... आणि प्राण

हृषिकेश मुखर्जींच्या गुड्डी हा चित्रपट 'सिनेमा हा एक भ्रम आहे' हे अतिशय नितांतसुंदर पद्धतीने दाखवतो. जे कलाकार पडद्यावर खलनायकाची भूमिका करतात ते खऱ्या आयुष्यात वाईट असतीलच असे अजिबात नाही आणि हृषिदांनी प्राण यांचे उदाहरण फार चपखल वापरले आहे. जया भादुरीने साकारलेली सिनेमावेडी मुलगी गुड्डी प्राणच्या पडद्यावरील षडयंत्री खलनायकीपणामुळे घाबरलेली आहे. ती तिचे दैवत धर्मेंद्रला त्याच्यापासून दूर राहण्याचा इशारा देते. पण धर्मेंद्र तिला हसत सांगतो की, प्रचलित समजुतीच्या विरुद्ध प्राण हा एक हिरा आहे जो मित्र आणि सहकाऱ्यांना मदत करतो. “हा माणूस हातिमताईसारखा खूप उदार आहे,” गुड्डीचा हा सीन हिंदी चित्रपटसृष्टीतील प्राणचे स्थान उत्तम प्रकारे स्पष्ट करतो, खलनायकाला चांगले स्थान देणारा खलनायक.
 
 
हिंदी चित्रपट सृष्टीत प्राण याचा खलनायक अविस्मरणीय आहे. त्याच्या नावाने असंख्य कंड्या अथवा अफवा पसरवून त्यांनी श्रोत्यांमध्ये निर्माण केलेल्या भीतीच्या विपुल कथा आहेत. प्राण याला चहासाठी बोलावले गेले तर महिलांना तिथून दूर जायला सांगण्यात येई. त्या काळी रूपेरी पडदा आणि वास्तविक जीवन यांच्यातील सीमारेषा फारच धूसर असायच्या परंतु प्राणचा अभिनय इतका प्रभावी होता की लोकांनी त्यांच्या खलनायकाच्या भूमिकांमुळे आपल्या मुलांचे नाव कधीही प्राण ठेवले नाही.
 
 
प्राण हा असा चिरस्थायी खलनायक कसा काय राहिला? मला वाटते की त्याच्या व्यक्तिरेखेतून प्रतीत होणारी दहशत प्रेक्षकांना घाबरवून टाकत असावी. त्याचे डोळे म्हणजे एक प्रकारची धोक्याची घंटाच वाटत असे. पुढील काळातील कुठल्याही खलनायकाला ते प्रतीत करणे जमले नाही (थोडाफार अपवाद म्हणजे अमजद खान).
 
 
पण महत्वाची गोष्ट म्हणजे वाद आणि घोटाळ्यांनी भरलेल्या बॉलिवूडमधील त्याची स्वच्छ आणि सज्जन प्रतिमा. अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर यांच्याशी त्याचा एक विशेष संबंध होता, कारण ते (अशोक कुमार वगळता) सर्व नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर मधून आलेले होते.
 
 
सहाय्यक अभिनेत्यांमध्ये प्राण हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक राहिला. प्राण आणि अशोक कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव पुरुष अभिनेते होते ज्यांनी त्यांच्या सक्रिय दीर्घ कारकीर्दीत अपयश फारसे पाहिलेच नाही. खलनायकी, वीरता, विनोद, भावना आणि अगदी गाण्यांसह प्राण याची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन दिग्गजांपैकी एक म्हणून केली जाते. त्याची अनोखी संवाद डिलिव्हरी, खणखणीत स्पष्ट आवाज आणि सुस्पष्ट व्यक्तिरेखा यामुळे त्यांच्या चित्रपटांच्या आठवणी आपल्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. खास शैली, अभिनय आणि सुसंस्कृतपणा असलेला हा माणूस हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात लाडका खलनायक राहिला आहे.

 

 

 

प्राणला सिनेमातील मुख्य हिरोपेक्षा सुद्धा जास्त मानधन मिळत असे, त्यामुळे इतर सहकलाकारांबद्दल बोललेलंच चांगलं. 1950 आणि 1960 च्या दशकात फक्त दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर आणि राजेंद्र कुमार यांना प्राण पेक्षा जास्त पैसे मिळत असत; तर 1970 मध्ये फक्त राजेश खन्ना याची प्राणपेक्षा जास्त कमाई होती. आता सांगून पटणार नाही पण ओरिजनल डॉन या चित्रपटासाठी अमिताभ बच्चनला अडीच लाख रुपये तर प्राणला लाख रुपये मानधन देण्यात आले होते.

 

आता या पार्श्‍वभूमीवर कल्पना करा की छायाचित्रकार म्हणून पहिल्याच नोकरीत प्राण मासिक 200 रुपये पगार मिळवत होता. परंतु सिनेमात काम करण्याच्या दुर्दम्य इच्छेमुळे त्याने दरमहा 50 रुपये या मानधनावर यमला जट या चित्रपटात काम करण्यासाठी नोकरी सोडून दिली. प्राण यांनी 1945 मध्ये शुक्ला यांच्याशी लग्न केले. त्यावेळी ते 25 वर्षांचे होते आणि त्यांनी यापूर्वी सहा चित्रपटांमध्ये काम केले होते. लग्नात कोणतीही अडचण अथवा विघ्न येता हे मिलन जवळपास 70 वर्षे टिकले. फाळणीनंतर, तरुण प्राणला नवविवाहित पत्नी आणि एका वर्षाच्या मुलासह मुंबईला जाण्यास भाग पाडले गेले. प्राण याच्या मते, फाळणीत त्यांनी गमावलेली सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे त्यांचा कुत्रा. प्राण जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा त्याच्याकडे अनेक कुत्रे होते आणि विचित्रपणे त्याने आपल्या कुत्र्यांना बुलेट, व्हिस्की आणि सोडा अशी नावे दिली होती.

 

राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वीच प्राण यांनी 1939 मध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

 

50 च्या दशकात आणि त्यापुढील काळातील हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या त्रिकूटातून म्हणजेच बिग थ्री - दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद- मधून प्राण वगळला जायला नको होता. खरं तर त्याच्यासोबत बिग फोर असायला हवे होते. ज्या चित्रपटांमध्ये तो खलनायक होता - मुनीमजी (1955), जिद्दी (1948), देवदास (1956), मधुमती (1958), राम और श्याम (1967) आणि जिस देश में गंगा बेहती है (1960), त्याच्यात त्याने केवळ दिग्गज सुपरस्टार्ससोबत या चित्रपटांमध्ये काम केले नाही तर आपल्या अष्टपैलू आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्वामुळे त्या चित्रपटांचा प्रभाव जास्ती झळाळून निघाला. प्राण सारखा अभिनेता त्यांच्यात असल्यामुळे हे सुपर स्टार्स जास्ती उठून दिसले यात शंकाच नाही आणि त्याच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे नायकांना उजळ केले.

 

प्राण अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या वन-लाइनरसाठी प्रसिद्ध होता, परंतु त्याने त्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी सादर केले. बडी बहन या चित्रपटात, प्राणने सिगारेट ओढताना परफेक्ट स्मोक रिंग उडवण्याची ट्रेडमार्क स्टाईल दाखवली. स्मोक रिंग्ज आणि धुम्रपान करण्याच्या वेगवेगळ्या शैली, नाणे उडवणे या सर्वांनी त्याच्या खलनायकाच्या रूपात आणखीन खुमारी आणली. प्राण याचा आवडता शब्द 'बरखुरदार' प्रचंड लोकप्रिय झाला. “मर्यादा” (1971) मध्ये, त्याने तोंडात पेटलेली सिगारेट उलटी केली, जीभ वापरून ती परत ओठांच्या मध्ये ठेवली किंवादस लाख” (1966) मध्ये त्याने बासरी वाजवल्यासारखे सिगार ओढले. राज कपूरच्या 'जिस देश में गंगा बहती है' मध्ये, प्राणने त्याच्या देहबोलीत डाकू राका म्हणून एक विशिष्ट वैशिष्ट्य जोडले, वारंवार कॉलरमध्ये आपली तर्जनी फिरवली.

 

प्राण याने सुमारे 350-400 चित्रपटांमध्ये काम केले. प्राण याने त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत साकारलेल्या माझ्या वैयक्तिक आवडत्या भूमिका खालीलप्रमाणे आहेत.

 

1. आह - परोपकारी डॉक्टर
2. हलाकू - जुलमी आणि इराणी सम्राटाचा खतरनाक गेट-अप
3. मधुमती - त्याच्या खास शैलीतील खलनायक - राजा साब
4. जिस देश में गंगा बहती है - अविस्मरणीय आणि निर्दयी राका
5. गुमनाम - तो पडद्यावर असेपर्यंत इतर कोणीही खुनी असू शकत नाही याची प्रेक्षकांना खात्री होती.
6. राम और श्याम - चाबकाद्वारे प्रतीत क्रूरता
7. उपकार - मलंग चाचाला कोण विसरू शकेल?
8. जॉनी मेरा नाम - खलनायकाचे मानवीकरण करण्याचा प्रयत्न
9. हीर रांझा - खुनशी, काजळी डोळे आणि त्रासदायक अपंग
10. व्हिक्टोरिया क्रमांक 203 - राजा आणि राणाची जोडी (अशोक कुमारसह)
11. परिचय -मेणाहून मऊ असलेला कठोर चेहऱ्याचा आजोबा
12. धर्मा - डाकूची शीर्षक भूमिका
13. जंजीर - शेरखानची; ही त्याच्या सर्वात प्रिय भूमिकांपैकी एक मानली जाते.
14. कसौटी - विचित्र नेपाळी उच्चारण असलेले एक पात्र
15. अमर अकबर अँथनी - नियमित जळणारी सिगारेट आणि लक्षवेधी दाढी
16. कर्ज - एक विचित्र रूप
17. इस का नाम जिंदगी - मरणार नाही असा म्हातारा माणूस
18. 1942 अ लव्ह स्टोरी - देशभक्त, अबिद अली बेग
19. दिल दिया दर्द लिया - कुख्यात ठाकूर
20. मजबूर - प्रसिद्ध मायकेल डिसूझा
21. कब क्यूं और कहां - भीतीने गाळण उडवून देणारे पात्र

 

तुमसा नहीं देखा, ब्रम्हचारी, कश्मीर की कली, एन इव्हनिंग इन पॅरिस, पत्थर के सनम, बॉबी, कालिया, शराबी, बेइमान, डॉन, अदालत, आँसू बन गए फूल हे त्याच्या संस्मरणीय भूमिका असलेले इतर चित्रपट होते.

 

उपकार, आंसू बन गए फूल आणि बेइमानसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तथापि, 1973 मध्ये जेव्हा त्याला बेइमानमधील कॉन्स्टेबल रामसिंगच्या भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला, तेव्हा त्याने हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला, कारण त्याच्या मते सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार पाकीझासाठी गुलाम मोहम्मद यांना मिळायला हवा होता, बेइमानसाठी शंकर जयकिशन जोडीला नाही. त्याला पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आणि आयुष्याच्या अखेरीस दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

प्राण याने कपूरांच्या चार पिढ्यांसह काम केले - पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर आणि करिश्मा कपूर. बॉबीच्या चित्रीकरणादरम्यान, राज कपूर प्राणची फी घेऊ शकत नव्हते म्हणून प्राणने 1 रुपये साइनिंग रक्कम देऊन चित्रपट करण्यास होकार दिला; अशी त्यांची मैत्री होती.

 

1960 आणि 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात, प्राण याने एक प्रकारे पुनर्जन्म घेतला. पडद्यावरील आमच्या काही आवडत्या हिरोंना घाबरवून खलनायकी कारकीर्द घडवणारा प्राण चरित्र भूमिकांकडे वळला आणि त्यासाठी त्याने प्रामुख्याने मनोज कुमारचे आभार मानले पाहिजेत. परंतु तितकेच कौतुक प्राणच्या अष्टपैलुत्वाला आणि वैयक्तिक सद्भावनेला आहे की प्रेक्षकांनी हा बदल इतक्या सहजतेने आणि स्वाभाविकपणे स्वीकारला की जणू तो कधीच प्रेक्षकांना तिरस्कार करायला लावणारा भीतीदायक खलनायक कधी नव्हताच.

 

एका चरित्र अभिनेत्याने, त्याच्यावर चित्रित केलेली डझनभर गाणी लोकप्रिय केली ही असामान्य गोष्ट आहे. यामध्ये जंजीरचा यारी है इमान, उपकारचा कसमे वादे, व्हिक्टोरिया नंबर 203 चा दो बेचारे, मजबूरचा दारू की बोटल (त्याच्या ख्रिश्चन आणि कोकणी भावांसह) आणि कसौतीचा हम बोलेगा तो (त्याच्या खेळकर नेपाळी छापासह) विशेष उल्लेखास पात्र आहेत.

 

विशेषतः, किशोर कुमार आणि मेहमूद अभिनीत विनोदी चित्रपटांमध्ये प्राण यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. हाफ तिकीट, पहला झलक, नया अंदाज, आशा, बेवकूफ, एक राज, जाल साज यांसारख्या चित्रपटांमध्ये किशोर कुमार यांच्यासोबत प्राण यांनी केलेले संस्मरणीय सहकार्य विसरता येणार नाही. हाफ तिकिटमध्ये त्याने एक बदमाश रंगवला असला तरी, किशोर कुमारच्या संपूर्ण वेडेपणाशी स्वतःला असे काही जुळवून घेतले की विचारता सोय नाही. विशेषत: आके सीधे लागीच्या चित्रीकरणात त्याने दाखविलेले विनोदाचे अंग भल्याभल्यांना चकित करून गेले.

 
 
 
 
सुमारे अर्धशतकाच्या विपुल कारकीर्दीत, प्राणने अनेक पोशाख, लुक आणि उच्चारांमध्ये बदल करून शेकडो स्क्रीन पात्रांना जिवंत केले. राका, मायकल, गजेंद्र, मलंग चाचा, राणा किंवा किशनलाल असो, चित्रपट पाहणाऱ्यांना प्राण आणि त्याच्या कामाकडे बघताना त्याच्या अभिनव शैलीमुळे दरवेळी काहीतरी नवीन सापडत राहिले. तो भारतीय प्रेक्षकांच्या मनातील एक दीपस्तंभ आहे ज्याच्याशिवाय हिंदी चित्रपटांच्या आपल्या आठवणी अपूर्ण राहतील.
 
 
पण सांगून विश्वास बसणार नाही की, 50 वर्षांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये करिअर केल्यानंतरही प्राण याला हिंदी वाचण्यात अडचण येत असे. मला तर आजही पचनी पडणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या लेखकांना प्राण संवाद उर्दूमध्ये लिहायला सांगत असे.
 
 
खरंच, प्राण याची स्वतःची एक खास शैली होती. त्याच्या अनेक पद्धतींपैकी एक म्हणजे त्याचे आकर्षक ड्रेसिंग. तो कसा धुम्रपान करतो – (अशोक कुमार यांच्यानंतर दुसरा, ज्याने पडद्यावर सिगारेट ओढणे अगदी फॅशनेबल केले). प्राणने हिंदी चित्रपटातील खलनायकाची व्याख्याच बदलून टाकली आणि त्याला स्टायलिश आणि जंटलमन बनवले. आणि त्यानंतर आलेल्या अनेकांवर - अजित, अमरीश पुरी, प्रेम चोप्रा आणि गुलशन ग्रोव्हर असे काही मोजकेच - या लोकांवर एक प्रकारे प्राणचे ऋण आहे.

 

प्राण यांच्या चरित्राचे शीर्षक आहे ... आणि प्राण, कारण त्याच्या बहुतेक चित्रपटांमध्ये, त्याचे नाव सर्वात शेवटी दिसते ... आणि प्राण असे वाचायला मिळायचे. कधी-कधी, तर above all - प्राण.

 

 

बॉलीवूडमधील सर्वकालीन महान खलनायक प्राणसाब यांना माझा सलाम!!!

 
 
 
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com 

Leave a commentJayant

1 year ago

Very nicely done.

सविता कुरुंदवाडे

1 year ago

...प्राण

मला नेहमी वाटते खलनायक तोच यशवी होतो जो शेवटपर्यंत unpredicteble असतो.
ज्यच्या लहानपण, जडणघडणं किंवा असाहय्यता दाखवल्याने प्रेक्षक त्या बरोबर भावनिक जोडल्या जातो. मग खलनायकाला सहानभूती मिळते ..त्याची तीव्रता निघून जाते.

प्राण नर कधीही सहानभूती घेतली नाही म्हणूनच तो चित्रपटा बाहरेही खलनायक वाटत राहिला..

चित्रपट फक्त डोके बाजूला ठेवून करून घ्यायचे मनोरंजन आहे हे मनात पक्के असल्याने फारसे समजत नाही त्यातले ..

म्हणून आधी दातृत्व वाचून काढले ..

ओघवती भाषा
आणि अत्यन्त अभ्यासपूर्ण लेखन
सुसंगत मांडणी या मुळे प्रत्येक ब्लॉग छानच !

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS