गावगाड्याची कहाणी

सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला “गाव” ही संकल्पना भुरळ घालत असते, कारण ती माणसाच्या मूळाशी संबंधीत असते. झुक झुक अगिन गाडी…. मामाच्या गावाला जाऊ या अशा बालगीतातून ती त्याच्या भावविश्वात प्रवेश करते आणि माणूस आयुष्यभर गावाशी जोडला जातो. गाव म्हटले की त्याच्यासमोर डोंगराच्या कुशीत वसलेले, हिरव्यागार वनराईने नटलेले, वाऱ्याने डुलणाऱ्या शेतांनी भरलेले असे निसर्गरम्य चित्र उभे रहाते.

शहरात राहणाऱ्या बहुतेक जणांची, माझे शहरातील वास्तव्य कायमस्वरूपी नाही अशीच भावना असते. याच भावनेतून तो वर्षातून एक दोनदा तरी गावाची वारी करतोच. मारवाडी आणि गुजराथी समाज व्यापाराच्या निमित्ताने जरी सर्व जगभर पसरलेला असला तरी प्रत्येक कुटुंबाचे समाईक का होईना पण मूळ गावी घर असतं किंवा तो घर बांधण्याच्या तयारीत तरी असतो. मराठी माणूस आपल्या मूळ गावावरून आडनाव घेऊन गावाची आठवण जागवत असतो. पारशी आणि बोहरी समाजात सुद्धा ही पद्धत रूढ आहे. ते कर ऐवजी वाला लावून आडनाव तयार करतात. उदा. संजाणवाला, छोटाउदयपूरवाला. गावाची आठवण ठेवण्याची भावना किती वैश्विक आहे हे युरोपमधील लोकांनी अमेरिकेत वसाहत करतात ठेवलेल्या न्यूयॉर्क, न्यूजर्सी या नावांवरून कळू शकते. एकूण काय गाव कोणाला सोडवत नाही हे खरे.

दहा हजार वर्षांपूर्वी माणसाला शेतीचा शोध लागला आणि तो भटके जीवन सोडून एका ठिकाणी स्थिर झाला. त्यावेळी गावाचा जन्म झाला असे म्हणता येईल. पुराणात गावाची व्याख्या अशी दिली आहे:

यथा शूद्रजन प्राया, सुसमृद्ध कृषीवला ।
क्षेत्रोपभोगभूमध्ये वसतीर्ग्राम संज्ञिता ।।



म्हणजे जिथे शेती करण्यास व राहण्यास योग्य अशी जमीन आहे आणि जिथे समृद्ध शेतकरी व पुष्कळसे मजूर रहातात अशा वस्तीला गाव म्हणतात. स्वयंपूर्ण मानववस्तीचे सर्वात छोटे एकक (युनिट) म्हणजे गाव अशी सुद्धा गावाची व्याख्या करता येईल. सोय आणि भौगोलिक रचना यामुळे मूळ गावापासून थोड्याशा अंतरावर वस्त्या निर्माण होतात त्यांना वाडी अथवा पाडा म्हणतात (प्रदेशानुसार हे नाव बदलते). ह्या वाड्या किंवा पाडे यांना स्वतंत्र नावे असतात, त्यांना मूळ गावाचाच भाग समजले जाते. साधारणपणे ह्या वाड्या किंवा पाडे या ठिकाणी कोणत्या आडनावाची माणसे रहातात किंवा त्या जागेचे काही वैशिष्ट्य असल्यास त्यावरून त्याचे नाव पडते. उदा. पवारपाडा, आंब्याचा पाडा, डोंगरीपाडा. फक्त गावातच नव्हे तर आज देखील मुंबईतील बोरिवली भागात असे पाडे असल्याचे दिसून येईल. एका गावाचे १०-१५ पाडे असू शकतात. कोकणातील भौगोलिक परिस्थितीमुळे अशी गावे कोकणात भरपूर आढळतील परंतु महाराष्ट्रातील इतर भागात ही संख्या खूप कमी आहे.

लोकसंख्या हा निकष लावून चढत्या भाजणीनुसार गाव ह्या शब्दाची व्याप्ती कशी वाढते हे पहाणे मनोरंजक ठरेल.

१) वस्ती २) वाडी किंवा पाडा ३) गाव किंवा खेडे ४) पूर ५) पेठ ६) नगर

लहान मुलांच्या गोष्टीत नेहमी एक आटपाट नगर होते असा उल्लेख येतो. यातील आटपाट म्हणजे आठ पेठांचे नगर, म्हणजेच आठ बाजारपेठांचे नगर. आता बाजारपेठ आठच का? तर अष्ट दिशा आहेत म्हणून. कोणत्या दिशेला कोणती पेठ असावी ह्याचे सुद्धा नियम होते.

भारतात मुस्लिमांचे आक्रमण झाल्यानंतर गाव ही संकल्पना दर्शविणारे अनेक अपभ्रंश झालेले फारसी शब्द व्यवहारात आले. उदा. मौजे (फारसी शब्द – मौजअ किंवा मौझा), बुद्रुक (बुजुर्ग), खुर्द (खुर्दा), शहर, तहसील म्हणजे तालुका, परगणा म्हणजे प्रांत. निझामाबाद, हैद्राबाद या शहरांच्या नावातील बाद शब्द आबादी या शब्दावरून आला असावा. निझाम + आबादी = निझामाबादी = निझामाबाद; त्याचप्रमाणे हैद्राबाद किंवा अहमदाबाद. या शहरांच्या नावातील पहिला शब्द बहुतांशी व्यक्तीशी संबंधित आहे. याचा अर्थ असा की निझाम, हैदर किंवा अहमद यांनी वसवलेली आबादी किंवा वस्ती. सरकारी दप्तरात किंवा त्यांनी प्रसिद्ध केलेल्या नकाशात मौजे शिरवळ असे लिहिले जाते. तसेच काही गावांच्या संदर्भात याचा अर्थ मूळ अथवा जुने गाव. बरेच वेळा नदीच्या एका बाजूला मूळ अथवा जुने गाव असते आणि कालांतराने नदीच्या पलीकडे छोटी वस्ती होते. अशावेळी या वस्तीला मूळ गावाच्या नावापुढे खुर्द लावून नामकरण केले जाते. उदा. बाभळगाव बुद्रुक (जुने गाव) आणि बाभळगाव खुर्द (नवीन वस्ती). फारसी भाषेत खुर्द याचा अर्थ छोटे किंवा कमी किंमतीचे, कमी महत्वाचे. आपण बऱ्याचदा चिल्लर नाण्यांना खुर्दा म्हणतो.

मोठ्या गावाच्या संदर्भात कस्बा (कसबा) हा शब्दसुद्धा वापरला जातो. कस्बा म्हणजे ज्या गावात कसबी लोक राहतात ते गाव. उपयोगी वस्तू घडविणारे कसबी लोक एकत्रितपणे रहात असल्याने या ठिकाणी आवक जावक वाढून छोटी व्यापारी पेठ निर्माण होते. असो.

गावांची नावे कशी होतात हे मनोरंजनात्मक होऊ शकते परंतु विस्तार भयास्तव तो विषय बाजूला ठेऊया. परंतु एक उदाहरण म्हणजे ज्या गावाच्या नावाच्या शेवटी सर हा प्रत्यय येतो तेव्हा त्या गावाजवळ मोठा तलाव किंवा सरोवर असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमृतसर, मुंबईजवळ दहिसर व एकसर या नावाची गावे आहेत. दहिसर येथे जलाशय नाही पण या गावाजवळ मंडपेश्वर आणि कान्हेरी लेणी आहेत त्यामुळे पूर्वी तिथे जलाशय किंवा सरोवर असणारच. एकसरला तर तलाव आहेच. सरोवर शब्दातील स व र ही अक्षरे घेऊन सर हा प्रत्यय तयार झाला असावा.

पूर्वी शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने त्याला पूरक असणारे व्यवसाय करणारी माणसे गावातच स्थाईक झालेली असत. त्यांना बलुतेदार म्हणत. शेतीशी आणि रोजच्या जगण्याशी निगडित असे १२ व्यवसाय होते म्हणूनच गावात अशा १२ बलुतेदारांची वस्ती स्वाभाविकपणे होणारच. ही यादी प्रदेशानुसार बदलती असे. बलुतेदारांना कारू असे सुद्धा म्हणत.

१) सुतार, २) लोहार, ३) महार, ४) चांभार, ५) कुंभार, ६) मांग, ७) परीट, ८) न्हावी, ९) भाट, १०) तेली, ११) गुरव, १२) कोळी

याचबरोबर १८ व्यवसाय असे होते की, ज्यांची गरज नेहमी पडत नसे परंतु वर्षातून ३-४ वेळा त्यांची गरज निर्माण होत असे. असे व्यवसाय करणाऱ्यांना अलुतेदार किंवा नारु म्हणत.

१) तांबोळी, २) साळी / कोष्टी, ३) माळी, ४) घडशी, ५) तराळ, ६) सोनार, ७) शिंपी, ८) गोंधळी, ९) रामोशी, १०) खाटीक किंवा मुलाणा, ११) डवरी (डौरी), १२) कळवंत / कलावंत, १३) सणगर, १४) ठाकर, १५) गोसावी, १६) जंगम, १७) वाजंत्री, १८) भोई

यातील न समजणाऱ्या शब्दांचे अर्थ:

१) तांबोळी – विड्याची पाने, तंबाखू विकणारा, २) घडशी – तांबा पितळ्याची भांडी घडविणारा, याला कासार / तांबट असेही संबोधले जाते, ३) तराळ – हमाल, ओझी वाहणारा, ४) सणगर – कांबळी, घोंगड्या बनविणारे, ५) मुलाणा – मुसलमान खाटीक, ६) वाजंत्री – वाजंत्री वाजविणारे, ७) भोई – पालखी उचलणारे, ८) जंगम – लिंगायत साधू अथवा पुजारी

अशा तऱ्हेने १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार म्हणजे कारु नारु मिळून एक स्वयंपूर्ण गाव तयार होत असे. या सर्व कारु नारुंना शेतात धान्य पिकले की, ठरलेल्या हिश्श्याप्रमाणे धान्य मिळत असे आणि त्या बदल्यात ते आपली सेवा वर्षभर पुरवत असत. रोख व्यवहार खूप कमी असे. या व्यतिरिक्त गरज भागविण्यासाठी गावात आठवडी बाजार भरत असे. अनेक गावात अजूनही ही प्रथा चालू आहे. फक्त बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचे स्वरूप बदलले आहे. गावातील बलुतेदार आणि अलुतेदार यांना घरे वाटून दिलेली असत. म्हणजे अमुक एका न्हाव्याने याच ५ ते १० घरातील लोकांची हजामत करावयाची. ही व्यवस्था इतकी पक्की होती की न्हाव्याला घरे बदलण्याची मुभा नव्हती तसेच त्या घरातील लोकांना दुसऱ्या न्हाव्याकडे जाण्याची परवानगी नव्हती. या व्यवस्थेमुळे प्रत्येकाला कामाची हमी मिळाली पण त्यामुळे स्पर्धा नष्ट होऊन धंदा आणि कसब वाढविण्यावर मर्यादा आल्या. ही व्यवस्था वंशपरंपरागत असे. आपल्याकडे प्रत्येक पिढीत मुलगा हवा अशी जी धारणा तयार झाली त्याचे मूळ या व्यवस्थेत आहे. कारण सुताराला किंवा शेतकऱ्याला मुलगा झाला नाही तर ही साखळी तुटणार. ही व्यवस्था टिकून रहावी म्हणून त्याला एक धार्मिक आवरण चढवले गेले आणि ते म्हणजे मुलगा नसेल तर तुमचे श्राद्ध, पक्ष न झाल्याने मेल्यानंतर गती मिळणार नाही वगैरे…. या सर्व व्यवस्थेमुळे समाजात साचलेपण निर्माण होऊन जैसे थे ही मानसिकता निर्माण झाली.

गावाची रचना:

गावाचे स्थूलमानाने दोन भाग असत. १) शेती असलेला भाग ज्या भागातील जमीन काळी म्हणून त्याला काळी म्हणत आणि २) वस्ती असलेला भाग चोपण जमिनीचा म्हणजे ज्या जमिनीत पाणी मुरत नाही व चुनखडी असलेला असतो म्हणून ही जमीन तुलनेने पांढरी असते त्यामुळे त्या भागाला पांढरी किंवा गावठाण म्हणतात.

जुन्या काळी लुटारूंपासून गावाचे संरक्षण व्हावे म्हणून गावाला कोट आणि एकाच प्रवेशद्वार असे. कोटाला वेस म्हणत आणि त्याचे संरक्षण करण्याचे काम महाराचे असे. ही वेस आणि प्रवेशद्वार राखण्याचे काम करणाऱ्या महाराला वेसकर म्हणत. या कामाबद्दल महारांना वतने होती. वरील कामांमुळेच महारांची वस्ती वेशीच्या बाहेर असे. त्यातूनच गावकुसा बाहेर हा शब्द निर्माण झाला. ढोर, चांभार व भंगी या जाती गोमास खात नाहीत म्हणून या अस्पृश्य जातींची वस्ती गावात शेवटी किंवा गावकुसाला खेटून असे. परंतु महार व मांग या जाती मेलेली जनावरे फाडणाऱ्या आणि गोमास खाणाऱ्या असल्याने महारवाडा व मांगवाडा गावापासून लांब असे. गावातील स्पृश्य जातीच्या किंवा व्यवसायाच्या आळ्या असत. उदा. सुतारआळी, लोहारआळी, तांबटआळी. ही रचना अगदी हडप्पा काळापासून चालू आहे व आजसुद्धा त्याचे अवशेष दिसतात. वतनदार शेतकरी स्वतंत्रपणे रहात असत. ज्याच्याकडे वंशपरंपरेने जमीन असते त्याला मिरास (फारसी शब्द) म्हणत म्हणून अशा जमिनीच्या मालकाला मिरासदार म्हणत आणि याला गावात खूप मान असे. पूर्वी जमीन कसणारे कमी आणि जमीन जास्त असल्यामुळे शासन (सरकार) आपले उत्पन्न वाढविण्यासाठी खंडाने (लीजने) जमिनी देत असे. या जमिनीला खालसा जमीन म्हणत आणि ही जमीन कसणाऱ्यांना उपरी (टेम्पररी) म्हणत. गावसभा किंवा गोतसभा यात उपरी लोकांना भाग घेता येत नसे. पाटील, कुलकर्णी वगैरे सरकारी नोकर हे गावातीलच स्थाईक मंडळी असत. गावाचा शेतसारा जमा करून सरकारला भरणे हे त्यांचे मूळ काम. एक-दोन देवळे आणि चावडी हे गावाचे अविभाज्य घटक होते.

गावाचा कारभार:

पूर्वी दळणवळणाची साधने कमी असल्याने गाव स्वयंपूर्ण करण्यावाचून गत्यंतरच नव्हते. त्यातूनच बलुतेदार आणि अलुतेदार निर्माण झाले. शक्यतो फौजदारी आणि दिवाणी खटल्यांचा न्यायनिवाडा गावातील गोतसभेत होत असे. ह्या सभेत कोण असावे याचे नियम होते. पाटील, पोलीस पाटील, कुलकर्णी, मिरासदारांपैकी महाजन, बलुतेदारांचे प्रतिनिधी आणि महार असे लोक गोतसभेत पंच म्हणून असत. या सभेत महार असण्याचे कारण त्याला सर्व जमिनीच्या हद्दींची माहिती असे त्यामुळे जमिनीच्या वादात महाराच्या साक्षीला खूप महत्व असे.

वरील गोतसभा किंवा गावपंचायत याचप्रमाणे जातपंचायत सुद्धा असे. त्यात त्या त्या जातीचे प्रश्न सोडविले जात आणि त्याच्यात इतर जातींना मज्जाव असे. या जातपंचायती इतक्या प्रबळ होत्या की शिवकालात कोकणातील एका भंडारी समाजात मोठा वाद निर्माण झाला तेव्हा त्यात प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ‘आम्ही आमचा वाद सोडवू, तुम्ही त्यात लक्ष पडू नये‘, असे सांगण्यात आले. याचप्रमाणे गावात धर्मसभा सुद्धा असे ज्यात धार्मिक प्रश्न सोडविले जात.

वरील सर्व व्यवस्थेतून गावाचा कारभार आणि व्यवहार स्वयंपूर्ण रीतीने चालायचा म्हणून त्याला ‘गावगाडा” म्हणतात.

ही सर्व व्यवस्था जशी गावातील स्थानिक असलेल्या लोकांची होती तसेच गावात ठराविक काळात अनेक फिरस्ते लोकांची वर्दळीची पण होती. त्यांची सुद्धा गावे, त्यातील घरे ठरलेली होती. त्यांचा गावात येण्याचा काळ ठरलेला असे. त्यातील काही लोकांची माहिती पुढीलप्रमाणे:-

उपयोगी फिरस्ते

१) घिसाठी: नांगराचा फाळ, कुऱ्हाडी वगैरे लोखंडी वस्तू बनविणारे आणि जुन्या हत्यारांना धार लावणारे, २) बेलदार: दगड फोडणारे आणि घरासाठी चौकोनी दगड बनविणारे, ३) वडार: विहीर, तळी यासाठी जमीन खोदणारे, ४) लमाण / वंजारी: धान्य, मीठ इत्यादी वस्तूंची ने आण करणारे, ५) वैदू: औषध विकणारे, ६) कुडमुडे ज्योशी: भविष्य सांगणारे, ७) कैकाडी: टोपल्या बनविणारे

करमणूक करणारे फिरस्ते

१) गारोडी २) माकडवाले ३) नंदीबैलवाले उर्फ निरमल ४) दरवेशी (अस्वल) ५) चित्रकथी ६) बहुरूपी ७) कोल्हाटी / डोंबारी ८) वासुदेव

भिक्षा मागणारे फिरस्ते

१) भोप्ये (खंडोबाचे) २) भगत ३) भुत्ये (देवीचे) ४) आराधी ५) वाघ्या-मुरली ६) पोतराज ७) कानफाटे (नागपंथी) ८) उदासी ९) अघोरी १०) गोसावी ११) जोगती किंवा जोगिणी १२) बैरागी १३) साधू १४) फकीर

ही यादी खूप मोठी आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे फिरस्ते सुद्धा गावगाड्याचे घटक होते.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या या लेखाला महाराष्ट्राच्या भौगोलिक मर्यादा आहेत.

अशा या साचेबंद गावाचा शासनाशी संबंध म्हणजे शेतीचा कर देणे आणि जमिनीची मालकी वारसांच्या नावावर चढवणे यापुरताच मर्यादित होता. या कामासाठी गावात पाटीलकुलकर्णी नेमलेले असत. प्रांत (जिल्हा) स्तरावर देशपांडे (कोकणात खोत) व देशकुलर्णी असत. परगणा स्तरावरती देशमुख असत. ही सर्व पदे वंशपरंपरागत होती म्हणूनच त्या पदावरून आडनावे तयार झाली. गावाचा कारभार रोखी ऐवजी बटाईवर चाले; असो.

या एकसुरी साचेबंद रीतीने चालणाऱ्या गावगाड्याचा दुष्परिणाम असा झाला की, माणसांची दृष्टी गावापुरती मर्यादित झाली आणि लोक संकुचित झाले. शासन एतत् देशीयांचे असो किंवा परकीयांचे असो, माझ्या जीवनात काहीच फरक पडणार नसेल तर मला त्याबाबत काय करायचे आहे? राजा / सुलतान कोणी कां असेना अशी भावना प्रबळ झाली. परकीय सत्तेविरुद्ध उठाव / बंड न होण्याचे गावगाडा हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळेच हिंदुस्थान शेकडो वर्षे पारतंत्र्यात राहिला त्यात या गावागाड्याचा मोठा वाटा आहे.

वंशपरंपरागत बलुत्यांच्या व्यवस्थेमुळे कल्पकतेला (innovation) वावच उरला नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा / वाटा मला परंपरेने मिळणारच असेल तर मी जास्त आणि चांगले काम करण्याची गरजच काय? ही भावना प्रबळ झाली. आज सुरक्षित सरकारी नोकरवर्गाची जी मानसिकता आहे तीच त्यावेळी अलुते-बलुते यांची होती त्यामुळे जाती व्यवस्था नको इतकी घट्ट झाली. गावगाड्यामुळे माणसाला आपले कर्तृत्व दाखविण्यास वावच मिळेना त्याचा परिणाम म्हणून छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे, वाईट परंपरांना चिकटून रहाणे, स्वतंत्र विचार न करणे हा आपण भारतीयांचा स्वभाव बनला.

मुस्लिम राजवटीत अत्याचार वाढू लागले, सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेती करणे कठीण झाले, जीविताची शाश्वती उरली नाही तेव्हा कुठे माणसे गावापलीकडचा विचार करू लागली आणि छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होऊ लागली परंतु यासाठी महाराष्ट्राला ३५० वर्षे वाट पहावी लागली.

गावगाडा इंग्रजांच्या राजवटीत सुद्धा चालत होता परंतु तो हळूहळू मोडत होता. इंग्रजांनी गावाचे जंगल आणि पाणवठे यावरती असलेले अधिकार काढून टाकले. महसूल (revenue) गोळा करण्यासाठी पगारी नोकर ठेवले. न्यायव्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला. आणि आज स्वातंत्र्यानंतर गावगाडा संपूर्णपणे मोडून पडला.

आजची परिस्थिती:

हल्ली गावागावात शहरातील गुणदोषही (बहुतेक दोषच) येऊ लागले आहेत. आज कुठच्याही गावातील बसथांब्यावर उतरलात तर आजूबाजूला हॉटेलांची व इतर दुकानांची ही दाटी झालेली दिसते. चक्रावून जायला होते की इतक्या लहान गावात केवढी ती हॉटेले आणि दुकाने? बसथांब्याच्या आजूबाजूला अंतराअंतराने तरुणांची टोळकी दिसतील. रिकामटेकडे तरुण इकडे तिकडे हिंडताना दिसतील. कोणी सिगारेट ओढताना तर कोणी गुटखा खाऊन पचापचा थुंकताना. कुठे राजकारणावरील गप्पांचा फड जमलेला दिसेल. गावात बिअरबार असणे ही सध्या सामान्य गोष्ट झाली आहे. जागोजागी राजकीय पक्षांच्या आणि संघटनांच्या पाट्या तर हव्याच, नाही का? शेताकडे कामाला जाताना फक्त प्रौढ आणि वृद्ध मंडळी दिसतील आणि तरुण मंडळी पत्त्याच्या डावावर किंवा दारूच्या गुत्त्यात बसलेली दिसतील. बऱ्याचशा झाडांची कत्तल दिसेल आणि आता गावागावात सिमेंटचे जंगल उभे रहायला सुरुवात झाली आहे. जवळजवळ प्रत्येक घरावर डिश अँटेनाचे ध्वज दिसतात.

गावातील कुठल्याही वृद्धाला बोलते करा की तो असेच म्हणतो, “अहो, सगळं गाव बदललं, गावाची रयाच निघून गेली. कोणाला काम करण्याची धमक राहिली नाही. शेतामध्ये काम करण्याची तरुणांना लाज वाटते. कामधंदे सोडून टीव्ही बघण्यात वेळ घालवतात. लोकांच्या हातात पैसा आला पण शिस्तच गेली निघून. पूर्वी दोन चार माणसंच दारू प्यायची, ती पण इकडून तिकडून आणायची आणि स्वतःच्या झोपडीत ढोसायची. आता सगळं उलटंच झालंय. दारू न पिणारी दोन चार राहिली आणि सगळं गाव दारू पिऊन झुलतंय. कोणाचा आणि कोणताच धाक म्हणून राहिला नाही. ही कसली आलीय प्रगती? झक मारीत गेली ती प्रगती”.

याचाच अर्थ लोकांजवळ पैसा येत आहे; पण दुर्दैवाने गावात बेफिकिरी, बेदिली माजत आहे. काही अपवाद सोडले तर आज खेडोपाडी हेच दृश्य दिसते. पूर्वीचे सौंदर्य, कष्टाळूपणा, कर्मनिष्ठा, निर्व्यसनीपणा, वाट्याला आलेल्या धंद्याविषयीचे प्रेम हे सर्व लुप्त होत आहे असे जाणवते आहे. स्वार्थीपणा रोमारोमात भरलाय आणि लोक परमार्थ पार विसरून चालले आहेत.

गावे-खेडी बकाल होता आहेत पण चव्हाट्या चव्हाट्यावर राजकारणाचे कट मात्र शिजत आहेत. लोकांचे राहणीमान सुधारले पण विचारमान पार गढूळ झाले.

त्याचबरोबर शेकडो वर्षे गावगाडा संस्कृती टिकल्यामुळे संकुचित वृत्ती, मला काय त्याचे? दैवविवशता, काहीही बदल होणार नाही, मला सहन केलेच पाहिजे अशी नकारात्मक मानसिकता आपल्या रक्तात भिनली आहे आणि ती या गावगाड्याचीच देन आहे.

गावगाडा मोडला परंतु ही मानसिकता मोडलेली नाही आणि जोपर्यंत ती मोडली जाणार नाही तोपर्यंत नवा भारत निर्माण होणार नाही.

अशी आहे गावगाड्याची कहाणी

यशवंत मराठे
सुधीर दांडेकर

yeshwant.marathe@gmail.com

#gaav #village #RuralEconomy #गावगाडा #Caste

Leave a comment



माधव आठवले

5 years ago

छान व माहितीपूर्ण लेख !
त्रिंबक नारायण आत्रे यांच्या गावगाडा या पुस्तकात त्या काळाचे यथार्थ वर्णन आढळते.

Yeshwant Marathe

5 years ago

हा लेख लिहिण्याआधी ते पुस्तक मुद्दामून वाचले.

Anil Joshi

5 years ago

Very well researched article!

Vishakha Bhagvat

5 years ago

Indeed interesting. In fact added to my knowledge......
well researched article

Ramkrishna N Joshi

5 years ago

The generation born after 1960 and specially those who have born in metro cities will not know ant thing of this.

श्रीनिवास मराठे.

5 years ago

माझे आजोबा रामचंद्र विनायक मराठे यांनी "गावगाडा चा शब्दकोश" संपादित केला आहे.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS