FOMO

जवळपास २५ वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने मर्सिडीज गाडी विकत घेतली म्हणून आम्ही इतर ३-४ मित्रांनी त्याला पार्टी दे म्हणून हैराण केले. त्याने गाडी घेतल्याच्या चौथ्याच दिवशी आम्ही भेटलो पण आमच्या त्या मित्राच्या तोंडावर कणभर देखील आनंद नाही. म्हटलं, अरे काय झालं? तर म्हणाला मी मर्सिडीज घेऊन चूकच केली; त्याऐवजी मी बीएमडब्ल्यू घ्यायला हवी होती. आम्ही सगळे अवाक. मी थक्क होऊन त्याला म्हटलं, इथे आलेल्या प्रत्येकाचे मर्सिडीज घेणे हे स्वप्न आहे. तुझे पूर्ण झाले मग हे काय? तर म्हणाला, कालच माझ्या ओळखीच्या माणसाची बीएमडब्ल्यू बघितली जी माझ्या गाडीपेक्षा थोडी महाग आहे पण ती गाडी जास्त चांगली आहे. दोन दिवसात त्याचा आनंद आणि अभिमान गळून पडून त्याची जागा दुःखाने घेतली होती. आम्हाला काय बोलावे तेच कळेना; सगळ्या पार्टीचा बोऱ्या वाजला.   
 
त्यावेळी आम्ही सर्वच तिशी पस्तिशीतले त्यामुळे maturity तशी कमीच पण तरी मला असे वाटून गेले की अशी कोणाबरोबर तुलना करणे बरोबर नाही. हा पुढे आयुष्यात कधी आनंदी नाही होणार. आणि दुर्दैवाने पुढे झालेही तसेच असो. 
 
त्यामुळे या अशा वागण्याला काय म्हणतात हे काही माहित नव्हते. आता माझ्या लिखाणामुळे गेले काही वर्षे मी सोशल मीडियावर active आहे. मला नेहमी आश्चर्य वाटतं जेव्हा लोकं नवीन गाडी घेतली, मोबाईल घेतला, पॉश restaurant मध्ये जेवायला गेलो आणि बरेच काही सतत पोस्ट करत असतात. मला कधी ते कळलेच नाही पण आत्ता मुलाकडे गेलेलो असताना फोमो हा शब्द ऐकला आणि त्याला म्हटले म्हणजे काय? म्हणाला, Baba come on, I am surprised that you don’t know despite being on social media. म्हटलं मी मूर्ख आहे असे समजून मला सांग तर काय म्हणे FOMO is Fear Of Missing Out. 
 
मग माझ्या नेहमीच्या पद्धतीने जरा माहिती काढली. फोमो अर्थात फिअर ऑफ मिसिंग आऊट या शब्दाचा सर्वप्रथम वापर १९९६ मध्ये डॉ. डॅन हर्मन यांनी केला. त्यानंतर लेखक पॅट्रिक मॅकगिनिज यांनी फोमो ही संकल्पना विशेष लोकप्रिय केली. २००४ साली हार्वर्ड विद्यापीठाचे नियतकालिक हर्बसमध्ये ही संकल्पना त्यांनी प्रखरपणे मांडली. आता २०१३ मध्ये फोमो हा शब्द आणि संकल्पना ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये पण समाविष्ट करण्यात आली आहे.
 
फोमो म्हणजे तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट सुटून जाणं,  चुकणं किंवा न मिळणे नव्हे; तर त्याच गोष्टी इतरांना मिळाल्या आहेत किंवा मिळतील याचा प्रचंड मानसिक त्रास आणि खदखद म्हणजे फोमो. एखादी गोष्ट न अनुभवणं किंवा ती सुटणं ही गोष्ट अनेकदा आपल्यासाठी नॉर्मल असते. काही वेळा आपण स्वतःही ती सोडून देत असतो. मात्र फोमोमध्ये आपल्यात काहीतरी कमतरता आहे अशी भावना निर्माण होते.
 
सगळे लेटेस्ट गेम्स, बाहुबली सारखे सिनेमे, नवीन वेब सिरीज सगळ्यांनी पाहिली, पण माझे राहून गेले. याचा अर्थ मनोरंजनाचे खूप क्षण मी गमावले. गेल्या दोन तासात मी फोन पाहिला नाही, म्हणजे बऱ्याच गोष्टी मी मिस केल्या असणार असा ठाम समज. माझा मोबाईल बंद पडला म्हणजे आता संपलंच; मी प्रचंड काहीतरी गमावणार. तसेच तो इव्हेण्ट मी कसा चुकवला? ही बातमी मला एवढी उशीरा कशी काय कळली? सोशल मीडियावरील हा लेटेस्ट ट्रेंड माझ्या नजरेतून सुटलाच कसा? माझ्या एरियात नवीन रेस्टॉरंट सुरू झालं, पण मला माहित नाही? आता सगळे तिकडे जाऊन आले असणार. सगळे आनंदात आहेत, त्यांचं आयुष्य सुखात चाललंय आणि मी मात्र दुःखात, नैराश्यात आहे असंच मला वाटतं. हे सगळं किंवा यासारखं काही होत असल्याचा अनुभव म्हणजे FOMO (फोमो) अर्थात फिअर ऑफ मिसिंग आऊटची सवय तुम्हाला लागली असे म्हणता येऊ शकेल. 
 
फोमो ही खरं तर एक मानसिक स्थिती आहे. एखादा संस्मरणीय कार्यक्रम, एखादा अनुभव, एखादी मेजवानी, एखादी चर्चा, एखादा आनंदाचा क्षण, एखादा निर्णयाचा क्षण सुटल्याची, चुकवल्याची भावना मनाला सतावणं. त्यामुळे पश्चात्ताप होणं. पूर्वी या क्षणासंबंधी मर्यादित असलेली ही अपराधी मानसिकतेची म्हणजे फोमोची भावना. सोशल मीडिया अस्तित्वात आल्यावर तिचं स्वरुप आणि परिणाम दोन्ही बदललं. त्यातून पुन्हा चोवीस तास शरीराला आणि मनाला चिकटून बसलेला मोबाईल. एखादी गोष्ट चुकवल्याचा / चुकल्याचा अपराधगंड आबालवृद्धांच्या (विशेषतः तरुणांच्या) मनाला ग्रासू लागलाय. सोशल मीडियावरील उपस्थिती, मनोरंजन, सततचे अपडेट्स इथपर्यंत मर्यादित असणारा हा फोमो मार्केटिंग, व्हिडिओ गेम्स, इन्व्हेस्टमेण्टचे, शेअरमार्केटचे अपडेट्स यामुळेही रुजू लागलाय. फोमोमुळे केवळ अपराधगंड मनाला ग्रासतो एवढ्यापुरती याची व्याप्ती सीमित नाही. यामुळे मानवी मनाला ताण किंवा स्ट्रेसचा सामना करावा लागत आहे. सेल्फ एस्टिम किंवा स्वतःविषयीचा असलेला मान यावर परिणाम होताना दिसून येतो.
 
 
 
 
फोमोमुळे मानसिक स्थिती बिघडण्याचीही शक्यता असते. चिंता, नैराश्य, स्वाभिमानाचा अभाव, धोकादायक वर्तणूक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक स्थिती फोमोच्या प्रभावाने तयार होऊ शकतात. मुलांच्या व तरुणांच्या बाबतीत पिअर प्रेशरचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता असते. फोमोमुळे मुलींमध्ये नैराश्य तर मुलांमध्ये ताण असे परिणाम सर्वसाधारणपणे दिसून येतात. जे आपल्याकडे नाही किंवा आपल्याला मिळू शकत नाही, त्याचा आनंद दुसऱ्याला घेता येतो आहे अशी भावना मनावर परिणाम करणं या वयात सहज शक्य असतं.
 
मी अमुक एका कंपनीची कार विकत घेतली म्हणजेच खरा success इथे खरी गोची आहे. कर्ज काढून भरभक्कम EMI भरावा लागतोच पण जेव्हा माणसे पैसे कमावल्याचा गर्व करायला लागतात किंवा लोकांना कळलं पाहिजे की माझी व्हॅल्यू काय असं जेव्हा शब्द ऐकू येतात तेव्हा मात्र कुठेतरी हे चुकतंय असे जाणवतं आणि वाटतं की त्यांना वेळीच सावरावं. 
 
पैसे हे आयुष्यातील महत्वाची गोष्ट आणि साधन आहे आणि हो, पैशांचं सोंग कधीच आणता येत नाही. परंतु त्या पैशाच्या जोरावर विकत घेतलेल्या वस्तू यावरून तुम्ही स्वतःची किंमत करायला लागलात की मग मात्र परिस्थिती कठीण होत जाते. या वस्तू घेतानाच कुठेतरी महाग म्हणजेच दर्जेदार अशी मानसिकता देखील तयार होते. 
 
इथून सुरुवात होते ती म्हणजे माझा सहा आकडी पगार, माझ्या गाडीचा ब्रँड आणि तिची किंमत, माझा आयफोन, मोठ्यातमोठा टीव्ही, मी सुट्टीला जाणारी स्थळे आणि राहतो ती महागडी हॉटेल्स, मी पितो ती सिंगल माल्ट, माझे ब्रँडेड कपडे, महागडा चष्मा, बोसचे इअरप्लग्स्, माझ्या पायातले अदिदास किंवा नाईकीचे बूट या सगळ्या गोष्टी म्हणजेच मी अशा समजाने मन व्यापून टाकते आणि हळूहळू बट्ट्याबोळ व्हायला सुरुवात होते. पैसे पुरेनासे झाले की मग पठाणी चक्रवाढ व्याजाची क्रेडीट कार्ड्स तयारच असतात आणि सुटकेचे सगळे मार्ग खुंटतात. या बाह्य गोष्टींमधून स्वतःला identify करण्याच्या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे. 
 
जगातली सगळे आबालवृद्ध या गर्तेत गुंतत जावीत, आणि त्यांनी त्यातच अडकून पडावं म्हणून कंपन्या दिवसरात्र मेहनत घेत असतात, कारण ते त्यांचं कामच आहे. इथे मला आठवलं की जेव्हा नेटफ्लिक्सच्या सीईओला विचारलं की तुमचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण तेव्हा त्यांचे उत्तर काय होते याची कल्पना आहे? त्यांनी सांगितलं – माणसाची झोप. कारण प्रत्येक कंपनीला आपला खप म्हणजे Consumption वाढवायचे असते कारण तरच त्यांना नफा होईल आणि त्यांचे बोनस मिळतील. त्यामुळेच जाहिरातीचा भडीमार करून ते ग्राहकाच्या म्हणजेच कस्टमरच्या मनावर सतत बिंबवत राहतात त्या वस्तूंची खरेदी, मालकी, वापर या तुमच्या आयुष्यातील किती महत्वाचे आहे. आणि दुर्दैवाने वापर करणारा मी म्हणजेच खरा मी अशी धारणा झाली की मग परिस्थिती बिकट होत जाते. 
 
 
फोमोतून बाहेर कसं येणार?
 
सर्वप्रथम आपण फोमोच्या चक्रात अडकलो आहोत याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं किंवा ती झालीच पाहिजे असं म्हणणं हे शक्य नसतं. प्रत्येक गोष्ट मिळणं, प्रत्येक आनंदी अनुभव घेणं, प्रत्येक ठिकाणी आपण उपस्थित असणं हे ही अवघड असतं. प्रत्येक वेळी समाजमाध्यमावर स्वतःचा वावर असणं, प्रत्येक गोष्टीची माहिती असणं अशी अशक्य आहे. फोमोच्या भीतीपायी कळत नकळत अनेकदा अनेक गोष्टींमागे आपण उगीचच धावत असतो. अशा वेळी स्वतःचा वेग ठरवून कमी करणं आवश्यक असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नसेल वा आपण ती नाकारली असेल तर इट्स ओके म्हणता यायला हवं. आपल्या अपेक्षा अमर्याद असतात त्यामुळे सगळ्याच गोष्टी मिळतील, समजतील हे शक्य नाही ही खूणगाठ मनाशी पक्की बांधायला हवी. सोशल मीडिया, सोसायटी, फॅमिली यांना एकाच वेळी वेळ देणं, त्याचा अनुभव एकाच वेळी घेणं हे अशक्य आहे. त्यामुळे एका वेळी एकच यावर ठाम रहा आणि समाधानीही रहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळा कारण सध्या ते फोमोचं महत्त्वाचं कारण आहे  
 
 
 
 
 
 
सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्या लक्षातच येत नाही ती म्हणजे आपल्याकडेच यातील कुठल्याही गोष्टी नव्हत्या तेव्हा देखील आपल्यावर जिवापाड प्रेम करणारे आईबाप होते. खिशात दिडकी नसली तर चल यार, असे म्हणत गळ्यात गळे घालून हिंडणारे आणि प्रेमाने शिव्या देणारे मित्र होते. त्यामुळे आपल्यातल्या माणसाला असे वस्तूंच्या आहारी जाऊन हरवू देऊ नका. वेळीच माघारी परता नाहीतर भविष्यात खूप उशीर झाला असेल. 
 
काही लोकांना वाटेल याला सगळं मिळालंय त्यामुळे याला काय जातं उपदेश करायला? पण हरकत नाही. कोण काय म्हणतंय याची फिकीर करून काहीच फायदा नाही कारण ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम हैं केहना’. परंतु हे वाचून एखाददुसऱ्या माणसाने जरी विचार केला तरी माझा लेख लिहिण्याचा हेतू सार्थकी लागेल. 
 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 
 
 
यातील काही भाग मृदुला राजवाडे यांच्या लेखातून घेतला आहे आणि त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 
 
 

Leave a commentSneha Dharap

2 months ago

पण
अप्रतिम लेख.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Comments

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS