बर्डमॅन ऑफ अल्काट्राझ

अंगभूत गुण आणि उपजत प्रवृत्ती कुठल्याही परिस्थितीत कशी काम करते याचे हे उत्तम उदाहरण.
 
प्रयोगशील आणि हुशार मनुष्य कुठंही गेला तरी त्याची हुशारी अन् प्रयोग लपून रहात नाहीत. परंतु ‘गुण’ हे सापेक्ष असतात, त्यांचा नेहमीच सदुपयोग होतो असं अजिबातच नाही. तरी देखील बऱ्याच वेळेला गुन्हेगारांची चाणाक्ष बुद्धिमत्ता आपण सहजपणं नाकारू शकत नाही. माझा गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याचा अजिबात हेतू नाही किंवा यामुळं त्यांचे गुन्हे कमी ठरतात असंही नाही पण सांगण्याचा मतितार्थ एवढाच की बुद्धिमत्ता लपत नसते किंबहुना ती दुधारी तलवारीसारखी असते.
 
अशाच एका माणसाची गोष्ट.. 
 
रॉबर्ट स्ट्रॉड’ हे त्याचं नाव ज्याचा जन्म वॉशिंग्टनमधल्या सिएटलमध्ये झाला. त्याचे वडील व्यसनी आणि हिंस्र प्रवृत्तीचे होते. त्यांनी रॉबर्टची शाळा तिसऱ्या इयत्तेतच थांबवली. रोजच्या दारू-भांडणं-मारामारी याला तो ही कंटाळला होता. ‘बाल्य’ असंही संपलं होतं; शेवटी वयाच्या तेराव्या वर्षी त्यानं घरातून पळ काढला. छोटं मोठं काम अन् चुटूरपुटूर चोरी करत त्याचा उदरनिर्वाह चालला होता. वयाच्या अठराव्या वर्षी तो रस्ते बांधकाम कामगारांच्या गॅंगमध्ये सामिल झाला. दिवसभर ढोरमेहनत करणं, संध्याकाळी सिगरेट फुंकणं आणि दारू पिऊन रात्रभर बेहोश झोपणं अशी सगळी दिनचर्या त्याची चालली होती. तिथं तो किटी ओ’ब्रायन नामक एका वेश्येच्या संपर्कात आला अन् चक्क तिच्या प्रेमातच पडला. कदाचित प्रेमासारख्या भावनेमुळं का होईना रॉबर्ट आता थोडा भानावर आला पण या इथंच घोळ झाला.
 
किटीच्या माजी प्रियकरानं हे सगळं बघितलं आणि एके दिवशी त्यानं रॉबर्टची जाम धुलाई केली. रॉबर्ट तर लहानपणापासून निगरगट्ट झालेला होता. त्यानंही जोरदार प्रतिकार केला पण घाव वर्मी लागला अन् प्रतिहल्ल्यात समोरचा इसम ठार झाला. रॉबर्टच्या हातून सरेआम खून झाला होता. केस कोर्टात गेली आणि रॉबर्टला ‘बारा’ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावत त्याची रवानगी तुरूंगात केली. कैदी म्हणूनही हा हाताळायला अवघडच निघाला. नियमित वैद्यकिय तपासणी वेळी त्यानं डॉक्टरच्याच कानात खेचली ते प्रकरण थंडावत नाही तोच त्यानं शेजारच्या कैद्याला हाती येईल त्या तीक्ष्ण वस्तूनं भोसकलं. त्यामुळे त्याच्या शिक्षेत अजून काही महिने जोडले गेले. त्यानं थोडा वेळ घेतला पण कैदी म्हणून हळूहळू तो रुळला.
 
काही महिन्यांनी त्याला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलं. ठिकाण बदललं तसं यानं कारागृहातल्या रुटिन ॲक्टिविटिजमध्ये रस घ्यायला सुरूवात केली. कैद्यांसाठी असलेल्या मेकॅनिकल ड्रॉईंग, संगीत, अभियांत्रिकी, गणित, धर्मग्रंथाभ्यास अश्या अनेक विषयात रॉबर्टने रुची दाखवली. एका बाजूला हे सगळं सकारात्मक सुरू होतं परंतू ‘सुंभ जळला असला तरी पीळ कायम’ होता. अधूनमधून त्याच्यातलं हिंस्त्र श्वापद डोकवायचं आणि मधल्या काळात नेमकं घडू नये तेच घडलं. छोटीमोठी कुरबूर झाली आणि रॉबर्टने कारागृहातील मेसच्या सुरक्षा रक्षकाला भोसकलं. पुन्हा नवीन गुन्हा दाखल झाला, पण यावेळी न्यायाधिशांनी अजिबात दयामाया न दाखवता त्याला ‘मरेपर्यंत फाशी’ची शिक्षा फर्मावली. उर्वरीत शिक्षा भोगून तो फासावर चढणार होता पण सहृदयी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना त्याची दया आली आणि त्यांनी रॉबर्टची फाशी रद्द करत त्याला ‘आजन्म कारावास विदाऊट पॅरोल’ अशी शिक्षा जाहीर करत त्याला अंडासेलमध्ये ठेवावं असा आदेश दिला.
 
 
 
 
खरं सांगायचं तर मृत्यू ही त्याची सुटका झाली असती कारण एकांतवास जास्त भयानक होता. रॉबर्टचा एकेक दिवस एकेका वर्षासारखा जात होता.
 
एके दिवशी असंच विचार करत छताकडं शुन्यात बघत तो पहूडला असतांना कसल्याश्या तरी आवाजानं त्याची तंद्री भंग पावली. त्याच्या छातीवर खिडकीत असलेलं पक्ष्याचं घरटं पडलं होतं अन् विस्कटलेल्या घरट्यात प्रचंड घाबरलेलं चिमणीचं इवलसं निरागस पिल्लूही होतं. पिलाची केविलवाणी अवस्था बघून कोडग्या रॉबर्टच्या डोळ्यातून नकळतच एक अश्रु टपकला, त्यानं अलगदपणं चिमणीचं पिल्लू आणि घरटं होतं तसं खिडकीत सेट करून ठेवलं. हे पिल्लू जगेल? त्याचे आईबाबा त्याला स्विकारतील? तो रोज तासनतास हळूच घरट्याचं निरिक्षण करत बसे. पिल्लू वाचलं; मोठं झालं अन् उडूनही गेलं पण रॉबर्टला ‘पक्षी’ या जमातीबद्दल प्रेम अन् कुतूहल वाटू लागलं.
 
कारागृहात कैद्यांना वाचायला पुस्तकं मिळत असत. त्यानं पक्ष्यांबद्दलचं वाचन सुरू केलं. त्यानं या विषयातली एकेक ओळ-एकेक पुस्तक वाचून काढली. शेकडो पुस्तकांचा फडश्या पाडल्यानंतर रॉबर्टने अनेक नोट्स काढल्या, नोंदी-शंका लिहून ठेवल्या, पक्ष्यांच्या सवयी त्यांचे आजार याबाबत त्यानं इत्यंभूत ज्ञान मिळवलं. रॉबर्टची ज्ञानलालसा बघून तुरूंग अधीक्षकांनी त्याला पक्षी पाळण्याची विशेष सवलत दिली. रॉबर्टने सिगरेटच्या पाकिटांपासून पक्ष्यांसाठी निवारा तयार केला आणि पक्ष्यांची औषधं बनवण्याचं जुजबी साहित्यही मागवलं. त्याच्या अभ्यासाला आता अधिकच गती मिळाली होती. त्याच्या नोट्सच्या हस्तलिखिताचं मोठं बाड तयार झालं होतं. त्यानं ते तुरूंगातूनच प्रकाशित केलं. पक्षीप्रेमी-पक्षीनिरीक्षक-पक्षी तज्ज्ञ यांच्यासाठी हे हस्तलिखित म्हणजे मोठा खजिना होता.
 
 
 
पण एवढ्यावरच रॉबर्ट थांबला नाही त्यानं पक्ष्यांच्या आजाराबद्दल माहिती देणारं दुसरं पुस्तक प्रकाशित केलं. हा ठेवा तर अत्यंत अमुल्य होता. नोंदी-निरिक्षणांसोबतच रॉबर्टने पक्ष्यांची रेखाटनं काढत पुस्तक विलक्षण सुंदर आणि बोलकं असं डिझाईन केलं होतं. रॉबर्टची पुस्तकं केवळ एखाद्या हौशी पक्षीप्रेमीच्या नोंदवह्या नव्हते तर ऑर्निथोलॉजी अर्थात पक्षीविज्ञान या विषयांत मार्गदर्शक ठरतील असे ग्रंथराज होते.
 
कालांतराने रुटिन प्रोसेसचा भाग म्हणून रॉबर्टची रवानगी अल्काट्राझ बेटावरील तुरूंगात झाली यावेळी त्याचे पक्षी त्याच्या सोबत नव्हते. ‘पेन-वही’ एकांतवासात पुन्हा एकदा रॉबर्टचे सोबती झाले; तो लिहित राहिला. कारागृहातील अनुभव आणि पक्ष्यांचा अभ्यास यावर त्यानं भलंमोठं जाडजूड हस्तलिखित लिहून काढलं परंतू हा दस्तावेज केवळ त्याचं आत्मवृत्त नव्हतं तर अमेरिकन कारागृह व्यवस्थेचाही कच्चाचिठ्ठा होता; पर्यायानं ते सगळं अप्रकाशितच राहिलं.
 
एव्हाना रॉबर्टची पक्षीविषयक पुस्तकं कारागृहाबाहेरच्या जगात लोकप्रिय झाली होती. थॉमस गॅड्डीस या लेखकानं रॉबर्टवर ‘बर्डमॅन ऑफ अल्काट्राझ‘ नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्या कारावासातील हिंस्त्र वर्तणुकीला काळ्या भूतकाळाची झालर जोडली गेली. हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालं. ‘रॉबर्ट स्ट्रॉड’ या नावाभोवती आता थोडं वलय तयार झालं होतं. त्याच्या पुढच्या ट्रान्सफरमध्ये त्याचा एकांतवास संपवण्यात आला, तो इतर कैद्यांसह शांततेत राहू लागला. पक्ष्यांनी जणू त्याचं चित्त थाऱ्यावर आणलं होतं. मिसूरीतल्या कारावासात तो तुरूंगातील छापखान्यात काम करू लागला.
 
 
इकडं कारागृहाबाहेर त्याच्या आयुष्यावर बेतलेला ‘बर्डमॅन ऑफ अल्काट्राझ’ हा सिनेमा रिलिज झाला. रॉबर्टची भूमिका निभावली होती बर्ट लॅंकॅस्टर या अभिनेत्यानं. बर्टनं मनस्वी रॉबर्ट सुंदर साकारला ज्यासाठी त्याला उत्कृष्ट अभिनयासाठी मानाचं ऑस्कर नामांकनही मिळालं. इतकं सगळं आपल्याकडं घडलं असतं तर रॉबेर्टला किमान आमदारकीचं तिकिट तरी नक्कीच मिळालं असतं पण तिकडं  राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसार त्याला माफी किंवा शिक्षेत सुट तर मिळाली नाहीच पण साधा पॅरोलही मिळाला नाही.
 
सुटका नको पण माझं आत्मवृत्त तरी परत करा’ म्हणून रॉबर्टने अर्ज केला होता, त्यावर सुनावणी होणारच होती पण त्या दिवशी सकाळी तो उठलाच नाही. त्याचं झोपेतच निधन झालं.
 
रॉबर्टच्या वकिलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्याचं हस्तलिखित मिळवलं पण सरकारी दबावामुळं त्याला कुणी प्रकाशक मिळाला नाही. शेवटी ई-बूकच्या स्वरूपात हा सगळा ठेवा उलगडला गेला, ज्यात कारागृहातील भ्रष्टाचार-न्यायव्यवस्थेतील तृटी-सामाजिक आंतर्विरोध या सगळ्यांवरही रॉबर्टने बोचरं भाष्य केलं होतं.
 
‘कुख्यात गुन्हेगार’ या टॅगपासून सुरू झालेला रॉबर्टचा प्रवास बुद्धिमान व्यक्ती व्हाया दर्जेदार लेखक ते अव्वल ऑर्निथोलॉजीस्ट पर्यंत येऊन पोहोचला.
 
 
 
 
अमेरिकेचा बर्डमॅन असलेल्या रॉबर्ट स्ट्रॉड या पक्षीतज्ज्ञाला सलाम !
 
 
@ यशवंत मराठे
 
 
प्रेरणा: डॉ. प्रज्ञावंत देवळेकर लेख
 
 
 

Leave a commentsadhana sathaye

1 year ago

खूप ह्रदयस्पर्शी.नशिब आणि परिस्थिती ह्यांचा सामना क़रत मोठ काम झाल रॉबर्ट स्ट्रौड कडून.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS