Minimalism

डिडरोट इफेक्ट

डेनिस डिडरोट नावाचा एक फ्रेंच तत्वज्ञानी होता. इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळपास 52 वर्ष होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. त्या वेळी रशियाची राणी कॅथरीनला डेनिस डिडरोटच्या गरीबीबद्दल कळले. तिने त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 2015 मधील 50 हजार डॉलर्स डिडरोटला देऊ केले. डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले.

डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला. त्याने त्या पैशातून लगेच 'स्कार्लेट रोब'; म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्च प्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्जही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले.

यालाच मानसशास्त्रातील 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect) म्हणतात.

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात 'डिडरोट इफेक्ट'.

रशियन चित्रकार कासीमीर मालेविच (Kasimir Malevich) याने 1915 साली एक चित्र बनवले ज्याच्यात एका पांढऱ्या पार्श्वभूमीवर एक काळ्या रंगाचा चौरस काढला; बस्स, बाकी काही नाही.

ज्यायोगे त्याला असे दाखवून द्यायचे होते की महत्वाच्या गोष्टी फार थोड्या असतात. सुरुवातीला त्याला ABC Art, Literalist Art अथवा Cool Art असेही संबोधले गेले. त्यातूनच पुढे "मिनिमलिझम" ही चळवळ १९५० च्या अखेरीस व्हिज्युअल आर्टच्या संदर्भात सुरु झाली. पण कालातंराने ही संज्ञा वापरली गेली ती घर आणि आयुष्य नीटनेटकं ठेवण्यासंदर्भात 'डिक्लटरींग' अर्थाने!!

पण मिनिमलिझम म्हणजे नक्की काय? Minimalism म्हणजे किमान चौकटीत राहण्याची जीवनशैली.

जोशुआ बेकरने केलेली व्याख्या अशी आहे -"Minimalism is freedom from the passion to possess". तो पुढे म्हणतो -"I am intentionally trying to live with only the things I really need. Modern culture has bought into the lie that the good life is found in accumulating things - in possessing as much as possible. They believe that more is better and have inadvertently subscribed to the idea that happiness can be purchased at a department store. But they are wrong. Minimalism brings freedom from the all-consuming passion to possess. It steps off the treadmill of consumerism and dares to seek happiness elsewhere. It values relationships, experiences, and soul-care. And in doing so, it finds life."

हे सगळं सोप्प्या शब्दांत सांगायचं तर म्हणजे काय तर - "घर सुटसुटीत करण्यासाठी/ ठेवण्यासाठी अनावश्यक, वापरात नसलेल्या, घरी नसल्या तरी क्काहीही फरक पडणार नाही किंवा नकोश्या अशा वस्तूंचा त्याग करणे आणि सुटसुटीत छान सिम्पल आयुष्य जगणे!" आपण नीट पाहिलं आपल्याच घराकडे, टेबलकडे, फ्रिजकडे, कपाटात, शेल्फमध्ये तर किती आणि काय काय साठवलेलं असतं आपण? हौस म्हणून? कधीतरी वापरू म्हणून? आणि मग मिनिमलिस्टिक नजरेने पाहिल्यावर लख्ख कळतं त्यातल्या कित्येक गोष्टी नसल्या तरी काहीही फरक पडणार नाहीये आयुष्यात !

आपण उगाच कित्तीतरी गोष्टींमधे जीव अडकवून ठेवतो आणि मग वर्षानुवर्षं त्या गोष्टी आपल्या मनाइतक्याच घरातल्या शेल्फमधे, कपाटांतही जागा अडवून बसतात! एक प्रकारे अडगळच पण तिचा मोह सुटला नाही तर ती बसतेच घरात ठाण मांडून! आपण घरात किती अनावश्यक गोष्टी सांभाळत असतो. एखादी गोष्ट कधीतरी पुढे लागेल हया आशेवर तिला अनावश्यक सांभाळत असतो आणि असे करताना घरात अनावश्यक गोष्टी साठवत असतो. खरं तर, घर ही 'आनंदाने जगण्याची' जागा आहे त्याला आपण 'साठवणीची जागा' बनवतो. Actually home is 'living space', not a 'storing space'.

आज काय घडते याचा विचार करून बघा. आपण एक वस्तू घ्यायला गेलो की, दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. मॉल मध्ये गेल्यावर काय घडते? अगदी असेच. घ्यायला जातो दोन गोष्टी आणि दहा गोष्टी घेऊन बाहेर पडतो. परंतु असे पूर्वी दुकानात जायचो तेव्हा असे होत नसे. यालाच 'spiraling consumption' म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect) होय. ही सामान्य मानवी प्रवृत्ती (human tendency) आहे. या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात.

समजा आपण महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी इत्यादी घेणार. घरात मोठा टी.व्ही. आणला की चांगले टेबल, फर्निचर, HD वाहिन्या सुरु करणार. घराला नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार. आजकाल घरात तीन टीव्ही सेट्स असतात. एक हॉल मध्ये, एक घरातील सिनियर सिटीझनच्या खोलीत आणि एक मुलांच्या खोलीत. खरंच ह्या तीन टीव्हीची गरज आहे का? ह्यामुळे कुटुंब तीन खोल्यांमध्ये विभागले गेले आणि त्यातील संवाद संपलाय. प्रत्येक जण आपल्या आवडता कार्यक्रम पाहण्यात मश्गुल मात्र एकत्र बसून गप्पा, विचार विनिमय ह्या गोष्टींना मुकलाय. तीच गोष्ट गाडीच्या बाबत घरात माणसं तेवढ्या गाड्या असतात. मग त्या वस्तूची देखभाल आणि त्यासाठी लागणारा अनावश्यक वेळ आणि खर्च ह्याचा विचार व्हायला हवा.

आजकालच्या जगात घरातील वृद्ध माणसांशी बोलायला, त्यांच्याशी संवाद साधण्याचा वेळ कोणालाच नसतो कारण प्रत्येकजण मोबाईल,टीव्ही, इंटरनेट इत्यादी बाबींमध्ये अडकलाय आणि घरातील अनावश्यक वस्तूंमध्ये गुंतलाय. ह्या अनावश्यक वस्तूंची 'अडगळ' कमी केली तरच घरातील वृद्ध व्यक्तींशी सुसंवाद साधता येईल आणि त्या वृद्ध व्यक्तींची 'अडगळ' भासणार नाही.

A home with fewer possessions is more spacious, calming and  focused on the people who live inside it.

आता दुसरी गोष्ट बघा; लोक फिरायला जातात तेथील नवीन जागा, निसर्ग सौंदर्य, सहलीची आठवण इत्यादी बाबींचे मनात साठवण करण्याऐवजी तेथील विक्रीला असलेल्या वस्तू  souvenir म्हणून घेण्याकडे सगळ्याचा कल असतो. खरे तर त्या वस्तूंचा वापर घरी आल्यावर क्वचितच केला जातो मात्र त्या वस्तू विकत घेऊन घरात अडगळ मात्र वाढवतो. त्यामुळे प्रवासातील महत्वाचे तत्व म्हणजे 'Collect moments, not the things.' खरं तर वस्तूंचा संचय आणि त्याची साठवण ह्यापेक्षा ते श्रम आणि पैसा भटकंती वरती खर्च करावा. प्रवास आपल्याला नवनवे अनुभव देतो त्यामुळे प्रवासात वस्तूंची खरेदी करण्याऐवजी अनुभवांची साठवण करावी.

परंतु माणसाला खर्च करताना भीती वाटत नाही; पण नंतर हिशोब लागत नाही; तेव्हा त्याचा त्रास होतो. वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; या वस्तूची मला कितपत गरज आहे? असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेतल्यावर त्या वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे का याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा. Minimalism is asking 'why' before you 'buy.'

'The secret of happiness is not found in seeking more but in developing the capacity to enjoy less' - Socrates

जीवनाचा खरा आनंद जास्तीत जास्त गोष्टी जतन करण्यात नसून कमीत कमी गोष्टी बाळगून गरजा कमी करण्यातच खरा आनंद आहे.

तुम्ही म्हणाल हे सगळे ठीक आहे, पण सुरुवात कुठून आणि कशी करायची. बोलणे सोप्पे आहे पण हे खरंच शक्य आहे का? आणि असेल तर करायचे काय?

त्यासाठी काही सोप्पे रुल्स आहेत. (1) घरातल्या 'त्याज्य' वस्तूंसाठी जॅपनीज 5-S प्रिन्सिपलचा वापर करणे. त्यासाठी 6-6 चा थम्बरुल वापरणे - म्हणजे ज्या गोष्टी 6 महिन्यात वापरात आल्या नाहीत आणि पुढचे 6 महिने अजिबात लागणार नाहीत - अशांचा त्याग करणे आणि दुसरं म्हणजे (2) 12-12-12 चा रुल! म्हणजे अश्या टोटल 36 गोष्टी शोधायच्या त्यातल्या 12 फेकून देण्याच्या लायकीच्या असतील, 12 कुणाला तरी (फुकट हां!) देऊन टाकण्यासारख्या असतील; कदाचित आपल्या घरातील 'अडगळ' ही दुसऱ्याच्या 'जगण्याची निकड' असू शकते आणि 12 परत करण्याजोग्या (म्हणजे आपल्या नसलेल्या, दुसऱ्यांच्या चुकून आपल्याकडे असलेल्या!) अशा वस्तू शोधून त्याची त्या त्या प्रकारे रवानगी करून घर डिक्लटर करून आयुष्य "सॉर्टेड" बनवण्यासाठी! आपल्याला जीवन जगतांना जास्तीत जास्त सुमारे 100 वस्तूंची अत्यंत गरज असते; बाकी इतर वस्तू अनावश्यक असतात. 'They are just stuff and Less stuff is more freedom'.

It is better to donate than to accumulate. वस्तूंचा अनावश्यक संचय करण्यापेक्षा त्याचे सत्पात्री दान करणे गरजेचे आहे.

आजकालच्या लग्न समारंभात अवलंबलेली चांगली पद्धत म्हणजे 'आहेराचा' स्वीकार न करणे. पूर्वी लग्न समारंभात 'आहेर' ह्या प्रथेपायी इतक्या अनावश्यक गोष्टींची घरात बरसात होत असे की त्याचा वर्षानुवर्षे संचय होत असे आणि मग हळूहळू त्या वस्तू पुन्हा अडगळीच्या खोलीत जात.

"Too many peoples spend money they have not earned, to buy things they don't want, just to impress people they don't like."

वरील वाक्याकडे तटस्थपणे आणि गांभीर्याने बघितले तर खरोखर आजकाल मध्यमवर्गीय समाजात एक चंगळवाद वाढत चाललाय ज्यामुळे ज्या गोष्टी घेण्याची आज ऐपत आणि गरज नाही त्या वस्तू अगदी कर्जाने विकत घेऊन लोकांमध्ये मिरवण्यासाठी वृत्ती आढळते. अगदी 'ऋण काढून सण साजरे करावे' ह्यासाठी अहमहमिका लागते. तसे बघितले तर ज्या गोष्टींची आज गरज नाही त्या गोष्टींचं मूल्य 'शून्य' असते कारण वस्तूचा वापर असेल तरच तिची उपयुक्तता.

पण हे सगळं झालं वस्तूंच्या संदर्भात! पण "नात्यां"चं काय? नाती सुद्धा डिक्लटर करणे शक्य असेल का? कोणाला जमत असेल?

नाती नाही तर निदान घर तर मोकळे करायला सुरुवात करूया.

मग लागायचे कामाला?

© यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Minimalism # Minimalist #Didrot_Effect #Declutter #Joshua_Becker

Leave a comment



Vasant Marathe

3 years ago

Reminds me of famous dialogue from movie Singham:
"Meri zarooratein kam hai ... is liye mere zameer mein dum hai" 🙂

Shubhada joshi

3 years ago

Nati declutter karta yetil ki nahi ha pratyekacha prashna pan emotions bhavnanchaa pasara declutter
Karta ala pahije....

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS