बर्फाचा गोळा ते सागरी सेतू - ७

शिवाजी पार्कच्या गप्पा

मी अगदी पहिल्या झलकीत म्हटले होते की तसा हा परिसर मराठी मध्यमवर्गीय. पण हीच त्याची ओळख आता बदलत चालली आहेत. जिथे बघावं तिथे जुनी बिल्डिंग पाडून रिडेव्हलपमेंट चालू आहे. नवीन येणारा सर्व वर्ग हा थोडासा उच्चभ्रू आणि अमराठी. पूर्वी शिवाजी पार्क वर चालताना मराठी शिवाय दुसरी भाषाच ऐकू यायची नाही पण आता सर्रास गुजराथी कानावर पडते.

बरं होणाऱ्या नवीन बिल्डिंग नुसत्या उंच उंच उभ्या राहता आहेत पण आजूबाजूच्या बेसिक गोष्टींकडे कोणाचे लक्षच नाही. रस्ते तेवढेच आणि गाड्या चौपट. हल्ली इथल्या इथे जायचे म्हटले तरी सगळीकडे ट्रॅफिक जॅम. आणि आपल्या भारतीयांना कोणी संयम कधी शिकवलेलाच नाही; सगळ्यांना नुसती घाई घाई. आणि रहदारीचे नियम पाळणे बहुदा आपल्याला कमीपणाचं वाटतं. दुचाकी वाहनांबद्दल न बोललेलंच बरं. नियम त्यांच्यासाठी नाहीतच. सिग्नलला थांबणे हाच गुन्हा वाटतो बहुदा; नो एन्ट्री मधून येणे म्हणजे तर जन्मसिद्ध हक्कच. आणि चुकूनमाकून एखाद्या गाडीचा धक्का लागला तर बघायलाच नको; लगेच हाणामारीला सुरवात.

जरी नवनवीन इमारती उभ्या राहत असल्या तरी तशी अजूनही चांगली थिएटर्स, रेस्तराँ तशी अजूनही नाहीतच. Goa Portuguesa, Oven Fresh, Gypsy Chinese आणि तसे नवनवीन चालू झालेले Tartulia, Bar Stock Exchange, Open House असे सन्माननीय अपवाद सोडले तर परळ किंवा बांद्रा-खार किंवा बीकेसी सारखे पर्याय शोधून पण सापडत नाहीत.

१९८०-८२ च्या आसपास हिंदुजा हॉस्पिटलची टोलेजंग इमारत बांधायला सुरुवात झाली..समुद्राला अगदी लागून असल्याने बांधकाम करताना त्यांना खूप अडचणी आल्या आणि साधारणपणे १९८६ साली हे हॉस्पिटल सुरु झाले. जुन्या आणि नवीन बिल्डिंगला जोडणाऱ्या पुलाचे काम होतं त्या दिवशी आम्ही रात्रभर जागून ते बघितलं. त्यांच्या सुदैवाने त्यावेळी CRZ नियम लागू नसल्याने ते एवढी मोठी इमारत उभी करू शकले पण त्यामुळे एक झालं की मुंबईतल्या कुठल्याही भागातून इथे यायला हिंदुजा हॉस्पिटल ही खूण सर्वश्रुत झाली.

गेल्या दहा वर्षात एक मोठा फरक पडला आणि तो म्हणजे झालेलं Coffee House Invasion. त्यामुळे या परिसरात अचानक तरुण मुलामुलींचा सुळसुळाट झाला. नाही नाही, माझी ही कम्प्लेंट नाही; असली तर भावना ही की हे आमच्या तारुण्यात का नाही घडले? आता या वयात अशी हिरवळ दिसून काय उपयोग; नाही का?

शिवाजी पार्कच्या सयंमाची खरी सत्वपरीक्षा (Acid Test) ही दरवर्षी ६ डिसेंबरला असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीला अंदाजे ५-६ लाख लोकं संपूर्ण परिसरात जिथे जागा मिळेल तिथे राहतात आणि चैत्यभूमीवर त्यांचे दर्शन घेऊनच परत जातात. लहान मुले, बायका, वयस्क सर्वजण ६-७ तास शांतपणे लाईनीत उभे राहतात आणि त्या थोर पुरुषाला श्रद्धांजली वाहतात.. मला त्यांच्या श्रद्धेचं खरंच खूप कौतुक वाटतं. आणि वर्षभर शिव्या खाणारी महानगरपालिका ह्या वेळी मात्र स्वच्छतेचे जे काम करते त्याला तोड नाही. शिवाजी पार्कची गाडी परत दोन दिवसात रुळावर येते.

दादरची चौपाटी तर राहिलेलीच नाही त्यामुळे आता फक्त दोन कारणांसाठी लोकं तिथे जात असावेत. एक तर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आणि दुसरं म्हणजे बांद्रा वरळी समुद्रसेतू (सी लिंक) बघणे आणि फोटो काढणे. सी लिंक म्हटल्यावर एक गोष्ट मला नेहमीच खटकत आली आहे.. एक तर जवळजवळ रु ३००० ते ५००० कोटी जास्ती खर्च आणि दुपटीपेक्षा जास्त लागलेला वेळ. आणि तरी देखील त्याच्या उदघाटनाचा केवढा मोठा समारंभ. What were we celebrating? Cost overrun & delay? जाऊ दे, अशा गोष्टींचा विचार केला की त्रासच जास्त होतो.

शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क वर बघण्यासारखा सीन असतो. एका वेळी किती शे लोकं क्रिकेट खेळत असतात हे तो भगवंतच जाणे. जवळजवळ ५०-६० ठिकाणी स्टंप्स लावून क्रिकेट चालू असते. कोणाचा बॉल कुठे चाललंय हे त्यांचं त्यांना तरी कळते की नाही माहित नाही. खरंच हे क्रिकेटचं माहेरघर आहे यात शंका नाही..

तसं बघायला गेलं तर मुंबई हे घाणीचे आणि झोपडपट्टीचे ही माहेरघर आहे. आजकाल विमानाने मुंबईला उतरताना खाली बघवत नाही. त्याच्या तुलनेने आम्ही शिवाजी पार्कला राहणारे तसे सुदैवीच. घाण खूपच कमी आणि झोपडपट्टी जवळजवळ नाही. पण सतत वाढणारी लोकसंख्या हे शहर किती काळ सहन करणार हा मोठाच प्रश्न आहे त्यामुळे हे स्वरूप बदलायला फार काळ जावा लागणार नाही.

कितीही आणि काहीही घडले तरी निदान मला तरी शिवाजी पार्क सोडणे कठीण आहे; याचे मुख्य कारण म्हणजे आम्हां बालमोहनकर १० वी ब मित्रांचा रविवारचा कट्टा. नक्की आठवत नाही (कदाचित भूषण बरोबर सांगेल) पण गेली निदान २० वर्षे तरी आम्ही काही मित्र सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत दर रविवारी रवी वसईकरच्या स्टॉल जवळ भेटतो. चहा, कॉफी, सिगरेट, मनसोक्त शिव्या आणि गप्पा यांचे एक अभूतपूर्व मिश्रण. बरं, नयनसुख दिसण्याची अजिबात शक्यता नसताना देखील वेळ कसा जातो हे कळत नाही. आम्ही बाहेरगावी गेलो असलो तरी रविवारी ११.३० पर्यंत थेट कट्ट्यावर पोहोचायचा प्रयत्न करतो. गेल्या काही वर्षात थोडा बदल झालाय कारण एक दोन ओरिजनल मेंबर्स लांब गेले, आणि गमतीत बोलायचं म्हणजे एक दोन शत्रू पक्षातील लोक (किंग जॉर्ज शाळा) ग्रुपमध्ये आले. आमच्या बायकांच्या मते आम्ही कट्ट्यावर भेटून वांझोट चर्चा करतो. असेलही; पण त्यांना कधीच कळणार नाही की आम्हाला त्यातून काय मिळतं ते. दीड तास वाट्टेल ते, वाट्टेल तसे बोलण्यातील मजा त्यांना आम्ही का सांगावी आणि त्यांना ती कशी समजणार? Katta has become our lifeline. कदाचित काही वर्षांनी आम्ही म्हातारे, (कोण म्हणतो म्हातारे?), बरं, वृद्ध तरुण, बहुदा रोजच भेटू. काय रे xxxx, बरोबर की नाही? हो म्हणा चुपचाप.

इति बर्फाचा गोळा ते सागरी सेतू सप्त लेखी कहाणी सफळ संपूर्ण!!

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#shivajipark #memories #reminiscence #landmarks #gujarati #balmohan

Leave a comment



Hemant Marathe

6 years ago

👍👌👏👏

Megha Mane

6 years ago

खूप छान शब्दांत व्यक्त केलं‌ आहे मुंबईला.. खूप जुन्या गोड आठवणी जाग्या झाल्या शिवाजी पार्काच्या..

Vaidehi Deshpande

6 years ago

सर्व पुष्पे छान लिहिली आहेत संग्रही ठेवली पाहिजेत .

Devidas

6 years ago

Absolutely true reflection of reality

नितीन तगारे

6 years ago

हाता बाहेर गेलेल्या जात चाललेल्या सामाजिक परिस्थिती वर आपण ज्या हतबलतेने व पोटतिडकीने बोलतो त्याचे शब्दांकन तू छान उपहासात्मक केलेस.
तूझे सगळे लेखन मनमोकळेपणाने दिलखुलास झाले आहे.
ह्याचा शेवट न करता असेच पुढे लिहित रहा.

Yeshwant Marathe

6 years ago

I don't intend to stop writing.. May be I will try different genre.. I hope to keep article flow once a week, may be every Friday.. Keeping fingers crossed..

विनायक गोखले

6 years ago

नितीन तगारेने लिहिले आहे तसेच मला वाटते.

तुझ्या लेखमाले बद्दल विशेष कौतुक व स्मृतींना सुखद उजाळा मिळाल्याने धन्यवाद पण !!

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS