उडता युरोप

आपल्यातील बऱ्याच लोकांना युरोप दर्शन याचे एक अतोनात कुतूहल आणि आकर्षण असते. मी देखील त्या गोष्टीला अपवाद नव्हतो.

माझा वर्गमित्र श्रीराम याने 1997 साली एकत्र सुट्टीला जाऊ अशी टूम काढली ते ठरविण्यासाठी आम्ही फेब्रुवारी महिन्यात भेटलो. पहिला प्लॅन हा 4-5 दिवस कोकणात जाऊ असा ठरत होता पण अचानक श्रीरामने आपण 7-8 दिवस केरळ प्लॅन करू अशी उडी मारली. आणि आम्ही त्यांच्याकडून परत निघण्याआधी त्याने तीन आठवड्याच्या युरोप ट्रिप आमच्या गळी उतरवली. तेव्हा मला एवढी कल्पना नव्हती की त्याचे प्लॅन क्रमांक एक आणि दोन हे कायम कॅन्सल होण्यासाठीच असतात. असो, पण नंतर मात्र आमची गाडी जोरात हलली आणि युरोपचे जोरदार वारे वाहू लागले.

पहिला प्रश्न होता की जायचे कसे? आमच्या दोघांचे एकमत असे होते की कुठल्याही भारतीय टूर कंपनीबरोबर जायचे नाही कारण परदेशी जाऊन परत भारतीय (म्हणजे पंजाबी) जेवण्यात आम्हाला अजिबात रस नव्हता. तसेच आम्हाला टिपिकल भारतीय लोकांबरोबर (म्हणजे तुम्हाला कळले असेलच) जायचे नव्हते. शुभदाची ह्या गोष्टीला काहीच हरकत नव्हती; पण अदितीचा मात्र मोठा प्रॉब्लेम होता कारण ती अंड सुद्धा खात नाही. तरी देखील तिने या गोष्टीला संमती दिली. अगदी खरं सांगायचं तर आम्ही तिला थोडेफार गृहीतच धरले आणि लगेचच लंडन मधील Insight या ट्रॅव्हल कंपनीबरोबर जाण्याचे नक्की केले. संपूर्ण टूर 17 दिवसांची, त्यात पहिले 2-3 दिवस लंडन अशी भरगच्च ट्रिप ठरवली. आणि आमच्या स्वाऱ्या 17 मे 1997 ला रवाना झाल्या.

याच्या आधी मी काही परदेश प्रवास केला नव्हता असे नाही. पण कामानिमित्त गेल्यानंतर फारसे फिरायला वेळ नसतो. ही माझी तशी पहिलीच pleasure trip; त्यामुळे प्रचंड उत्सुकता होती.

घाबरू नका, सतरा दिवसात काय काय केले हे सांगून अजिबात बोअर करणार नाही आणि तसेच मी कसा युरोप फिरलो याचा धिंडोराही मला पिटायचा नाहीये. मात्र या ट्रिप दरम्यान जाणवलेल्या आणि अनुभवलेल्या काही खास गोष्टी आणि अनुभव शेअर करणार आहे.

आमची ट्रिप 20 मे ला डोवर इथून चालू होणार होती. भल्या पहाटे उठून आम्ही जवळजवळ दोन तास प्रवास करून तिथे पोहोचलो. सामान घेऊन बस पर्यंत जात असताना समोरून एक भारतीय दिसणारा माणूस समोर आला. आम्ही मराठी आहोत हे बहुदा आमच्या गोंधळलेल्या चेहऱ्यावर लिहिलेले असावे कारण त्याने अस्खलित मराठीत विचारले, मुंबई का पुणे? मुंबई संगितल्यावर त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि हसतहसत म्हणाला की तुम्ही भारतीय नकोत म्हणून या ट्रॅव्हल कंपनीची टूर घेतलीत ना? पण आमचा नाशिक मधील आठ डॉक्टरांचा ग्रुप आहे आणि इथे आल्यावर आमच्या असे लक्षात आले की नाशिक शहरातीलच एक दहा जणांचे कुटुंब त्याच बस मध्ये आहे. 48 लोकांची क्षमता असलेल्या बस मध्ये 44 प्रवासी असणार होते आणि त्यातील निम्मे, म्हणजे 22, आम्ही भारतीय असणार होतो आणि ते देखील सर्व मराठी बोलणारे. त्यामुळे आश्चर्याने तोंडात बोटं घालायची वेळ मात्र आली. बस सुरु झाली आणि आम्ही सर्वांनी एक सुरात “गणपती बाप्पा मोरया” अशी आरोळी ठोकली पण त्यामुळे इतर प्रवाशांची मात्र दातखीळ बसली असेल.

संपूर्ण युरोपचा इतिहास हा इतका रक्तरंजित आहे की तो शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. प्रत्येक राज्यकर्त्याने किती लाख लोकांची कत्तल केली हेच सगळीकडे ऐकायला मिळते. एकेकाळी जमीन ही जगातील खूप मोठी मालमत्ता होती त्यामुळे जास्तीत जास्त भूभाग आपल्या अंमलाखाली असण्यासाठी प्रत्येक राज्याचा आटापिटा होता आणि त्यासाठी रक्त सांडले जाणे ही अत्यंत किरकोळ बाब समजली जात असावी. प्रत्येक शहरात पर्यटन स्थळ म्हणून काय दाखवले जाते तर अंधारकोठड्या, म्हणजेच आम्ही कैद्यांना कसा त्रास दिला याचे प्रदर्शन, आणि त्याबरोबरीने स्मशानभूमी. यात बघण्यासारखे काय असा प्रश्न पडतो.

युरोप हा संपूर्ण खंड बहुतांशी ख्रिश्चन असल्यामुळे जिकडे जाऊ तिथे चर्च, कॅथिड्रल आणि चॅपल. मला तर त्यांच्यातील फरक अजूनही माहित नाही. सुरुवातीला नावीन्य आणि बऱ्याच ठिकाणी stained glass ने लखलखणारा त्यांचा अंतर्भाग यामुळे खूप कुतूहल वाटले पण कालांतराने तोचतोचपणा इतका झाला की आता मला बघायचे नाही अशी परिस्थिती झाली.

परंतु रोम मधील सिस्टीन चॅपल मधील छत हा एक अभूतपूर्व प्रकार आहे. आपल्या नजरेला तो अर्धगोल दिसतो परंतु प्रत्यक्षात तो सरळ आहे. Michelangelo या जगप्रसिद्ध चित्रकाराने छताला समांतर झोपून ते रंगविले आहे. याचाच अर्थ छताचे संपूर्ण चित्र त्याच्या मेंदूत पक्के घट्ट होते. Hats off to his sense of proportion!

आमच्या बरोबर नाशिकची दहा जणांची जी फॅमिली होती ती जैन धर्मीय होती. दोन भाऊ, त्यांचे कुटुंब आणि त्यांची म्हातारी आई. सर्व जण पूर्णपणे शाकाहारी आणि त्यात सुद्धा कांदा लसूण न खाणारे. ही मंडळी या टूर कंपनीबरोबर का आली हे कधीही न उलगडलेले कोडे. पण त्यांच्यातील धाकटा भाऊ अत्यंत उत्साही, स्वतःच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीची अजिबात लाज न बाळगणारा आणि सगळ्या सहप्रवाश्यांना सतत हसवत ठेवणारा एक कलंदर. साधारणपणे दररोज संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत आम्ही कुठल्यातरी गावात अथवा शहरात पोहोचायचो. हा गृहस्थ लगेच तेथील बाजारात जायचा आणि ज्या मिळतील त्या भाज्या घेऊन यायचा आणि नंतर स्वतः हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन पूर्ण फॅमिलीसाठी जेवण बनवायचा. एकदा मला हसतहसत म्हणाला, काय मराठे, येता का आमच्याकडे पार्टीला? आज बटाट्याचा रस्सा, भात आणि कोशिंबीर असा फर्मास बेत आहे. मला एकदा म्हणाला, आता पुढील एक-दोन वर्षात एकदा आईला अमेरिकेला नेऊन आणणार आहे. तो नक्कीच जाऊन आला असणार. एकदम दिलखुलास माणूस!

युरोपमधील किंवा एकंदरीतच परदेशात (मला आफ्रिका किंवा साऊथ अमेरिका यांची फारशी कल्पना नाही) कुठल्याही पर्यटन स्थळी जाण्याच्या सुविधा, रस्ते एकदम झक्कास. बऱ्याच वेळा त्या जागी पोहोचल्यावर असे जाणवायचे की यापेक्षा कितीतरी जास्त निसर्ग सौंदर्य आपल्या भारतात अनेक ठिकाणी आहे. पण आपल्याकडे प्रवाशांच्या सोयीची कोण पर्वा करतो? अत्यंत खराब रस्ते, पर्यटन स्थळी घाण आणि इतका बुजबुजाट की माणसाला पळून जावेसे वाटेल. पण तिथे छोट्यातली छोटी गोष्ट अशा काही दिमाखाने दाखवतील की विचारता सोय नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांसाठी टॉयलेटची उत्तम व्यवस्था. आपल्याकडे कोणी त्याचा विचारच करत नाही; जसे काही बायकांना ह्याची गरजच नसते.

दुसरी एक महत्वाची जाणवणारी युरोपमधील गोष्ट म्हणजे सगळा खुल्लम खुल्ला मामला. ॲमस्टरडॅम हे युरोपची सेक्स राजधानी आहे हे सांगताना कसलीही भीडभाड नाही. त्यांच्या दृष्टीने ही माणसाची गरज आहे आणि जे पूर्ण करण्याचे काम ते करतात. आपल्यासारखा दांभिकपणा अजिबात नाही. वेश्या व्यवसाय हा तिथे संपूर्णपणे कायदेशीर आहे. आम्हाला सर्वांना (अगदी आमच्या बायकांसकट) De Wallen ह्या त्यांच्या रेड लाईट एरिया मधील गल्ली बोळांमधून फिरवण्यात आले आणि अगदी खरं सांगतो मला त्यात काहीही गैर वाटले नाही. एक अतिशय वेगळाच अनुभव.

परंतु या सर्व प्रवासातील सगळ्यात वाईट अनुभव काय असेल तर एका देशातून दुसऱ्या देशात जाताना (तेव्हा युरोपियन युनियन झाले नव्हते) आमचा टूर गाईड एक ठरलेले वाक्य बोलायचा – All Indian Passports out for inspection. मला इतका राग यायचा कारण इतर 22 लोकांचे काहीही चेक केले जायचे नाही. आम्ही भारतीयांनी काय घोडं मारलं होतं? पण त्यांना दोष देण्यात अर्थ नाही कारण बऱ्याच अंशी जबाबदार आपणच होतो. गेल्या काही वर्षात मात्र खूप फरक पडला आहे. हल्ली आपल्या पासपोर्टकडे तितक्या तुच्छतेने बघितलं जात नाही.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की लेखाचे शीर्षक उडता युरोप का? अहो, आम्ही 17 दिवसात बेल्जीयम, फ्रांस, इटली, ऑस्ट्रिया, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड, मोनॅको आणि सुरुवातीला इंग्लंड अशा नऊ देशांना भोज्जा केला. कुठलाच देश ना पूर्ण बघितला ना बघण्याचा आनंद लुटला. आम्ही युरोपला जाऊन आलो हे लोकांना सांगण्याच्या पलीकडे आम्ही आनंद मिळवला का? तर याचे उत्तर नाही येईल. रोज सकाळी लवकर उठा, घाईघाईने ब्रेकफास्ट करा आणि पुढच्या जागी जायला बसच्या दरवाज्यात लाईन लावा. अरे, हे काय फिरणं झालं का? इंग्रजीतील म्हण “living out of suitcase” ही किती खरी आहे ते पटले. ट्रिप मध्ये असताना कितीतरी वेळा If it’s Tuesday, it must be Belgium या सिनेमाची आठवण झाली.

शब्दशः उडत उडत गेलो आणि 6 जूनला परत आलो (म्हणजे आज बरोब्बर 23 वर्षे झाली). शेवट शेवट तर कंटाळा आला, वाटलं अब बस्स. अरे पण हो, श्रीराम बरोबर वीस दिवस घालवणे यात मात्र खूप मजा आली. But such long trip becomes too hectic & tiring and leads to boredom. तेव्हापासून ठरवून टाकलं की एवढी मोठी ट्रिप कधीही करायची नाही. एक किंवा दोन देश 6-7 दिवसात बघावे आणि मनापासून त्याचा आस्वाद घ्यावा.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Europe #Conducted_Tour #युरोप

Leave a commentPrakash Bhave

2 years ago

प्रवास वर्णन न करता आठवणीत रंगून जाण छानच. सहा दिवसात एखादा देश बघण म्हणजे सुद्धा उडत उडतच, कदाचित थोड स्लो मोशन मध्ये.

Hemant Marathe

2 years ago

Enjoyed reading. 👍👌

Shrikant Joshi

2 years ago

Very nice and interesting writing…

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Comments

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS