ ही देवापाशी प्रार्थना

Asavari Datare

5 years ago

So well written and very apt Yeshwant dada!!!

Shriniwas Anant Marathe

5 years ago

एकाच दमात आपल्याकडे कमीपणा घेऊन दुसऱ्याची वाहवा करणं खूप कठीण असतं. भल्याभल्यांना नाही जमत. तू ते केलंस..... अभिनंदन. तुम्हा दोघांच्या एकत्र सफरी हे तुमच्यातील अतूट प्रेमाचं द्योतक आहेत. तुम्हा दोघांपैकी जास्त नशीबवान कोण आहे हे काळच ठरवेल. पण तुमची भावाभावामधील मैत्री अशीच अबाधित राहो हीच सदिच्छा....

श्रीनिवास मराठे

पुष्कराज चव्हाण

5 years ago

यशवंत,
छान लिहिलंयस. आपण सर्व एकाच शाळेत एकमेकांच्या पुढे मागे होतो. तुझ्याशी अधूनमधून संबंध येत असे किंवा आपण एकमेकांच्या समोरा समोर येत असू शिवाय तगारे कडे माझं जाणं येणं होई तेव्हा आपली भेट होत असे. वसंत तसा कधी सहसा भेटत नसे किंवा बोलणं चालणं होत नसे पण तुझा भाऊ म्हणून मला तो परिचित आहे. मुळात त्याचा स्वभाव अभ्यासू असल्याने तो कधीच वर्गाबाहेर दिसला नाही. पण त्याच्याकडे पहिल्यावरच त्याच्या चेहऱ्यावर विलसत असलेल्या तेजावरुनच त्याच्या बुद्धिमत्ते विषयी आणि मृदू स्वभावा विषयी कल्पना येते. तुमच्यातलं भावा भावापेक्षाही असलेलं मैत्रीचं नातं खरोखर सुखावणारं आहे. तो एकट्याने पार पाडत असलेल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांगतात कि एक आदर्श पिता असावा तर वसंत सारखा. तुला रामाची उपमा द्यावी की नाही हे वसंताने तुझ्यावर कधी लिहिलाच तर त्या लेखावरून ठरवता येईल. पण तो मात्र लक्ष्मणा सारखा आहे असं म्हणावंसं वाटलं. आणि हे ही तितकंच खरं की त्याला लक्ष्मण म्हणायचं म्हणजे तू आपसूकच राम होतोस. तेव्हा तुम्हा उभयतांची ही जोडी अशीच सदैव आनंदात नांदो हीच वसंताच्या वाढदिवशी त्या सर्वात्मकाच्या चरणी प्रार्थना. वसंताला माझ्या कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Ashok ptsbhu

5 years ago

Dear Vasant,
Greetings of the Day !

Many Many Happy Returns of the Day !
God Bless You and your family always.

Dear Yash
Very beautiful expression about Vasant.

विनायक गोखले

5 years ago

यशवंत~वसंत,
लेख वाचून छान वाटले. 👍

Dilip vedpathak

2 years ago

We proud of both brothers and all the best of vasant.

Satish Dharap

5 years ago

Excellent. Very rare to have brother as best friend. I do not have this experience, as I do not have a brother. Anyway, Keep it up. Do have at least one enjoyable trip with Vasant every year.

Sunil Sahasrabudhe

5 years ago

Mastch. Too Good Dada, Marathi writing pan, "Dada-ch" aahe. Manapasun tu feeling Express keli aahes. I wish both of you to enjoy your friendly brotherhood more and more... God Bless Both of YOU. Sunil.

स्नेहा धारप

5 years ago

यशवंत, तू आणि वसंत सारखं भावाभावांचं मैत्रीपूर्ण प्रेमाचं नातं घरोघरी असावं असं वाटतं. खरंच , खूप छान वाटलं .

Anand Deshpande

2 years ago

Excellent description of relation between two brothers. Keep it up and all the best.

पुष्कराज चव्हाण

2 years ago

यशवंत, दोघा ही भावांच्या सर्व आकांक्षा आणि ईच्छा सफळ संपूर्ण होवोत ही ईश्वराकडे मनःपूर्वक प्रार्थना. दोघांनाही भरभरून शुभेच्छा.

Abhishek Kulkarni

1 year ago

वाह क्या बात है

Sneha Dharap

7 months ago

अतिशय सुंदर लेख. धाकट्या भावाबद्दलचे लेखातून व्यक्त झालेले प्रेम खूपच cute आहे.

Meena Shah

6 months ago

So so nice to read this and such hearty feeling the write up gave!! Wish your brother all the happiness on his birthday and to you and yours too!
Which book club is this, may i know?

Best regards

Yogesh Dadape

6 months ago

Nice article and happy to see love between you both Brothers ❤️ Keep it up

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS