भैय्या

आपण नेहमीच बाहेरील राज्यातून (म्हणजे प्रामुख्याने भय्ये) येणाऱ्या लोंढ्यांबद्दल हिरीरीने बोलत असतो. आपले राजकीय पक्ष तर लगेच मराठी अस्मिता पणाला लागल्यासारखे तळमळत असतात. तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी संजय निरुपम असे म्हणाला की हे बाहेरचे लोक आले नाहीत तर मुंबई बंद पडेल. झालं, हे वक्तव्य ऐकून अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेली पण मला काही राग वगैरे आला नाही त्यामुळे मी मराठी आहे की नाही अशा प्रतिक्रिया आल्या.

पण मला खरं सांगा की निरुपम असे काय चुकीचे बोलला? जरा महाराष्ट्राची, मराठी माणसाची बुडबुड्यासारखी फुगलेली अस्मिता थोडी बाजूला ठेवून शांतपणे विचार केला तर आपल्या दैनंदिन जीवनात सकाळच्या दूध, वर्तमानपत्र पासून रात्री रिक्षा, टॅक्सीने घरी येईपर्यंत किती व्यवसाय किती स्थानिक मराठी मुलांना करावेसे वाटतात याचा खरंच आढावा घेतला पाहिजे.

भारत सरकार पण Skill India च्या आधारे तरुण मुलांना कारागीर होण्याचे प्रशिक्षण देण्याबद्दल प्रयत्न करतेय पण अशा कारागीर दर्जाचे काम करणारी मराठी मुले अत्यंत तुरळकच दिसतात. इतक्या व्यवसायाच्या संधी आहेत पण त्या मिळवाव्यात असं वाटतच नाही स्थानिकांना? कुठून कुठून राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र, बंगाल किंवा अगदी काश्मिरी किंवा उत्तर पूर्व राज्यांमधून सुद्धा मुलं येतात.

राहायला जागा नसते, जेवण करून घालायला कुणी नसते. कुठेतरी पथारी पसरतात, वडापाव, मिसळ किंवा पोहे खातात, बसमधून सामान घेऊन १५-२० किमी दूरपर्यंत रोजचा प्रवास करतात. नीट काम पण येत नसलं तर कारागिराच्या हाताखाली शिव्या खात खात पडेल ते काम करत ते काम शिकून घेतात, पण अल्पावधीत जम बसवतात. नंतर स्वत: लहानमोठी कामे घ्यायला लागतात आणि त्यांचं एक ब्रीद असते आणि ते म्हणजे कुठच्याही कामाला नाही म्हणायचे नाही. तुम्हाला प्लंबर, सुतार, गवंडी, पेंटर कोणीही हवा असेल तर देऊ ना साहेब म्हणत काम अंगावर काम घेतात आणि मित्राला ते काम देऊन त्यालाही व्यवसाय देतात. तेच काम त्यांचा मित्र पण त्यांच्यासाठी करतो. नकळत एक या सगळ्या व्यावसायिकांची अनरजिस्टर्ड कंपनी तयार होते.

पण इथल्या स्थानिकांना, मराठी मुलांना स्वत:च्या घरात राहून, घरचं खाऊन अशी कामं का करावीशी वाटू नयेत? कुठल्याही कारागिराला दिवसाला ५०० ते १००० रुपये मिळतात. अंगावर काम घेतले तर अजूनच मिळत असतील. ही कामे शिकायला काय अपमान वाटतो का मराठी मुलांना? अशा व्यवसायात मराठी मुले दिसतच नाहीत.

अगदी साधं सोसायटींचे रखवालदार म्हणूनही आठ-दहा हजार कुठे जात नाहीत, मग मराठी मुले अगदी घरी बसून राहण्यापेक्षा अशी कामे का स्वीकारत नाहीत? काहीही न कमावता नाक्यावर टवाळगिरी करण्यात धन्यता मानण्यापेक्षा काही कारागिरी का शिकत नाहीत? अशी कामे का करत नाहीत? केवळ टर्रेबाजी करत आणि आमची कामं घेतली, आमच्या कामांवर गदा आणली असा फालतू टाहो का फोडता ? त्यासाठी एक तर हे व्यवसाय तुमचे असायला नकोत का? जे व्यवसाय तुम्ही स्वतःचे करायचा विचारच केला नाही त्यामुळे ते दुसऱ्या लोकांनी बळकावले असं कसं म्हणता येईल? आधी एकही कारागिरीचा व्यवसाय शिकायचा नाही, करायचा नाही आणि परप्रांतीय मुले ते व्यवसाय घेतात त्यांच्या नावाने, असा एखादा फालतू निरुपम काही बोलला की, तेवढ्यापुरती ओरडाआरड करायची आणि पुन्हा सगळं शांत!!

काही महिन्यांपूर्वी मी एक पोस्ट वाचली होती की ज्याचे शीर्षक होते - उगीच कशाला? मला त्याची आठवण झाली.

उगीच कशाला हे दोन शब्द सगळ्या मराठी लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी करते. असा एकही मराठी माणूस नसेल त्त्याने हे दोन शब्द ऐकलेले नाहीत. पालक, मित्र, शिक्षक, नातेवाईक हे शब्द सर्रास तुमच्या तोंडावर फेकतात. बरं ते सांगताना तुम्ही भव्य दिव्य असे काहीही करायचा विचार करत नसता. झाडावर चढू का? काहीतरी व्यवसाय करण्याचा मानस आहे, पोलंडची ट्रिप करण्याचा विचार आहे, बाहेरून जेवण मागवू का? सगळ्या गोष्टींना एकच रिस्पॉन्स उगीच कशाला? या दोन शब्दांनी मराठी मुलांची पार वाट लावली आहे. त्यांच्यातील सगळी कल्पकता मारली जाऊन ते प्रचंड आळशी होतात आणि महत्वाकांक्षेचा पार चुथडा होतो. याच कारणामुळे असेल कदाचित पण धंद्यात मराठी मुले जवळजवळ दिसत नाहीत. चांगली पगाराची नोकरी मिळवणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता. काही आयुष्यात वेगळे करण्याची किंवा कसलाही धोका पत्करायची मानसिकताच नाही.

आम्ही लहानपणापासून काय ऐकत आलो? शिवाजी जन्मला पाहिजे पण शेजारच्या घरी. कारण अशा मुलाला सांभाळण्याची मानसिक कुवतच आमच्याकडे नाही. गंमतीतच बोलायचे म्हणजे जर महात्मा फुले सावित्रीबाईंना म्हणाले असते - उगीच कशाला - तर कदाचित आजही बायका अशिक्षित राहिल्या असत्या.

संजय निरूपमला आणि परप्रांतीयांना शिव्या हासडणे सर्वात सोपे काम आहे पण आम्ही आधी स्वत: मध्ये तर डोकावून पहायला तयार आहोत का हा कळीचा मुद्दा आहे.

अगदी नीट विचार केला तर असं लक्षात येईल की आज आपली मुलं जी इंग्लंड, अमेरिकेत जातात ती तिथल्या स्थानिकांच्या दृष्टीने तिथले भय्येच आहेत. आज ट्रम्पनी बाहेरील लोकांबद्दल जरा काही बोललं किंवा केलं तसेच दुसऱ्या कुठल्या देशाने त्यांचे व्हिसा देणे जास्त कठीण केले की आम्ही लगेच चवताळून उभे राहणार. हा दुटप्पीपणा नाही का?

मला कल्पना आहे की आपले राजकीय पक्ष याचे भांडवल करतील, मराठी अस्मितेच्या नावाने गळे काढले जातील पण त्यांनी देखील या मराठी माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काय मदत केली? त्यांचा वापर फक्त निवडणुकीतील मतांसाठी, बस्स. त्यांना बाकी आपल्याबद्दल काहीही मतलब नाही.

IT IS A HIGH TIME FOR INTROSPECTION.

यशवंत मराठे

#SanjayNirupam #bhaiyya #migration #मराठीमाणूस

Leave a comment



Manoj Raut

6 years ago

Very true.

Deepak

6 years ago

When my son Siddharth movesd to US a few years ago, I had told him तु तीथला भैया आहेस हे लक्षात ठेव

श्रीराम शरद दांडेकर

6 years ago

परखड सत्य मांडले आहे . पुढील काळात मराठी कोण हाच मुद्दा कळीचा होणार आहे. बहूतेक सर्वांची मुले इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. घराघरातून बोलली जाणारी भाषा संमिश्र होत आहे. मराठी-अमराठी खाद्यपदार्थांची सरमिसळ होणे अटळ आहेच.
मरठी-अमराठी विवाहससंबंध हे ही पुढे येणारे सत्य आहेच. अमराठी ह्याचा अर्थ केवळ भैय्या असा न घेता, सिंधी, पंजाबी, बंगाली , तामिळ, गुजराथी असा घेतला तर जास्त लक्षात येईल.
राजकीय नेते जनतेला त्या त्या वेळेला जे आवडेल ते बोलतात त्याकडे फारसे लक्ष न देता , समाजात वस्तुस्थिती काय दिसते ह्याकडे लक्ष ठेवून , येणारी आव्हाने संधीमधे कशी रुपांतरीत करावी ह्याचा जन्मजात मराठी असणार्यांनी विचार करावाच.

प्रफुल्ल अग्निहोत्री

6 years ago

अगदी खरंय. मराठी मुलांची अजून एक मानसिकता म्हणजे त्यांना महाराष्ट्र काय मुंबई बाहेर काम मिळाले तर नको असते. बहुतेकांच्या पत्रातीपेक्षा अपेक्षा आणि अटी च जास्त असतात.

सुजित ज. पैठणकर

6 years ago

अत्यंत परखड मत.. पण हे झणझणीत अंजन नाक्यावर बसणाऱ्या आपल्या तथाकथित प्रांताभिमानी मराठी तरुणांचे डोळे कितपत उघडु शकेल, याची शंकाच वाटते...

Nina Datar

6 years ago

तुझ्या मताशी मी सहमत आहे.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS